पंतप्रधान स्टारमर यांच्या भेटीपूर्वी, यूके-भारत नौदल सरावाला गती

0

युनायटेड किंगडम आणि भारताने संयुक्तरित्या, ‘एक्सरसाईज कोंकण’ (Exercise Konkan) या हाय-प्रोफाइल नौदल सरावाचा प्रारंभ केला असून, यामध्ये दोन्ही देशांच्या विमानवाहू नौकांसह अन्य प्रगत युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. यंदाच्या या द्विपक्षीय सरावाचे वैशिष्ट्य म्हणजे, इतिहासात प्रथमच दोन्ही देशांचे ‘कॅरियर स्ट्राइक ग्रुप्स’ एकाचवेळी समुद्रात तैनात झाले आहेत.

“हा सराव, 2004 पासून द्वैवार्षिक स्वरूपात पार पडत असला, तरी यंदा प्रथमच ब्रिटीश आणि भारतीय ‘कॅरियर स्ट्राइक ग्रुप्स’ एकत्रितपणे या युद्धसरावात सहभाग घेत आहेत,” असे ब्रिटिश उच्चायोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांचा नियोजीत भारत दौरा अवघ्या काही दिवसांवर आला असल्यामुळे, या द्विपक्षीय नौदल सरावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. स्टारमर यांचा सरकारप्रमुख म्हणून हा पहिला अधिकृत भारत दौरा असेल. हा संयुक्त नौदल सराव दोन्ही देशातील वाढते संरक्षण सहकार्य तर दर्शवतोच, मात्र त्यासो दोन्ही देशांच्या मुक्त, खुल्या आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी असलेली वचनबद्धताही अधोरेखित करतो.

नौदल सहकार्याचा नवा अध्याय

‘एक्सरसाईज कोंकण’ द्विपक्षीय नौदल सराव 2004 पासून नियमितपणे होत असला तरी, यावर्षी प्रथमच दोन्ही बाजूंनी संपूर्ण ‘कॅरियर स्ट्राइक ग्रुप्स’ यात सहभागी झाले आहेत. रॉयल नेव्हीचे ‘HMS Prince of Wales’ आणि भारतीय नौदलाचे स्वदेशी विमानवाहू जहाज ‘INS विक्रांत’ ने यात सक्रीय सहभाग घेतला आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रगत युद्ध सरावात, दोन्ही नौदलांच्या पाणबुड्या, फिक्स्ड-विंग एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि पृष्ठभागावरील जहाजे यांचा समावेश असेल.

“युके कॅरियर स्ट्राईक ग्रुपद्वारे, (UK CSG 25) HMS Prince of Wales च्या नेतृत्वाखाली झालेल्या नॉर्वे आणि जपानच्या नौदल साधनांच्या समावेशामुळे, यावर्षीच्या सरावाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भारताच्या बाजूने ‘INS’ विक्रांतच्या ‘कॅरियर बॅटल ग्रुप’सोबत अन्य पृष्ठभागावरील जहाजे, पाणबुडी आणि हवाई लढाऊ साधनांना सहभागी करुन घेतले जाईल,” असे भारतीय नौदलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

UK CSG सध्या ‘ऑपरेशन हाईमास्ट’ अंतर्गत आठ महिन्यांच्या एका मिशनवर तैनात आहे, ज्याचा मुख्य उद्देश प्रमुख भूप्रदेशांमध्ये लष्करी संबंध बळकट करणे हा आहे. भारतीय नौदलाच्या साधनांसह त्याचे एकत्रीकरण हे ऑपरेशनल सहकार्याचे प्रत्यक्ष पाऊल मानले जात आहे, विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशात, जिथे दोन्ही देश स्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

इंडो-पॅसिफिकसाठीचा दृष्टीकोन

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा सराव केवळ लष्करी शक्तीचे प्रदर्शन नसून, दोन्ही देशांच्या सामायिक धोरणात्मक उद्दिष्टांचे प्रतिबिंब आहे.

“युके आणि भारत दोघेही, इंडो-पॅसिफिक क्षेत्राला जागतिक समृद्धी आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक मानतात, ” असे भारतासाठी नियुक्त असलेल्या ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी सांगितले.

“एक्सरसाईज कोंकण हे आमच्या संरक्षण सहकार्याची ताकद आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” असेही त्या म्हणाल्या.

ब्रिटनच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणासाठी, इंडो-पॅसिफिक हा एक मुख्य भाग बनला आहे, विशेषतः UK च्या ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’नंतर, ज्यामध्ये या प्रदेशाला देशाच्या दीर्घकालीन हितसंबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणून नमूद करण्यात आले होते.

एक निर्णायक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर…

येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान स्टार्मर यांचा भारत दौरा नियोजित असून, यामध्ये भारत–ब्रिटन ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’वर, विशेषतः ‘व्हिजन 2035’ या 10 वर्षांच्या आराखड्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या भागीदारीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि हवामान कृती या क्षेत्रांतील सहकार्याचा समावेश आहे.

मुंबईमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये, दोन्ही देशांचे पंतप्रधान सहभागी होतील, जिथे ते विविध औद्योगित नेत्यांशी संवाद साधतील आणि सध्या वाटाघाटीच्या प्रक्रियेत असलेल्या भारत–ब्रिटन मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीचा आढावा घेतील.

एक महत्त्वाचा लष्करी सराव आणि राजनैतिक दौरा यांचा अचूक समन्वय साधून, दोन्ही देश हे स्पष्टपणे दर्शवत आहेत की, ‘द्विपक्षीय संरक्षण आणि आर्थिक संबंध परस्परपूरक असून, ते भविष्यातील भागीदारीची दिशा ठरवणारे आहेत.’

पुढचे पाऊल

सध्या सुरु असलेला नौदल सराव पूर्ण झाल्यानंतर, युके कॅरियर स्ट्राईक ग्रुप हा मुंबई आणि गोव्यातील बंदरात दाखल होईल, जिथे ब्रिटिश तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि औद्योगिक संबंध दृढ करण्याच्या हेतूने काही कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय, भारतीय हवाई दलासोबतही हवाई संरक्षण सरावाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे विविध लष्करी क्षेत्रांमधील सहकार्याचा विस्तार अधोरेखित होईल.

“12 ऑक्टोबर 2025 रोजी, भारतीय नौदलासोबतचा ‘एक्सरसाइज कोंकण 2025’ हा सराव पूर्ण झाल्यानंतर, UK CSG 25 समूह 14 ऑक्टोबर 2025 रोजी, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भारतीय हवाई दलासोबत एक दिवसीय सरावात सहभागी होईल आणि त्यानंतर आपला नियोजित दौरा पुढे सुरू ठेवेल,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रादेशिक समीकरणे, विशेषतः सागरी क्षेत्रात बदलत असताना, भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक सुरक्षा भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत .

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleभारताच्या तटरक्षक दलात ‘ICGS Akshar’ या नव्या जहाजाचा समावेश
Next articleयुद्धबंदी, ओलिसांची सुटका यावरील चर्चेसाठी हमासचे प्रतिनिधी इजिप्तमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here