भारत-किर्गिझस्तान यांच्यातील विशेष संयुक्त लष्करी सरावाला सुरूवात

0
भारत-किर्गिझस्तान
भारत-किर्गिझस्तान यांच्यातील 12वा खंजर विशेष संयुक्त लष्करी सराव

भारत – किर्गिझस्तान दरम्यान होणाऱ्या खंजर या विशेष संयुक्त लष्करी सरावाच्या 12व्या आवृत्तीला आजपासून म्हणजे 10 मार्चपासून सुरूवात झाली असून तो 23 मार्च 2025 पर्यंत किर्गिझस्तानमध्ये पार पडणार आहे. त्यासाठी भारतीय लष्कराची एक तुकडी किर्गिझस्तानला रवाना झाली. या सरावात दोन्ही देशांचे सैन्य उंच आणि शहरी युद्ध परिस्थितीमध्ये एकत्र प्रशिक्षण घेताना दिसतील.

2011 मध्ये सुरु झालेला हा  लष्करी सरावाचा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. भारत आणि किर्गिझस्तान दरम्यान विविध ठिकाणी होणाऱ्या सरावांमुळे वृद्धिंगत होत असलेले धोरणात्मक राजनयिक संबंध प्रतिबिंबित होतात. या सरावाची मागील आवृत्ती जानेवारी 2024 मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती.

भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल) करणार आहे तर किर्गिझस्तानची स्कॉर्पियन ब्रिगेड त्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. शहरी आणि उंच पर्वतीय भूभागातील प्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या कारवायांतील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे. या सरावादरम्यान स्नायपिंग, कॉम्प्लेक्स बिल्डिंग इंटरवेंशन, पर्वतीय कौशल्ये यासारख्या अत्याधुनिक विशेष दलांच्या कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.

कठोर प्रशिक्षणाबरोबरच, या सरावामध्ये सांस्कृतिक आदान प्रदानाचाही समावेश आहे. त्यामध्ये किर्गिझस्तानचा नवरोजचा उत्सवही साजरा केला जाणार आहे. या सरावामुळे उभय देशांदरम्यान मैत्री दृढ होईल.

या सरावामुळे, आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि कट्टरतावाद या सामायिक चिंता दूर करण्यावर भर दिला जाईल तसेच उभय देशांना आपले संरक्षण संबंध मजबूत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा सराव या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित कऱण्याप्रती भारत आणि किर्गिझस्तान यांच्या कटिबद्धतेचा पुनरूच्चार करतो.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleअमेरिका-दक्षिण कोरिया सैन्य सरावाला धक्का; उत्तर कोरियाने डागली क्षेपणास्त्रे
Next articleIndian Warship To Participate In Mauritius National Day Celebrations 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here