यु.एस.चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, काही कार निर्मात्या कंपन्यांना, ज्यांनी विद्यमान मुक्त व्यापार कराराचे पालन केले आहे, त्यांना कॅनडा आणि मेक्सिकोवरील त्यांच्या 25% कर शुल्कातून एक महिन्याची सूट देतील, असे व्हाईट हाऊसने बुधवारी जाहीर केले.
मंगळवारपासून लागू झालेल्या या टॅरिफमधून, चारचाकींसह अन्य कोणत्या उत्पादनांना सूट दिली जाऊ शकते, याचा विचार करण्यासही ट्रम्प तयार आहेत, असे व्हाईट हाऊसने सांगितले.
हे वृत्त जाहीर झाल्यानंतर, ऑटो स्टॉक्समध्ये वाढ झाली असून जनरल मोटर्सचे स्टॉक 5.3% टक्क्यांनी तर फोर्ड कंपनीचे स्टॉक्स 4.1% टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले.
ऑटोमेकर्ससाठी करांचे आव्हान
ट्रम्प यांनी लागू केलेले अतिरिक्त कर, ऑटोमेकर्ससाठी खूप अडचणीचे ठरत आहेत, कारण बहुतांशी कार निर्माते हे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीनही देशांमध्ये वाहनांचे उत्पादन करतात आणि अनेकदा उत्तम निर्मितीसाठी कारचे पार्ट्स एकापेक्षा अधिक वेळेला उत्तर अमेरिकन सीमांवर पाठवले जातात.
ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे, यू.एस.-मेक्सिको-कॅनडा कराराच्या जटिल सामग्री नियमांचे पालन करणाऱ्या कार आणि ट्रक उत्पादकांसाठी करामध्ये एक महिन्याची सूट दिली जाईल, जी प्रामुख्याने फोर्ड, जनरल मोटर्स (GM) आणि स्टेलांटिससाठी फायदेशीर ठरेल.
ट्रम्प कॅनडाच्या ऊर्जा आयातीवरील १०% कर, जसे की क्रूड तेल आणि पेट्रोलियम, जे यूएसएमसीए नियमांचे पालन करतात, ते देखील भविष्यात हटवू शकतात, असे चर्चा करणाऱ्या एका स्रोताने सांगितले.
कर सवलतीची ही घोषणा एका फोन कॉल नंतर करण्यात आली, ज्यात ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सांगितले की, त्यांचा देश फेंटनल तस्करी थांबवण्यासाठी पुरेसे काम करत नाही. दरम्यान, “हे टेलिफोनिक संभाषण एका चांगल्या नोटवर संपले,” असे ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले.
व्यापार तणाव
व्यापार तणावामुळे आधीच अमेरिकेला मोठे नुकसान झेलावे लागू शकते.
बुधवारी प्रकाशित झालेल्या नवीन आकडेवारीनुसार, अमेरिकेत पगारवाढ मंदावली आहे, तसेच नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ कमी झाली आहे, ज्यामागे ट्रम्पच्या धोरणांबद्दलची अनिश्चितता हे एक संभाव्य कारण आहे.
अमेरिकन डॉलर बुधवारी तीन महिन्यांच्या नीचांकांवर पोहचला होता तर यु.एस. स्टॉक निर्देशांक या आठवड्यात सातत्याने घसरत आहेत. नॅस्डॅक 20 फेब्रुवारीपासून 9 टक्क्यांनी घसरला आहे.
ट्रम्प यांनी चिनच्या उत्पादनांवर अतिरिक्त 10% शुल्क लागू केले आहे.
डेट्रॉईटसाठी एक वरदान
फोर्ड, जीएम आणि स्टेलांटिस द्वारा बनवलेली वाहने, USMCA (United States-Mexico-Canada Agreement) च्या जटिल नियमांचे पालन करतात, ज्यात 75% उत्तर अमेरिकन सामग्री असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना यू.एस. बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळू शकेल.
हे नियम अधोरेखित करतात की, एका प्रवासी वाहनाची 40% सामग्री यू.एस. किंवा कॅनडामध्ये तयार केली जावी, जे “कोर पार्ट्स” यादीवर आधारित असून, ज्यात इंजिन, ट्रान्समिशन्स, बॉडी पॅनेल आणि चेसिस यांसारखे घटक समाविष्ट आहेत. पिकअप ट्रकसाठी हा थ्रेशोल्ड 45% इतका आहे.
‘ऑटोमेकर्सनी यू.एस. मध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे, पण अशा प्रमुख बदलांचा निर्णय घेण्यापूर्वी, त्यांना टॅरिफ धोरणांसह वाहन उत्सर्जन नियमांवर निश्चितता हवी आहे,’ असे दोन उद्योग स्रोतांनी सांगितले.
“आम्ही ट्रम्प प्रशासनासोबत यू.एस. उत्पादनात आणखी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहोत, पण या बदलांना लागू करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे, जेणेकरून व्यवसायावर आणि आमच्या ग्राहकांवर याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही,” असे स्टेलांटिसने मंगळवारी आपल्या डीलर्सना ईमेलद्वारे सांगितले, ज्याची एक प्रति रॉयटर्सने पाहिली आहे.
करातील ही विशेष सूट, Honda आणि Toyota सारख्या काही विदेशी ऑटोमेकर्ससाठी देखील फायदेशीर ठरू शकेल, ज्यांचे यू.एस. हे उत्पादनाचे मुख्य ठिकाण आहे. मात्र दुसरीकडे नियमांचे पालन करत नसलेल्या काही प्रतिस्पर्ध्यांना, पूर्ण 25% यू.एस. टॅरिफ्स भरणे अनिवार्य आहे.
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)