
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिंडमनसोबतच्या पॉडकास्टमध्ये, भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. “या क्षेत्रातील जागतिक AI क्रांती भारताच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही,” असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा विकास मूलतः एक सहकार्यात्मक प्रयत्न आहे, कोणताही देश पूर्णपणे स्वतंत्र्यरित्या AI तंत्रज्ञान विकसित करू शकत नाही,” असे मोदींनी पॉडकास्टमध्ये बोलतेवेळी सांगितले.
“जगाने या क्षेत्रात कितीही प्रगती केली, तरी भारताच्या योगदानाशिवाय AI ची वैश्विक क्रांती अपूर्ण आहे,” असे ते म्हणाले.
“भारताने विशिष्ट वापर प्रकरणांसाठी AI-आधारित अनुप्रयोगांवर सक्रियपणे काम केले आहे आणि त्याने व्यापक प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी एक अनोखे मार्केटप्लेस-आधारित मॉडेल तयार केले आहे”, असेही त्यांनी सांगितले.
या पॉडकास्टमध्ये मोदींनी, भारतीय तरुणांच्या विस्तृत कौशल्यांचा ‘महत्त्वपूर्ण ताकद’ असा उल्लेख केला आणि म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे (AI Technology) मूलतः मानवी बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालवले जाते तसेच आकारित आणि मार्गदर्शित केले जाते आणि भारतीय तरुणांमध्ये बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची अजिबात कमतरता नाही.”
5G रोलआऊट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताच्या 5G रोलआउटमध्ये झालेल्या वेगवान प्रगतीचाही आढावा घेतला, जे सध्या जागतिक अपेक्षेपेक्षा खूपच पुढे गेले आहे.
मोदींनी भारताच्या अंतराळ मोहिमांच्या किफायतशीर खर्चावरही जोर दिला, जसे की चंद्रयान मोहीम, जिचा खर्च हॉलीवूडच्या एखाद्या ब्लॉकबस्टरपेक्षा कमी होता. चंद्रयान मोहिमेतील भारताची कार्यक्षमता आणि नवकल्पकतेचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
ते म्हणाले की, “या यशामुळे भारतीय टॅलेंटसाठी जागतिक पातळीवर आदर निर्माण होतो आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरांचे प्रतिबिंब उंचावले जाते.”
मोदींनी, भारतीय वंशाच्या नेत्यांच्यां जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील यशावरही भाष्य केले आणि ते भारताच्या सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असल्याचे सांगितले, ज्यात समर्पण, नैतिकता आणि सहकार्याचा समावेश आहे.
ते म्हणाले की, “भारतातील लोकांना, विशेषतः जे जॉइंट फॅमिली आणि खुल्या समाजातून येतात, त्यांना जटिल कार्ये आणि मोठ्या संघाचे नेतृत्व प्रभावीपणे पार पाडणे सोपे जाते.”
त्यांनी भारतीय व्यावसायिकांची समस्या सोडवण्याची क्षमता आणि विश्लेषणात्मक विचारशक्तीचा देखील उल्लेख केला, जी भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवते.
AI आणि ह्युमन रिप्लेसमेंट
AI टेक्नॉलॉजी माणसांची जागा घेणार का, या चिंतेचे निराकरण करताना पंतप्रधान म्हणाले की, “तंत्रज्ञान नेहमीच मानवतेसोबत प्रगती करत आले आहे आणि मानवही तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे”
ते म्हणाले की, “मानवी कल्पनाशक्ती ही इंधन आहे, तर AI त्यावर आधारित तंत्रज्ञान. AI अनेक असाध्य गोष्टी साध्य करु शकते परंतु कोणतेही तंत्रज्ञान कधीच मानवी मनाच्या अमर्याद सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीची जागा घेऊ शकत नाही.”
(IBNS च्या इनपुट्ससह)