चौथे GE इंजिन HAL कडे सुपूर्द, मात्र तेजस जेटच्या वितरणात विलंब

0

बुधवारी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीने जाहीर केले की, त्यांना 2021 च्या कराराअंतर्गत, अमेरिकेतील GE Aerospace या कंपनीकडून चौथे GE F404-IN20 इंजिन प्राप्त झाले. याआधी सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या इंजिनचे वितरण पूर्ण झाले होते.

दुसरीकडे, तेजस Mk1A प्रकारातील एकूण 83 लढाऊ विमानांच्या प्राथमिक ऑर्डरसाठी, भारताला 99 F404 इंजिनांची आवश्यकता आहे, ज्यासाठी HAL ने, 2021 मध्ये GE कंपनीसोबत 716 दशलक्ष डॉलर्सचा करारही केला होता. मात्र, जागतिक पुरवठा साखळीतील विवध अडचणी, विशेषत: एका महत्वाच्या दक्षिण कोरियन पुरवठादाराला आलेले अपयश, यामुळे वितरणाचे मूळ वेळापत्रक पुढे ढकलून, ते मार्च 2025 पर्यंत लांबवले गेले. HAL ला, चालू आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत एकूण 12 इंजिन्सचे वितरण करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र या प्रक्रियेतील विलंबामुळे विमानांच्या वितरणाचा वेग मंदावला आहे.

एप्रिल 2023 मध्ये, नाशिक येथे सुरू करण्यात आलेले HALचे उत्पादन केंद्र, हे तेजस जेट्ससाठीचे तिसरे असेम्ब्ली लाईन आहे, जे आता लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी सज्ज आहे. सध्या सुमारे 10 विमानांचे संरचनात्मक काम पूर्ण झाले असून, त्यामध्ये केवळ इंजिन बसवणे बाकी आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या आसपास, HAL पहिली दोन तेजस Mk1A जेट्स भारतीय हवाई दलाला सुपूर्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, हे वितरण केवळ इंजिन्सच्या उपलब्धतेवरच अवलंबून असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतशक्ती या संकेतस्थळाशी बोलताना, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की: “आमच्याकडे आणखी किमान 10 विमाने वितरणासाठी तयार आहेत, मात्र इंजिनाअभावी ती उड्डाण करु शकत नाहीत. इंजिन पुरवठा सुरळीत सुरू झाला की, वितरणाचा वेग वाढवणे सुलभ होईल.”

उत्पादनातील हा अडथळा, भारतीय हवाई दलासाठी अधिक त्रासदायक ठरतो आहे, कारण इंडियन एअरफोर्समधील स्क्वाड्रनची ताकद कमी होत चालली आहे, ज्यामुळे नुकत्याच निवृत्त झालेल्या Mig-21 विमानांची जागा, तेजस Mk1A नी लवकरात लवकर घेणे अपेक्षित आहे. इंडियन एअरफोर्सनी सध्या 83 Mk1A विमाने, दलात सामाविष्ट करुन घेण्याचे ठरवले असून, भविष्यात एकूण 352 तेजस जेट्स तैनात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 

HAL ने आपली उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता, सुमारे 150 कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक केली असून, नाशिक केंद्रातून दरवर्षी किमान 8 विमाने तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तिनही असेम्ब्ली लाईन्समधील उत्पादन मिळून, 2027 पर्यंत प्रतिवर्षी एकूण 24 विमाने तयार करण्याचे लक्ष्य निश्चीत करण्यात आले आहे. मात्र, इंजिन उपलब्ध नसल्याकारणाने उत्पादन केंद्रातील कामात विलंब होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम HAL च्या डेडलाईनवर (वितरणाच्या निश्चीत वेळेवर) होणे स्वाभाविक आहे.

पुरवठ्यातील अडथळे आणि भविष्यातील उपाय

सध्याचे इंजिन वितरण हे संथ गतीने होत आहे, ज्याचा परिणाम भविष्यातील वितरणावर होऊ शकतो. भारतीय हवाई दलाला अधिक सुलभरित्या विमानांचे वितरण होणे अपेक्षित होते, मात्र इंजिनाचा पुरवठाच टप्प्याटप्याने आणि हळूहळू होत असल्यामुळे, विमानांचे उत्पादन पूर्ण होऊनही ती निष्क्रीयपणे थांबून आहेत. भविष्यात ही परिस्थिती टाळण्यासाठी, HAL आणि GE यांच्यामध्ये अधिक व्यापक पद्धतीने तंत्रज्ञान भागीदारी होणे अपेक्षित आहे, ज्यादृष्टीने काम सुरू आहे. HAL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी.के. सुनील यांनी या गोष्टीची पुष्टी केली की, “ऑक्टोबरमध्ये, GE कंपनीसोबत 113 F404 इंजिन्सच्या पुढील करारावर स्वाक्षऱ्या होतील. या कराराचे मूल्य $1 डॉलर अब्जाहून अधिक असून, 2027 ते 2033 या काळात, 68 सिंगल-सीट लढाऊ विमानांना आणि 29 ट्विन-सीट लढाऊ विमानांना ही इंजिन्स पुरवण्यात येतील.”

भारत सध्या स्वदेशीकरणावर अधिक भर देत असून, याचाच एक भाग म्हणून GE ने आपले अधिक शक्तिशाली F414 इंजिन, भारतात तयार करण्यासाठी 80% तंत्रज्ञान हस्तांतरणाला मान्यता दिली आहे. हे इंजिन Mk2 आणि अॅडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) साठी वापरले जाईल. हा करार, सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला चालना देणारा असून, महत्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील परदेशी अवलंबन कमी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 

मात्र, सध्या भारतीय हवाई दलाच्या आघाडीच्या विमान भरती योजनेचे यश, हे केवळ आणि केवळ GE एअरोस्पेस कंपनी HAL ला किती वेगाने इंजिन्स पुरवते, त्यावर अवलंबून आहे.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleFourth GE Engine Lands, But HAL’s Tejas Delivery Bottleneck Remains
Next articleगाझा फ्लोटिलाने नोंदवली संदिग्ध जहाजांची हालचाल, सुरक्षिततेचा इशारा जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here