या आठवड्यात बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेले आशियातील सर्वात मोठे एरो इंडिया 2025 हे प्रदर्शन अलीकडच्या वर्षातील सर्वात मोठ्या प्रदर्शनांपैकी एक आहे. मात्र, येणारे पाहुणे आणि सामान्य जनतेसाठी असणारी खराब व्यवस्था, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एसीएम ए. पी. सिंग आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) अधिकाऱ्यांमधील खाजगी संभाषणातील अपरिहार्य वाद यामुळे हा शो झाकोळला गेला.
हवाई दल प्रमुख सिंग यांनी तेजसचे वितरण वेळेत पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल HALवर उघडपणे टीका केली. कॅमेऱ्यात कैद झालेली त्यांची टीका सोशल मीडियावर व्हायरल झाली. कथित खाजगी संवादादरम्यान सिंग यांनी HALबद्दल भारतीय हवाई दलाची वाढती निराशा अधोरेखित केली. “तुम्ही आमच्या चिंता दूर केल्या पाहिजेत आणि आम्हाला अधिक आत्मविश्वास दिला पाहिजे. सध्या, मला HALबद्दल विश्वास नाही, असे घडणे खूप चुकीचे आहे,” असे सिंग म्हणाले.
या वर्षाच्या सुरुवातीला HALच्या भेटीदरम्यान, त्यांना आश्वासन देण्यात आले होते की, 11 तेजास एमके1ए विमाने तयार असतील, परंतु एकही विमान वितरित करण्यात आलेले नाही, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आवश्यक शस्त्रास्त्रे आणि यंत्रणा नसतानाही या विमानाचे एमके1ए असे नामकरण केल्याबद्दलही त्यांनी HALची खिल्ली उडवली. संरक्षण उत्पादनात स्पर्धा निर्माण करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागाच्या गरजेचा हवाई दल प्रमुखांनी पुनरुच्चार केला. HALबद्दल इतका स्पष्टवक्तेपणा दाखवल्याबद्दल हवाई दलाच्या प्रमुखांची प्रशंसा करणाऱ्या त्यांच्या वक्तव्यांना ठळक बातम्यांचे स्थान मिळाले.
HAL च्या रचनात्मक समस्या
अर्थात या मथळ्यांच्या पलीकडे जाऊन, HALला अडचणीत आणणारी आव्हाने नवीन नाहीत. भूतकाळात डोकावून बघितले तर लागोपाठ दुसऱ्या हवाई दल प्रमुखांनी HALच्या अकार्यक्षमतेबद्दल आणि विलंबाबद्दल अशीच चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की मुख्य समस्या म्हणजे उत्पादन सुलभ करण्यासाठी आउटसोर्स केलेले भाग समाकलित करणाऱ्या बोईंग आणि डसॉल्ट सारख्या जागतिक एरोस्पेस दिग्गजांच्या समोर इतर घटकांना आउटसोर्स करण्यासाठी HALची इच्छा नाही. एचएएल लढाऊ विमानांच्या निर्मितीच्या सर्व पैलूंवर नियंत्रण राखण्यासाठी, खाजगी क्षेत्राचा सहभाग मर्यादित करण्यासाठी आणि स्पर्धा कमी करण्यासाठी आग्रही आहे, असे ते म्हणाले.
HAL ची सुधारणा आणि “मिशन मोड” दृष्टीकोन स्वीकारण्याच्या अनिच्छेमुळे देखील उत्पादन कार्यक्षमतेत अडथळा आणला आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्राच्या अधिकाधिक सहभागाला अनुमती देण्यासाठी आणि चांगल्या दर्जाची तसेच वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी हवाईदल प्रमुखांनी HAL च्या संरचनेत व्यापक फेरबदल करण्याचे आवाहन केले आहे.
संरक्षण मंत्रालयाची भूमिका
हवाई दल प्रमुखांच्या टीकेला मिळणारी अनावश्यक नकारात्मक प्रसिद्धी लक्षात घेऊन, संरक्षण मंत्रालयाने (MoD) हवाई मुख्यालय आणि HAL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शांतपणे बसून व्यावसायिक पद्धतीने समस्या सोडवण्यास सांगितले आहे. याशिवाय पुढील वितरण लवकरात लवकर कसे होईल याची खात्री केली आहे. हवाई दल प्रमुखांसोबत सार्वजनिकरित्या चर्चा करण्यास नकार देताना, HAL चे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक डी.के. सुनील म्हणाले की, जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन इंजिन निर्मात्यांनी मार्चपासून वेळेवर एरो इंजिन वितरित केली तर कंपनी 2024 मध्ये 12 विमाने तयार करण्यास सक्षम असेल आणि पुढील वर्षापासून ते वर्षाला 24 इतके उत्पादन करू शकेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील HAL आणि IAF यांना त्यांचे मतभेद खाजगीरित्या सोडवण्याचा सल्ला दिला आहे आणि अंतर्गत मतभेद सार्वजनिकरित्या प्रसारित केले जाऊ नये यावर जोर दिला आहे. अर्थात, अशा चर्चा नित्याच्या आहेत आणि भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमाला सुनियोजित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहेत असे वरिष्ठ अधिकारी कबूल करतात.
या वादाच्या व्यतिरिक्त, येलाहंका एअरफोर्स स्टेशन टार्मॅकमध्ये अभूतपूर्व सामना झाला तो यूएस एअरफोर्सची F-35 आणि रशियाची Su-57 यांच्यात. एरो इंडिया 2025 मध्ये ही दोन्ही विमाने एकमेकांपासून अवघ्या काही मीटर अंतरावर उभी होती. अर्थात हवाई शक्तीचे जागतिक प्रदर्शन असूनही, सर्वांच्या नजरा भारताच्या स्वत:च्या fifth generation stealth fighter, the Advanced Medium Combat Aircraft (AMCA), वर होत्या. प्रदर्शनात AMCA च्या पूर्ण आकारातील मॉडेलने उपस्थितांमध्ये उत्साह आणि अनुमान दोन्ही निर्माण केले. रशिया आक्रमकपणे Su-57 च्या सह-उत्पादनासाठी जोर देत आहे तल अमेरिका F-35 तयार करण्यास उत्सुक आहे. यासगळ्यात भारताचे एरोस्पेस नियोजक स्वदेशी AMCA कार्यक्रमासाठी वचनबद्ध आहेत.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत वैयक्तिकरित्या F-35 भारताला विकण्याची मागणी केली असली तरी, वास्तविकता अशी आहे की, F-35 हे विविध कारणांमुळे IAF ची पसंतीचे विमान नाही.
भारतीय हवाई दलाला F-35 किंवा Su-57 मध्ये स्वारस्य का नाही?
F-35, प्रति युनिट अंदाजे 80 दशलक्ष डॉलर किंमतीचे आहे, एव्हीओनिक्स, क्षेपणास्त्रे आणि फोर्स मल्टीप्लायर्ससाठी अतिरिक्त खर्च येतो, ज्यामुळे त्याचा एकूण खर्च लक्षणीयरित्या वाढतो. शिवाय, त्याच्या देखभालीचा खर्च प्रचंड आहे आणि एक विश्वासार्ह दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार म्हणून अमेरिकेबद्दल भारताला विश्वास नाही. याव्यतिरिक्त, F-35 सह तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी (ToT) कोणतीही तरतूद नाही, कारण हा विदेशी लष्करी विक्री (FMS) व्यवहार असेल. शिवाय, अमेरिकेने यासंबंधीच्या आधीच्या चर्चेनुसार विमान चालवण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.
दुसरीकडे, Su-57 एक सक्षम लढाऊ विमान असले तरी त्याची लढाऊ परिणामकारकता सिद्ध झालेली नाही. रशियन विमानांना सामान्यत: उच्च देखभाल खर्च आणि खराब सेवाक्षमतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्याचा पुरावा Su-30 फ्लीटने दर्शविला आहे, जिथे जवळपास 40 टक्के विमाने काही वेळा जमिनीवरच राहिली आहेत. Su-57 चा उच्च टर्नअराउंड वेळ आणि जटिल देखभाल आवश्यकता यामुळे पर्याय म्हणून विचार करण्यापासून भारतीय हवाई दल परावृत्त होते.
आयएएफ स्वदेशी विमानांना का पसंती देते
हे मुद्दे लक्षात घेता, IAF ने आतापर्यंत AMCA प्रकल्पाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. अर्थात तो सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यंतरी, IAF ने MiG-21 विमाने टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त झाल्यावर उरलेली पोकळी भरून काढण्यासाठी LCA तेजसवर अवलंबून राहण्याची योजना आखली होती. मात्र, तेजस Mk1 आणि Mk1A प्रकारांच्या वितरणात विलंब झाल्यामुळे दलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांमध्ये व्यत्यय आला आहे. AMCA कार्यान्वित होईपर्यंत तेजस Mk1A आणि प्रस्तावित मार्क II एक महत्त्वपूर्ण पूल म्हणून काम करतील अशी IAF ची अपेक्षा होती, परंतु सतत उद्भवणाऱ्या अडथळ्यांमुळे हवाई दल प्रमुख निराश झाले आहे.
वितरणातील विलंबामुळे IAF च्या आधुनिकीकरणाला बाधा
सध्या, IAF कडे फक्त 31 फायटर स्क्वॉड्रन आहे. खरेतर मंजूर स्क्वॉड्रन 42 च्या तुलनेत ही संख्या कमी आहे. त्यामुळे तेजस Mk1A चा वेळेवर समावेश करणे महत्वाचे आहे, कारण हे विमान भारताच्या हवाई संरक्षणाचा कणा बनेल अशी अपेक्षित आहे. मात्र, त्याच्या वितरणाचा घोळ सुरूच आहे. IAF अजूनही 2010 मध्ये ऑर्डर केलेल्या 40 तेजस Mk1 जेटपैकी चारची वाट पाहत आहे आणि 2021 मध्ये ऑर्डर केलेल्या 83 तेजस Mk1A जेटपैकी एकही विमान अद्याप मिळालेले नाही. HAL सहा महिन्यांत 97 अतिरिक्त तेजस Mk1A विमानांच्या ऑर्डरवर स्वाक्षरी करेल, तरीही उत्पादनातील अडथळे हा चिंतेचा विषय आहे.
HAL ने मुळात दरवर्षी 16 विमानांचे उत्पादन करण्याची योजना आखली होती, परंतु पुरवठा साखळीतील व्यत्यय, विशेषत: GE कडून इंजिन वितरणातील विलंब, यामुळे उत्पादन थांबले आहे. Mk1A साठी जीई F-404 इंजिने, जी 2023 मध्ये येणार होती, त्यांना दोन वर्षांचा उशीर झाला आहे. याव्यतिरिक्त, तेजस Mk2 साठी GE F-414 इंजिनचा करार अद्याप प्रलंबित आहे.
भविष्यातील प्रगती
दरम्यान, AMCA प्रकल्पासाठी 110 KN जेट इंजिन सह-विकसित करण्यासाठी भारत फ्रान्ससोबत चर्चा करत आहे. तर दुसरीकडे, अमेरिका भारताच्या भविष्यातील लढाऊ विमानांसाठी जीई एफ-414 इंजिन वापरण्यासाठी दबाव आणत आहे. HAL वर वितरणाचा वाढता दबाव आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढण्याची शक्यता असल्याने, भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमाचे भविष्य जलद सुधारणा आणि कार्यक्षम अंमलबजावणीवर अवलंबून आहे.
रवी शंकर