अमेरिकेच्या पाच माजी संरक्षण सचिवांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ‘बेपर्वाईने’ बडतर्फ केल्याबद्दल जोरदार टीका केली. अतिशय तीव्र शब्दांमध्ये लिहिलेल्या पत्रात, त्यांनी ट्रम्प यांच्यावर पारंपरिकपणे अराजकीय अमेरिकी सैन्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि राष्ट्रपती पदाच्या अधिकारावरील कायदेशीर तपासणी काढून टाकण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सर्वोच्च कायदेशीर सल्लागारांची हकालपट्टी करण्यासाठी पदाचा वापर केल्याचा आरोप केला.
डेमोक्रॅटिक प्रशासनाखाली काम केलेल्या चार संरक्षण सचिवांनी तसेच 2017 ते 2019 पर्यंत ट्रम्प यांचे पहिले पेंटागॉन प्रमुख म्हणून काम केलेले निवृत्त मरीन जनरल जेम्स मॅटिस यांनी हे पत्र लिहिले आहे.
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कृती आपल्या सर्व-स्वयंसेवक शक्तीला कमकुवत करत असून आपली राष्ट्रीय सुरक्षाही कमकुवत करत आहेत,” असे त्यांनी लिहिले.
मॅटिस यांच्यासोबत, या पत्रावर स्वाक्षरी करणारे-विल्यम पेरी, लिओन पॅनेटा, चक हेगल आणि लॉयड ऑस्टिन-यांनी बिल क्लिंटन, बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक अध्यक्षीय प्रशासनात काम केले.
ट्रम्प यांनी शुक्रवारी उशिरा अनेकांच्या हकालपट्टीची घोषणा केली परंतु त्यांच्या प्रशासनाने अद्याप या अभूतपूर्व उलथापालथी कशामुळे झाल्या याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिलेले नाही, ज्यात नौदलाचे प्रमुख, लष्करी सेवेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी, ॲडमिरल लिसा फ्रॅन्चेट्टी यांची हकालपट्टी देखील समाविष्ट आहे.
हवाई दलाचे जनरल सी. क्यू. ब्राऊन हे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष होणारे केवळ दुसरे कृष्णवर्णीय अधिकारी होते आणि त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील अर्ध्याहून अधिक काळ बाकी होता.
“ट्रम्प यांनी केलेल्या बडतर्फीमुळे लष्करातही आता राजकारण आणण्याच्या प्रशासनाच्या इच्छेबद्दल त्रासदायक प्रश्न उपस्थित होत आहेत,” असे त्यांनी लिहिले. “अनेक अमेरिकन लोकांप्रमाणेच-अनेक सैनिकांसह-आम्हाला असा निष्कर्ष काढणे भाग आहे की या नेत्यांना पूर्णपणे पक्षपाती कारणांमुळे काढून टाकण्यात आले आहे.”
व्हाईट हाऊसने या पत्रावर अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संरक्षण सचिव पीट हेगसेथ, जे पेंटागॉनमधील अशा उपक्रमांचे तीव्र विरोधक आहेत, ते म्हणतात की हा सगळाच प्रकार पक्षपाती आहे, त्यांच्या नामांकनापूर्वी ब्राउन यांना केवळ ते कृष्णवर्णीय असल्यामुळे नोकरी मिळाली होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
या सगळ्या बडतर्फींबद्दल विचारले असता, हेगसेथ यांनी रविवारी फॉक्स न्यूजला सांगितले की ब्राऊन हे सन्माननीय होते मात्र “त्या क्षणांसाठी योग्य माणूस नव्हता” आणि ट्रम्प यांना स्वतःचा संघ निवडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
माजी संरक्षण सचिवांनी अमेरिकी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेटला ट्रम्प यांच्या बडतर्फीच्या “राष्ट्रीय सुरक्षेच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी” सुनावणी घेण्याचे आवाहन केले. कॉंग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.
20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून, ट्रम्प यांनी नोकरशाही कमी करण्याच्या आणि अधिक निष्ठावंतांना नियुक्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत शेकडो नागरी सेवक आणि एजन्सीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले किंवा बाजूला केले.
पक्षपाती राजकारणाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कारकिर्दीचा न्यायनिवाडा केला गेला तर पेंटागॉनमधील कृती अमेरिकनांना सैनिकी जीवन निवडण्यापासून रोखू शकतात, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. ‘सत्तेसमोर सत्य’ बोलण्याचाही परिणाम भीतीदायक होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
“या बेपर्वाईच्या कृत्यांसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरण्यासाठी आणि त्यांच्या घटनात्मक देखरेखीच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडण्यासाठी आम्ही अमेरिकी काँग्रेसला विनंती करण्यासाठी लिहित आहोत,” असे त्यांनी लिहिले.
ट्रम्प यांनी ब्राऊन यांच्या जागी निवृत्त तीन तारांकित जनरल डॅन केन यांची निवड केली आहे.
केन, एक निवृत्त एफ-16 पायलट असून त्यांना फोर-स्टार जनरल म्हणून पदोन्नती दिली जाईल. त्यानंतर देशाच्या लष्कराचे प्रमुख म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ मिळविण्यासाठी त्यांना सिनेटच्या संभाव्य मंजुरी प्रक्रियेतून जावे लागेल.
माजी संरक्षण सचिवांनी लिहिले, “सिनेटर्सनी संरक्षण विभागाच्या कोणत्याही नवीन नामांकनांना मंजुरी देण्यास नकार दिला पाहिजे, ज्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल डॅन केन यांना जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे पुढील अध्यक्ष म्हणून समाविष्ट केले जाणार आहे.”
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)