येमेनमधील तीन बंदरे आणि वीज प्रकल्पातील हुती स्थळांवर इस्रायलचे हल्ले

0

इस्रायली लष्कराने सोमवारी सकाळी येमेनमधील तीन बंदरांवर आणि एका वीज प्रकल्पातील हुतींच्या ठिकाणांवर हल्ले केले असल्याचे लष्कराने जाहीर केले. या कारवाई अंतर्गत इस्रायलने जवळजवळ महिनाभराने येमेनी भूभागावर केलेला हा  पहिला हल्ला आहे.

होदेइदाह, रास इसा आणि सलिफ बंदरे आणि रास कान्तिब वीज प्रकल्पावर कयण्यात आलेले हल्ले हुतींकडून इस्रायलवर वारंवार करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत, असे लष्कराने सांगितले.

इस्रायली लष्कराने सांगितले की हल्ल्यांनंतर काही तासांत, येमेनमधून दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. मात्र ती अडवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला. अर्थात यात कितपत यश मिळाले याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

इस्रायली रुग्णवाहिका सेवेने सांगितले की येमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे  कोणत्या मालमत्तेला धक्का बसल्याचे किंवा जीवितहानी झाल्यासंदर्भात कोणतेही कॉल आलेले नाहीत.

ऑक्टोबर 2023 मध्ये गाझा युद्ध सुरू झाल्यापासून, इराणचा पाठिंबा असलेल्या हुतींनी इस्रायलवर आणि लाल समुद्रातील जहाजांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला केला आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारात व्यत्यय निर्माण झाला‌. हुतींच्या मते  पॅलेस्टिनींना पाठिंबा दाखवण्यासाठी केलेली ती कृती होती.

इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनपैकी बहुतांश क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आहेत किंवा हल्ले करण्यात कमी पडले आहेत कारण इस्रायलनेही प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आहेत.

इस्रायलने रास इसा बंदरातील गॅलेक्सी लीडर जहाजावरही हल्ला केला, जे 2023 च्या अखेरीस हुतींनी ताब्यात घेतले होते, असे लष्कराने सोमवारी सांगितले.

“हुती या दहशतवादी सैन्याने जहाजावर रडार सिस्टम बसवली असून आंतरराष्ट्रीय सागरी जागेत जहाजांचा मागोवा घेण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत होता, जेणेकरून हुतींना जहाजांवर हल्ले करून दहशतवादी कारवायांना चालना देता येत होती,” असे लष्कराने म्हटले आहे.

सुरू असणारा संघर्ष

हल्ल्यांनंतर हुतींच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ‘मोठ्या प्रमाणात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून’ इस्रायली हल्ल्यांचा सामना केला.

रहिवाशांनी सांगितले की, लाल समुद्रातील बंदर शहर होदेइदाहवर इस्रायली हल्ल्यांमुळे मुख्य वीज केंद्र बंद पडले आणि शहर अंधारात बुडाले.

यामध्ये जीवितहानी झाल्याचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही.

हुती-संचालित अल-मसिराह टीव्हीने वृत्त दिले आहे की, इस्रायली सैन्याने येमेनच्या तीन बंदरांवर लोकांना स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर लगेचच इस्रायलने होदेइदाहवर अनेक हल्ले केले.

होदेइदाहच्या जवळ एका जहाजावर हल्ला झाल्यानंतर आणि जहाजातील कर्मचाऱ्यांनी ते पाण्यात उतरवल्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला.

हल्ल्याची जबाबदारी कोणीही ताबडतोब स्वीकारलेली नाही, परंतु सुरक्षा फर्म अम्ब्रेने म्हटले आहे की हे जहाज हुतींंच्या लक्ष्याच्या सामान्य प्रोफाइलमध्ये बसणारे होते.

इस्रायलने या प्रदेशातील इराणच्या इतर मित्रांना – लेबनॉन समर्थित हिजबुल्लाह आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास – गंभीरपणे नुकसान पोहोचवले आहे.

तेहरान-समर्थित हुती आणि इराकमधील इराण समर्थित सशस्त्र गट अजूनही संघर्षाच्या पावित्र्यात उभे आहेत.

या गटाचा नेता अब्दुल मलिक अल-हुती याने जागतिक शक्तींना आव्हान देणारी शक्ती तयार केली आहे.

अल-हुतीच्या मार्गदर्शनाखाली, या गटात हजारो लढाऊ सैनिक सहभागी झाले असून त्यांनी सशस्त्र ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मिळवली आहेत. सौदी अरेबिया आणि पश्चिमेकडील देश म्हणतात की शस्त्रे इराणकडून येतात. तेहरानने मात्र याला नकार दिला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 

+ posts
Previous articleजागतिक हवामान संक्रमण निधीसाठी, BRICS नेत्यांचे श्रीमंत देशांना आवाहन
Next articleThe Politics of Rebirth: Evolution of Dalai Lama Reincarnation Methods

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here