हाँगकाँगजवळ Ragasa चक्रीवादळाची धडक; विमानसेवा, व्यवसाय विस्कळीत

0

मंगळवारी, हाँगकाँगने या वर्षातल्या जगातील सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ Ragasa चा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली आहे. या शक्तीशाली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, प्रशासनाने शाळा आणि काही व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बहुतेक प्रवासी विमानांची उड्डाणे मंगळवार दुपारपासून ते गुरुवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

हाँगकाँग वेधशाळेनुसार, 220 किमी/तास (137 मैल प्रति तास) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह, Ragasa वादळ चीनच्या शेजारील दक्षिण ग्वांगडोंग प्रांताच्या दिशेने सरकत आहे.

700 उड्डाणे आणि काही व्यवसाय ठप्प

स्थानिक प्रशासनाने, दुपारी 2.20 वाजता टायफूनचा सिग्नल 8 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सिग्नल आहे. त्यामुळे बहुतेक व्यवसाय आणि वाहतूक सेवा बंद होतील. यामुळे सुमारे 700 विमानांची उड्डाणे विस्कळीत झाली आहेत.

वेधशाळेने सांगितले की, ‘मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी सकाळी, वादळाबाबत त्यांना उच्च चेतावणी देण्याची आवश्यकता आहे की नाही, याचे ते मूल्यांकन करतील.’

सोमवारी, रागासा चक्रीवादळ उत्तर फिलीपीन्समध्ये धडकले, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी देशाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि सर्व सरकारी संस्थांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मोठ्या नुकसानीची शक्यता

हाँगकाँग वेधशाळेने सांगितले की, ‘बुधवारी हाँगकाँगच्या किनाऱ्यावर आणि उंच ठिकाणी चक्रीवादळाच्या वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे, तसेच जोरदार पावसामुळे शहरात मोठे वादळ आणि समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता आहे.’

वेधशाळेने समुद्राची पातळी वाढण्याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘समुद्राची पातळी, 2017 मधील हाटो टायफून आणि 2018 मधील मांगखुट टायफून दरम्यान वाढलेल्या पातळीसारखीच असेल. या दोन्ही वादळांमुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते.’

हाँगकाँगच्या किनारी भागात पाण्याची पातळी, सुमारे 2 मीटर (6 फूट) वाढेल आणि काही ठिकाणी कमाल पाण्याची पातळी 4-5 मीटर (12-15 फूट) पर्यंत पोहोचू शकेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. त्यांनी रहिवाशांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी, स्थानिक प्रशासनाने सखल भागात राहणऱ्या रहिवाशांना त्यांच्या घरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, वाळूने भरलेली पोती (sandbags) वाटली, तर अनेक लोकांनी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा साठा करुन ठेवला.

किंमती तिपटीने वाढल्या

रॉयटर्सच्या माहितीनुसार, सोमवारी सुपरमार्केटच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या; दूध आणि मांस विकले गेले होते आणि ताज्या भाज्यांच्या बाजारपेठेत भाजीपाल्याच्या किमती तिप्पट झाल्या होत्या.

हाँगकाँगचे स्टॉक एक्सचेंज मात्र खुले राहील. गेल्या वर्षी त्यांनी आपले धोरण बदलले आहे, त्यानुसार आता हवामानाची स्थिती काहीही असली तरीही व्यापार सुरू राहील. चीनच्या प्रशासनाने दक्षिण प्रांतांमध्ये पूर नियंत्रणाचे उपाय सक्रिय केले आहेत आणि मंगळवारच्या उशिरापासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

जगातील सर्वात मोठ्या जुगाराचे केंद्र असलेल्या मकाऊमधील रहिवासी देखील मोठ्या परिणामासाठी तयारी करत आहेत, तेथे शाळा बंद ठेवल्या आहेत आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखली जात आहे.

चीनच्या तंत्रज्ञान केंद्र शेन्झेनमध्ये, प्रशासनाने 800 पेक्षा जास्त आपत्कालीन निवारागृहे तयार केली आहेत.

तैवानच्या प्रशासनाने सांगितले की, ‘त्यांनी स्वशासित बेटाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागातून 6,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleन्यूयॉर्क परिषदेत पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्यास जागतिक नेत्यांची तयारी
Next articleन्यूझीलंड सरकारने काही स्थलांतरितांसाठी निवासी नियम शिथिल केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here