
सायबर युद्ध, संकरीत युद्ध, अंतराळ-आधारित आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यासह उदयोन्मुख धोक्यांशी भारतीय सुरक्षा दलांनी जुळवून घेण्याच्या गरजेवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला आहे. राजधानीत एका उच्चस्तरीय परिषदेत बोलताना सिंह यांनी पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना एकत्रित करणाऱ्या सर्वांगीण राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
“आताचे शत्रू नेहमीच पारंपरिक शस्त्रांसह येत नाहीत; सायबर हल्ले, चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमा आणि अंतराळावर आधारित हेरगिरी हे नवीन युगाचे धोके म्हणून उदयाला येत आहेत, ज्यासाठी प्रगत उपायांची आवश्यकता आहे”, असे सिंह म्हणाले. अंतर्गत सुरक्षा ही आता केवळ दहशतवाद, फुटीरतावादी चळवळी आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी व्यवस्थापनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक स्थिरतेवर परिणाम करू शकणाऱ्या नवीन धोक्यांसाठीही सज्ज राहिली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि गृह मंत्रालय (एमएचए) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा उद्देश केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) अधिकाऱ्यांना बदलत्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीसह सुसज्ज करणे हा आहे. डीआरडीओच्या Directorate of Low Intensity Conflict (डीएलआयसी) आयोजित या कार्यक्रमामुळे अंतर्गत सुरक्षा चौकट आणि आपत्ती प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्यावर चर्चा झाली.
सुरक्षेसाठी सहयोगात्मक दृष्टीकोन
अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा धोक्यांमधील वाढत्या परस्पर व्याप्तीवर सिंह यांनी भर दिला आणि सुरक्षा संस्थांमध्ये एकात्मिक दृष्टिकोन असावा असे आवाहन केले. “आधुनिक जगातील सुरक्षा आव्हाने वेगाने विकसित होत आहेत आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांच्यातील परस्पर व्याप्ती वाढत आहे. मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी भारत सुनिश्चित करण्यासाठी आपल्या संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.
डीआरडीओ आणि एमएचए यांच्यातील समन्वयाला प्रोत्साहन देताना सिंह यांनी दोन्ही संस्थांना निर्धारित कालमर्यादेत संयुक्तपणे विकसित आणि तैनात करता येण्याजोग्या संरक्षण उत्पादनांची एक सामायिक यादी तयार करण्याचे आवाहन केले. “आपल्या सुरक्षा दलांना पुढे राहण्यासाठी सर्वोत्तम साधने आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अंतर्गत सुरक्षा संस्थांमध्ये तैनात करण्यासाठी लहान शस्त्रे, पाळत ठेवण्याची उपकरणे आणि ड्रोन प्रणाली यासारख्या उत्पादनांचा समावेश किंवा मूल्यमापन होत असताना आधुनिकीकरणावर डीआरडीओचे लक्ष केंद्रित झालेले पाहणे उत्साह वाढवणारे आहे,” असे ते म्हणाले.
सुरक्षा आणि मानवतावादी प्रयत्नांसाठी तंत्रज्ञान
आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका देखील संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केली. “तंत्रज्ञानाची भूमिका केवळ संरक्षणातच नाही तर शांतता आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करण्यातही आहे. बुलेटप्रूफ जॅकेट, ड्रोन, पाळत ठेवण्याची उपकरणे आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञान यासारख्या प्रगत प्रणालींचा लाभ केवळ सुरक्षा कार्यांसाठीच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन आणि मानवतावादी मदतीसाठीही घेतला पाहिजे,”असे ते म्हणाले.
थर्मल इमेजिंग कॅमेरे, ड्रोन-आधारित शोध प्रणाली आणि पीडितांचे स्थान निश्चित करणारी उपकरणे यासारखे तंत्रज्ञान संकटकाळातील जीवितहानी आणि नुकसान लक्षणीयरीत्या कमी करू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डीआरडीओकडून अस्मी मशीन पिस्तुलचे तंत्रज्ञान लोकेश मशीनरीला हस्तांतरित
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे डीआरडीओने अस्मी 9×19एमएम मशीन पिस्तुलचे तंत्रज्ञान (टीओटी) लोकेश मशिनरी टूलला हस्तांतरित केले, जे भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले. हे पाऊल संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाच्या दिशेने भारताचे प्रयत्न अधोरेखित करते.
भारतीय उद्योगांच्या सहकार्याने विकसित केलेल्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनही सिंह यांनी केले. या प्रदर्शनात अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने डीआरडीओने तयार केलेल्या नवकल्पनांचा समावेश होता.
डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, डीआरडीओने विकसित केलेल्या 100 हून अधिक तंत्रज्ञानाचा गृह मंत्रालयाच्या विविध संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे किंवा होणार आहे. त्यांनी पुढे अधोरेखित केले की मूलतः सशस्त्र दलांसाठी तयार केलेल्या अनेक संरक्षण नवकल्पना आता अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती निवारण कार्यांसाठी स्वीकारल्या जात आहेत.
भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी संरक्षण संस्था आणि अंतर्गत सुरक्षा दलांमध्ये सहकार्य वाढवताना सुरक्षा दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला या परिषदेने बळकटी दिली.
टीम भारतशक्ती