संरक्षण क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांचे, AMCA प्रकल्पासाठी संघटन

0
AMCA
पाचव्या पिढीच्या AMCA प्रकल्पासाठी, L&T आणि BEL या दिग्गज कंपन्यांची भागीदारी

स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी, लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या दोन बड्या कंपन्यांनी, भारताच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांसाठीच्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) या प्रकल्पातील आपली रणनीतिक भागीदारी जाहीर केली आहे.

सार्वजनिक आणि खाजगी संरक्षण क्षेत्रातील या दोन्ही दिग्गद कंपन्या, भारतीय हवाई दलाच्या AMCA प्रकल्पासाठी अ‍ॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने जारी केलेल्या, ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EoI) ला एकत्रितपणे प्रतिसाद देतील. या भागीदारीमुळे L&T ची सामरिक संरक्षण प्लॅटफॉर्म आणि सिस्टीम इंटिग्रेशनमधील ताकद आणि BEL चे संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स आणि एव्हीऑनिक्समधील दीर्घ अनुभव एकत्र येणार आहे.

L&T ने दिलेल्या निवेदनानुसार, “भारत सरकारच्या अ‍ॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने जारी केलेल्या ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ नोटीसला प्रतिसाद देत, हे कन्सोर्टिअम (एकत्रीकरण) आगामी आठवड्यात आपले निवेदन सादर करेल.”

AMCA हे ‘स्टेल्थ-सक्षम’ बहु-उद्देशीय लढाऊ विमान म्हणून तयार करण्यात आले आहे. हे विमान भारताच्या दीर्घकालीन हवाई ताकद आधुनिकीकरण धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस पेक्षा एक मोठा तांत्रिक टप्पा मानला जातो. L&T आणि BEL या दोन्ही कंपन्यांनी LCA कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यात त्यांनी महत्त्वाचे ‘एरोस्ट्रक्चर्स’, ‘एव्हीऑनिक्स’ आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पुरवल्या आहेत. या नव्या कन्सोर्टिअममुळे स्वदेशी लढाऊ विमानांच्या विकासाच्या पुढील टप्प्याला याच अनुभवाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

L&T चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एस.एन. सुब्रमण्यन म्हणाले की, “BEL सोबतची ही भागीदारी भारताच्या संरक्षण क्षमतांच्या आधुनिकीकरणासाठी आमच्या वचनबद्धतेमध्ये एक मोठी झेप आहे. आमचे एकत्रित प्रयत्न राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यात आणि संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.”

BEL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मनोज जैन यांनी AMCA प्रकल्पाला भारताच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी एक निर्णायक पाऊल म्हटले आहे. ते म्हणाले, “L&T च्या अभियांत्रिकी आणि सिस्टीम इंटिग्रेशन क्षमता आणि BEL च्या संरक्षण इलेक्ट्रॉनिक्समधील कौशल्यामुळे, आम्ही भारतीय हवाई दलाला येणाऱ्या दशकांपर्यंत सेवा देणारा एक जागतिक दर्जाचा उपाय देऊ शकू, असा आम्हाला विश्वास आहे.”

ही भागीदारी सरकारची संरक्षण उत्पादनातील ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाला पुढे घेऊन जाते, ज्याचा उद्देश महत्त्वाच्या तंत्रज्ञानासाठी परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करणे आहे. संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की, AMCA ला डिझाइन टप्प्यातून पूर्ण-स्तरीय उत्पादनापर्यंत नेण्यासाठी, L&T आणि BEL सारख्या उद्योगांच्या नेतृत्वाखालील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

ही भागीदारी यशस्वी झाल्यास, भारताच्या आत्मनिर्भर एरोस्पेस इकोसिस्टमच्या दिशेने, हे एक सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

टीम भरतशक्ती

+ posts
Previous articleIndia-UK Defence Ties Set to Deepen Ahead of British PM’s October Visit
Next articleब्रिटिश पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी, भारत-ब्रिटन संरक्षण संबंध अधिक दृढ होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here