भारतीय नौदलातील लढाऊ विमानांबाबतचा पेच, ‘आत्मनिर्भरतेसाठी’ अडथळा

0

भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या, ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर (TEDBF) प्रकल्पात पुरेशी प्रगती न होणे, तसेच LCA Mk-2 आणि एडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) च्या नौदल आवृत्तीत, नौदलाने सक्रीय सहभाग न दर्शवणे आणि LCA (Navy) साठीच्या ऑर्डरचा अभाव, हे सर्व पैलू भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरतेसाठी’ गंभीर अडथळा ठरू शकतात. त्यामुळे तात्काळ धोरणात्मक बदल करणे आवश्यक झाले आहे.

LCA Mk-1 (Navy) प्रकल्पाला, ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ने 2003 मध्ये मंजुरी दिली होती, जी हवाई दलाच्या आवृत्तीच्या पहिल्या उड्डाणानंतर दोन वर्षांनी मिळाली. नौदलाच्या प्रोटोटाइपने 2012 मध्ये पहिले उड्डाण केले, 2029 मध्ये गोव्यातील शोर बेस्ड टेस्ट फॅसिलिटीवर (SBTF) पहिले अरेस्टेड लँडिंग (विमानाला अडकवून उतरवणे) केले, 2020 मध्ये INS विक्रमादित्यवर आणि 2023 मध्ये INS विक्रांतवर यशस्वीपणे उतरले. मात्र, हे विमान नियोजित वजनापेक्षा सुमारे 500 किलो अधिक जड होते आणि त्याची पेलोड क्षमता (वाहून नेण्याची क्षमता) केवळ 2.5 टन असल्याने नौदलाने ते अपुरे मानले. DRDO ने, या विमानाला मर्यादित प्रमाणात सेवेत समाविष्ट करण्याची केलेली शिफारस स्वीकारली गेली नाही, ज्यामुळे आत्मनिर्भरतेच्या धोरणाला मोठा धक्का बसू शकतो.

नौदलाने LCA Mk-2 च्या नौदल आवृत्तीच्या विकासामध्येही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. LCA Mk-2 हे 4.5 पिढीचे (generation) लढाऊ विमान आहे, ज्याची रेंज आणि पेलोड क्षमता अधिक (सुमारे ६.५ टन) आहे. त्याऐवजी, नौदलाने TEDBF च्या विकासाची मागणी केली. TEDBF हे दोन इंजिनांचे, 4.5 पिढीचे लढाऊ विमान असून त्याची पेलोड क्षमता, रेंज आणि पॉवर रिझर्व्ह अधिक आहे. भारतीय महासागरात चीनची वाढती उपस्थिती पाहता, मर्यादित हवाई ताफा असलेल्या विमानवाहू जहाजासाठी अधिक सक्षम लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचा हा निर्णय घेण्यामागचा तर्क होता.

मात्र, चीनच्या पाचव्या पिढीच्या (fifth-generation) J-20 आणि J-35 विमानांच्या समावेशामुळे, आणि 2024 मध्ये J-36 आणि J-50 च्या उड्डाण चाचण्यांमुळे धोकादायक परिस्थिती बदलली आहे. या तुलनेत, 4.5 पिढीचे TEDBF कमी प्रभावी ठरू शकते. TEDBF ची संकल्पना एका दशकापूर्वी मांडली गेली असली तरी, या प्रकल्पाला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे, AMCA, ज्याची कल्पना 5.5 पिढीचे लढाऊ विमान म्हणून केली गेली आहे, त्याला सरकारने आधीच मंजुरी दिली आहे आणि ते भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक योग्य आहे. AMCA कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नौदलाला नवीन मंजुरीची आवश्यकता नाही.

TEDBF ने, अजून आपल्या डिझाइन रिव्ह्यू (design reviews) पूर्ण केलेले नाहीत, त्यातही हा एक नवीन प्रकल्प असल्याने, अनेक प्रणालींचे एकत्रीकरण, चाचणी आणि प्रमाणीकरण (integration, testing, and certification) करणे आवश्यक आहे, जी एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. मर्यादित संख्येतील TEDBF विमानांसाठी स्वतंत्र पुरवठा साखळी, सूची आणि जीवनचक्र समर्थन (separate supply chains, inventories, and lifecycle support) अधिक गुंतागुंत निर्माण करेल. याचा अर्थ, त्याच्या विकासासाठी लागणारा वेळ हा AMCA च्या विकासासाठी लागणाऱ्या वेळेसारखाच असेल.

जागतिक स्तरावर, अनेक लढाऊ विमानांच्या आवृत्त्या जमीन आणि समुद्र दोन्हीकडे वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ, भारतीय नौदलातील MiG-29 आणि राफेल ही दोन विमाने. AMCA हे एक स्टील्थ विमान (stealth aircraft) असले तरी, ते नौदलाच्या मोहिमांसाठी बाह्य हार्डपॉइंट्सवर (external hardpoints) मोठे पेलोड वाहून नेऊ शकते. 26 राफेल-एम (Rafale-M) विमानांच्या समावेशामुळे TEDBF ची गरज कमी झाली आहे, ज्यामुळे त्याची खर्च-प्रतिस्पर्धात्मकता कमी झाली आहे आणि लॉजिस्टिक्स व जीवनचक्र व्यवस्थापन (lifecycle management) आणखी कठीण झाले आहे. मोठ्या प्रमाणात नौदल लढाऊ विमानांची आयात, राफेल-एमच्या परवाना उत्पादनाला (license production) प्रोत्साहन देऊ शकते, ज्यामुळे स्वदेशी नौदल लढाऊ विमान कार्यक्रमांना धक्का बसेल. गेल्या दोन दशकांत भारताने या गंभीर तंत्रज्ञानात उल्लेखनीय प्रगती केली असताना, आत्मनिर्भरतेला हा मोठा धक्का ठरू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, LCA (Navy) विकसित करण्याचा अनुभव AMCA ची सागरी आवृत्ती तयार करण्यासाठी खूप मौल्यवान ठरेल.

LCA Mk-1 (Navy) च्या सेवेत समावेशाची अजूनही प्रतीक्षा आहे, तर स्वदेशी नौदल लढाऊ विमानांचे भविष्य अनिश्चित आहे. नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल अरुण प्रकाश आणि LCA (Navy) चे माजी चाचणी पायलट कमोडोर माओलंकर या दोघांनीही LCA Mk-1 (Navy) चा मर्यादित प्रमाणात हवाई संरक्षण भूमिकेत समावेश करण्याची शिफारस केली आहे. अशा समावेशामुळे परिचालन डेटा (operating data) तयार होईल, डिझाइनमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल आणि भविष्यातील विकास अधिक मजबूत होईल. हे विमान विमानवाहू जहाजांवर हवाई संरक्षणासाठी, किनारी तळांवर किंवा नौदलाचे प्रशिक्षण विमान म्हणून तैनात केले जाऊ शकते.

सध्याच्या परिस्थितीत, विशेषतः चीनच्या पाचव्या आणि सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या विकासाची गती पाहता, TEDBF पेक्षा AMCA हा एक चांगला पर्याय दिसत आहे. TEDBF सेवेत येण्यापूर्वीच कालबाह्य होण्याचा धोका आहे, तसेच ते पुरवठा साखळीमध्ये आव्हाने निर्माण करेल. केवळ आयातीवर अवलंबून राहणे दीर्घकाळात तांत्रिक आघाडी सुनिश्चित करणार नाही, कारण चीन जागतिक नेत्यांशी आपली दरी कमी करत आहे.

म्हणून, LCA Mk-1 (Navy) चा मर्यादित प्रमाणात समावेश करणे आणि त्यासोबतच नौदलाने नौदल AMCA च्या विकासामध्ये सहभागी होणे, हे नौदल विमान तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी आणि भविष्यातील धोरणात्मक वातावरणासाठी तयार राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मूळ लेखक – ग्रुप कॅप्टन (डॉ.) आर. के. नरंग, वि.म. (निवृत्त), वरिष्ठ सहकारी, MP-IDSA

+ posts
Previous articleIndian Army’s Pakistan-Centric ‘Bhairav’ Commando Battalions Induction by August
Next articleचीनचे परराष्ट्रमंत्री Wang Yi भारत दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंधांना चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here