
वाढता जागतिक भू-राजनैतिक तणाव आणि वाढत्या समुद्री सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 मार्च रोजी, युवा नौदल अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना ‘तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये कायम आघाडीवर राहण्याचा’ संदेश दिला.
राष्ट्रपती भवनात, भारतीय नौदल सामग्री व्यवस्थापन सेवा आणि भारतीय नौदल आयुध सेवा प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना, राष्ट्रपतींनी भारतीय नौदलाला कार्यक्षम लॉजिस्टिक्स आणि आयुध व्यवस्थापनाद्वारे बळकट करण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.
“भारत जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असताना, अव्याहत इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि सेवा वितरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरेल,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
जागतिक पातळीवर उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानात प्रगती साधण्यासाठी, तरूण अधिकाऱ्यांनी आपले ज्ञान सतत अपडेट करत राहणे आणि आपल्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण दृषटिकोन स्विकारणे आवश्यक असल्याचे, राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.
मुर्मू यांनी उपस्थित तरुणांना राष्ट्र आणि नौदलाच्या सेवेत स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या योगदानामुळे भारताच्या सागरी सामर्थ्याला नक्कीच बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
टीम भारतशक्ती