पंतप्रधान रामगुलाम यांचा भारत दौरा; सागरी आणि सुरक्षा संबंध वाढवण्यावर भर

0

चीन, हिंदी महासागर प्रदेशात (IOR) आपली दुहेरी-वापराची बंदरे आणि नौदल उपस्थिती वाढवत असताना, भारत मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम, यांच्या 9 ते 16 सप्टेंबर आठवड्याच्या राज्यभेटीचे यजमानपद भूषवत आहे. रामगुलाम यांचा पंतप्रधानपदावर परतल्यानंतरचा, हा पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. ही भेट, वाढत्या जागतिक सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतासोबतची सागरी भागीदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नांतील एक निर्णायक क्षण दर्शवते.

धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची भेट

पंतप्रधान रामगुलाम यांची ही भेट केवळ एक राजकीय दौरा नसून, भारताचा सागरी शेजारी म्हणून एक विश्वासार्ह सुरक्षा प्रदान करणारा देश, याअर्थी मॉरिशसची भूमिका मजबूत करण्याचा उद्देश दर्शवते. SAGAR आणि MAHASAGAR सिद्धांतांअंतर्गत संरक्षण सहकार्य, सागरी सुरक्षा आणि व्यापक IOR धोरणाभोवती एक अजेंडा तयार करून, स्थिरता राखण्यासाठी आणि पश्चिम हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी, भारत एक सक्रिय दृष्टिकोन प्रदर्शित करत आहे.

मॉरिशस: भारताचा पश्चिम सागरी आधार

मॉरिशसने महत्त्वाच्या सागरी दळणवळणाच्या मार्गांवर एक महत्त्वाचे स्थान व्यापलेले आहे, ज्यामुळे त्याचे भू-रणनीतिक महत्त्व खूप जास्त आहे. भारतासाठी, हे बेट राष्ट्र केवळ एक विश्वासार्ह राजकीय भागीदार नाही, तर वाढत्या धोरणात्मक स्पर्धेच्या प्रदेशात एक लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल केंद्र देखील आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (BRI) प्रकल्पांमुळे आणि नौदल हालचाली आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या जवळ येत असताना, भारताचे मॉरिशससोबतचे संबंध त्याच्या प्रति-संतुलन धोरणाचा एक महत्त्वाचा आधार बनले आहेत.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांनी अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य वाढवण्याची अपेक्षा आहे:

  • संयुक्त सागरी पाळत ठेवणे आणि जल सर्वेक्षण नकाशे तयार करणे: विशेष आर्थिक क्षेत्रांना (EEZ) सुरक्षित करण्यासाठी आणि सागरी संसाधने व प्रादेशिक जलव्यवस्थापनासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत.
  • अगलेगा (Agalega) पायाभूत सुविधांचा वापर: अगलेगाच्या पायाभूत सुविधांचा सुधारित वापर केल्यास सागरी लॉजिस्टिक्समध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, ज्यामुळे प्रदेशातील ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम होतील.
  • राष्ट्रीय सागरी माहिती सामायिकरण केंद्र (National Maritime Information Sharing Centre): या केंद्राची स्थापना केल्याने सर्व संबंधितांमध्ये चांगले सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण वाढेल.
  • सागरी सुरक्षा उपाय: पाण्यातील मजबूत उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भारतीय संरक्षण मालमत्ता आणि प्लॅटफॉर्मची तैनाती सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देईल.

या निर्णयांमुळे सागरी क्षेत्रातील जागरूकता, ऑपरेशनल तयारी वाढेल आणि IOR मध्ये नियमांवर आधारित व्यवस्था मजबूत होईल.

संरक्षण सहकार्य: मदतीपासून धोरणात्मक एकीकरणापर्यंत

भारताची मॉरिशससोबतची संरक्षण भागीदारी, क्षमता-निर्मितीच्या समर्थनापासून ते एका व्यापक धोरणात्मक चौकटीपर्यंत विकसित झाली आहे. भारताने मॉरिशसच्या तटरक्षक दलाला अद्ययावत करण्यासाठी, गस्ती जहाजे, विमाने आणि प्रशिक्षणाचे कौशल्य पुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या भेटीमुळे संयुक्त गस्त, गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि चाचेगिरी, तस्करी आणि अवैध मासेमारी यांसारख्या पारंपरिक नसलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नवीन वचनबद्धता दृढ होण्याची अपेक्षा आहे – यामुळे केवळ मॉरिशसचे EEZ नव्हे, तर हिंदी महासागरात भारताची संपूर्ण पश्चिम बाजू सुरक्षित होईल.

विकास भागीदारी: ‘नेबरहूड फर्स्ट’ ते ‘ग्लोबल साउथ’

रामगुलाम यांची ही भेट, भारत-मॉरिशस संबंधांची सांस्कृतिक खोली आणि विकासात्मक पैलू देखील दर्शवेल. डिजिटल परिवर्तन आणि सामाजिक गृहनिर्माणापासून ऊर्जा आणि आरोग्यसेवेपर्यंत, भारताच्या मदतीने मॉरिशसच्या विकासाला आधार मिळाला आहे. ग्रीन मोबिलिटी, जल सुरक्षा आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये नवीन करारांची अपेक्षा आहे, जे परस्परांच्या वाढीवर आधारित भागीदारीचे भारताचे मॉडेल अधोरेखित करतात.

IOR: भारताचे विस्तारणारे धोरणात्मक क्षितिज

हिंदी महासागर 21 व्या शतकातील सागरी स्पर्धेचे केंद्रस्थान बनत असताना, रामगुलाम यांचा हा दौरा- नवी दिल्ली कशाप्रकारे सुरक्षा आवश्यकता आणि विकासात्मक भागीदारी यांच्यात संतुलन साधत आहे, हे दर्शवतो. MAHASAGAR योजनेअंतर्गत, भारत आपल्या सागरी सीमा विश्वास, लवचिकता आणि टिकाऊपणाच्या एका मजबूत नेटवर्कमध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि मॉरिशस यातील एक प्रमुख भागीदार आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleयुरोपियन युनियन (EU)चा भारताकडे कल; संरक्षण, सुरक्षा सहकार्य केंद्रस्थानी
Next articleपंतप्रधान मोदी संयुक्त कमांड आणि आत्मनिर्भरतेबाबत धोरण निश्चीत करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here