सौदी बैठक: युक्रेनच्या भूमिकेची अमेरिका करणार तपासणी

0
युक्रेनच्या
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 10 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील परराष्ट्र विभागात इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलट्टी यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना. (रॉयटर्स/क्रेग हडसन/फाईल फोटो)

युद्ध संपावे यासाठी रशियाला महत्त्वपूर्ण सवलती देण्यासाठी युक्रेनची कितपत तयारी आहे याचे  मूल्यांकन करण्यासाठी सौदी अरेबियातील युक्रेनबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीचा वापर करण्याची अमेरिकेने योजना आखली आहे असे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील बैठकीत झालेल्या वादानंतर युक्रेनचे प्रतिनिधीमंडळ ट्रम्प प्रशासनाशी संबंध सुधारावेत यासाठी गंभीर असल्याची चिन्हे आहेत का याचीही सौदी अरेबियातील बैठकीत चाचपणी केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रुबिओ सामील होणार

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेसाठी  रविवारी जेद्दाला रवाना होतील. या चर्चेचे नेतृत्व झेलेन्स्की यांचे वरिष्ठ सहाय्यक आंद्री येरमाक करणार आहेत.

रुबिओ यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज आणि ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ हे सहभागी होण्याची शक्यता आहे.

“‘मला शांतता हवी आहे’ आणि ‘मी कोणत्याही गोष्टीशी तडजोड करण्यास नकार देतो’ असे तुम्ही एकाचवेळी म्हणू शकत नाही,” असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने आगामी चर्चेबद्दल सांगितले.

“आम्हाला हे पाहायचे आहे की युक्रेनियन लोकांना केवळ शांततेतच नव्हे तर वास्तववादी शांततेतही रस आहे का.” असे सांगत दुसरा अधिकारी म्हणाला, “जर त्यांना फक्त 2014 किंवा 2022 च्या सीमांमध्ये रस असेल, तर ते तुम्हाला काहीतरी सांगेल.”

या चर्चेबाबत ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला. “या आठवड्यात आम्ही खूप प्रगती करणार आहोत असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी एअर फोर्स वनमध्ये त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या पत्रकारांना सांगितले.

ताकदीची स्थिती

युक्रेनच्या युरोपियन मित्रपक्षांचा असा युक्तिवाद आहे की युक्रेन केवळ ताकदीच्या परिस्थितीतच रशियाशी करार करू शकतो आणि कीवला आक्रमक करणाऱ्यासोबत (रशिया) वाटाघाटी करायला बसवले जाऊ नये.

“रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शांतता नको आहे आणि युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाचा स्पष्ट पराभव झाला नाही तर रशिया इतर युरोपीय देशांवर हल्ला करेल,” असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका – रशिया संबंध पूर्णपणे बिघडले होते. हे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये सौदीची राजधानी रियाधमध्ये वेगळ्या द्विपक्षीय चर्चेसाठी रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली.

ट्रम्प यांचा उद्वेग

ट्रम्प यांनी अलिकडच्या आठवड्यात युक्रेनबद्दल आपला उद्वेग व्यक्त करताना म्हटले आहे की पूर्व युरोपीय राष्ट्राकडील मनुष्यबळ आणि संसाधने कमी होत आहेत आणि त्यांनी रशियाबरोबर त्वरित चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.

ट्रम्प प्रशासनाने अलिकडेच युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्याला स्थगिती दिली असून काही गुप्त माहितीची देवाणघेवाणही बंद केली आहे, त्यांच्या प्रशासनाने युक्रेनियन लोक संभाव्य शांतता प्रक्रियेसाठी पुरेसे तयार नसल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की अमेरिकेने गुप्त माहितीवर आणलेली बंदी “जवळजवळ” उठवली आहे.

टीकाकारांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्य या निर्णयामुळे रशियाची बाजू बळकट होऊन युद्ध लांबणीवर पडण्याचा धोका आहे. त्यामुळे रशिया शस्त्रास्त्रे खाली ठेवण्याची आणि न्याय्य शांतता करार करण्याची शक्यता कमी होते.

रशियाची प्रगती

रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमध्ये संथ परंतु स्थिर प्रगती केली आहे, तर गेल्या उन्हाळ्यात रशियाच्या कुर्स्क प्रदेशात घुसलेले हजारो युक्रेनियन सैन्य आता रशियन सैन्याच्या वेढ्यात अडकले आहेत.

एका निवेदनात, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते ब्रायन ह्यूजेस म्हणाले की, झेलेन्स्की यांनी 28 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्याशी बैठकीनंतर झालेल्या तीव्र वादानंतर अमेरिका-युक्रेन संबंध पुनर्संचयित करण्याच्या दृष्टीने प्रगती केली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकन काँग्रेससमोर केलेल्या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या टिप्पण्यांकडे ह्यूजेस यांनी लक्ष वेधले. त्यांना (ट्रम्प यांना) युक्रेनियन नेत्याकडून एक सलोख्याची नोप मिळाली आहे.

“येत्या आठवड्यात सौदी अरेबियातील बैठकीसह, आम्ही अधिक सकारात्मक हालचाली ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ज्यामुळे आशा आहे की शेवटी हे भयंकर युद्ध आणि रक्तपात संपेल,” असे ह्यूजेस म्हणाले.

मध्य पूर्व दूत, विटकॉफ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की त्यांना चर्चेदरम्यान संभाव्य युद्धविराम आणि शांतता करारासाठी “फ्रेमवर्क” वर चर्चा करण्याची आशा आहे.

खनिज करार

जेद्दाहमध्ये काय निर्णय होतो यावर अमेरिका आणि युक्रेनमधील खनिज कराराचे नशीब अवलंबून आहे. या करारामध्ये युक्रेनमधील विशिष्ट खनिज संसाधनांच्या बदल्यात अमेरिकेकडून सुरक्षा हमी समाविष्ट करू इच्छित आहे.

झेलेन्स्की यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान या करारावर झेलेन्स्की
आणि ट्रम्प स्वाक्षरी करणार होते. मात्र या दोघांमध्ये व्हाईट हाऊस झालेल्या वादानंतर त्यावर सही झाली नाही.

तेव्हापासून, दोन्ही बाजूंनी करारावर स्वाक्षरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परंतु अद्याप कोणतीही स्वाक्षरी झालेली नाही. ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की त्यांना वाटते की युक्रेन त्यावर स्वाक्षरी करेल, झेलेन्स्कीच्या सरकारने त्यांना शांतता हवी आहे हे दाखवावे अशी त्यांची इच्छा आहे.

“ते खनिज करारावर स्वाक्षरी करतील पण त्यांना शांतता हवी आहे… ती त्यांनी पुरेशा प्रमाणात मला दाखवली नाही,” असे ते म्हणाले.

स्टेट डिपार्टमेंट आणि वॉशिंग्टनमधील युक्रेनियन दूतावासाने या संदर्भातील प्रतिक्रियेसाठी  केलेल्या विनंत्यांना त्वरित प्रतिसाद दिला नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 


Spread the love
Previous articleEuropean Arms Imports Surge Record 155%, SIPRI Reports
Next articleUkraine War: युरोपियन शस्त्रास्त्रांच्या आयातीत 155% विक्रमी वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here