हमास आपल्या कठोर अटींसह, ट्रम्प यांच्या गाझा योजनेबाबत गंभीर आहे

0

हमासने मंगळवारी जाहीर केले की, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा युद्धविरामाच्या (Gaza ceasefire) योजनेबाबत गंभीर आहेत, मात्र त्यांनी आपल्या काही अटी आणि मागण्या कायम ठेवल्या आहेत. यामुळे इजिप्तमध्ये इस्रायलसोबत सुरु असलेल्या अप्रत्यक्ष वाटाघाटी, आता अधिक आव्हानात्मक आणि वेळखाऊ ठरु शकताता, असे संकेत मिळत आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी मंगळवारी गाझा कराराच्या प्रगतीबद्दल आशावाद व्यक्त केला आणि सांगितले की, इजिप्तमधील वाटाघाटींमध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेची एक टीम नुकतीच रवाना झाली आहे.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला वाटते की गाझापलीकडे मध्य पूर्व भागात लवकरच शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.”

पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला, दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणि इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू झाल्यानंतर, एका दिवसानंतर हमासचे वरिष्ठ अधिकारी फौझी बारहूम यांनी हमासची भूमिका स्पष्ट केली.

7 ऑक्टोबर 2023 रोजी, इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले तसेच 251 लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यामुळे सुरू झालेल्या गाझा युद्धात हजारो पॅलेस्टिनी मारले गेले होते आणि गाझापट्टी उद्ध्वस्त झाली होती. हे युद्ध संपवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या या चर्चा सर्वाधिक आशादायक वाटत आहेत.

परंतु, सगळ्या पक्षांच्या अधिकाऱ्यांनी जलद कराराच्या शक्यतेबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. इस्रायलींनी होलोकॉस्टनंतरचा ज्यू लोकांसाठीचा सर्वात रक्तरंजित दिवस आठवला आणि गाझावासीयांनी दोन वर्षांच्या युद्धामुळे आलेल्या दुःखाचा अंत होण्याची आशा व्यक्त केली.

हमासच्या अटी काय?

बारहूम यांनी दूरचित्रवाणीवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “इजिप्तमधील सध्याच्या वाटाघाटींमध्ये सहभागी झालेले हमासचे प्रतिनिधी मंडळ, गाझामधील आमच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा करार करण्यासाठी सर्व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.”

त्यांनी सांगितले की, “करारामध्ये युद्धाची समाप्ती करणे आणि गाझा पट्टीतून इस्रायलची पूर्ण माघार सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हमासने पूर्णत: निःशस्त्र व्हावे असे हमासला वाटते, जी गोष्ट या गटाला मान्य नाही.”

हमासला कायमस्वरूपी, सर्वसमावेशक असा युद्धविराम हवा आहे. इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी “राष्ट्रीय तंत्रवादी संस्था” (national technocratic body) च्या देखरेखीखाली सर्वसमावेशक पुनर्रचना प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

चर्चेतील अडथळे अधोरेखित करताना, हमाससह एका पॅलेस्टिनी गटाने एक निवेदन जारी केले: ज्यामध्ये “सर्व प्रकारे प्रतिकार करण्याची भूमिका” घेतली गेली आणि “पॅलेस्टिनी लोकांची शस्त्रे देण्याचा अधिकार कोणालाही नाही” असे म्हटले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, यांनी या चर्चेच्या स्थितीवर त्वरित काहीच भाष्य केले नाही.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी असे सुचवले की, “ते सुरुवातीला लढाई थांबवण्यावर आणि इस्रायलमधील ओलिसांच्या आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेबाबत चर्चा केंद्रित करू इच्छितात. परंतु मध्यस्थ्याच्या भूमिकेत असलेल्या कतारने सांगितले की: अद्याप अनेक तपशीलांवर काम करावे लागेल, त्यामुळे कोणताही करार लवकर पूर्ण होण्याची संभाव्यता नाही.”

युद्धविरामाच्या अनुपस्थितीत, इस्रायलने गाझामध्ये आपला हल्ला सुरूच ठेवला आहे, ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विलगीकरण वाढत आहे.

हमासवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिनी, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि काही युरोपीय शहरांमध्ये, इस्रायलच्या कारवाईचे विरोधक असलेल्या काही लोकांनी, निषेधार्थ मोर्चे देखील काढले, परंतु राज्यकर्त्यांनी, या मोर्चांमुळे हिंसेचे उदात्तीकरण होण्याचा धोका असल्याचे सांगून त्यांची निंदा केली.

यश मिळण्याची आशा

हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त, काही इस्रायली लोकांनी हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसलेल्या काही ठिकाणांना भेट दिली.

ओरित बॅरन नामक एक नागरिक, दक्षिण इस्रायलमधील नोव्हा संगीत महोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित होत्या, जिथे त्यांची मुलगी युवल आणि तिचा होणारा पती मोशे शुवा अशाच एका हल्ल्यात मारले गेले होते. या हल्ल्यांत एकूण 364 लोकांचा मृत्यू झाला होता.

बॅरन म्हणाल्या की, “14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे ला त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते आणि मात्र दुर्देवाने ती आणि तिचा होणार नवरा हल्ल्यात मारले गेले, ज्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमत्तीने त्यांच्यावर एकत्र अंत्यसंस्कार केले गेले. त्या दोघांना एकमेकांच्या शेजारी दफन करण्यात आले.”

इस्रायलींना आशा आहे की, शर्म अल-शेख येथील चर्चेमुळे गाझामध्ये अजूनही ठेवलेल्या ओलीस ठेवलेल्या 48 लोकांची लवकरच सुटका होईल, ज्यापैकी 20 जण अजूनही जिवंत असावेत असा अंदाज आहे.

43 वर्षीय हिल्डा विसथल म्हणाल्या की, “हे एखाद्या उघड्या जखमेसारखे आहे. मला विश्वास बसत नाही की, दोन वर्षे होऊनही या ओलिसांची सुटका झालेली नाही.”

गाझामधील 49 वर्षीय पॅलेस्टिनी नागरिक मोहम्मद दिब यांनी, ‘मानवतेला हानिकारक ठरलेला हा संघर्ष लवकरात लवकर संपावा अशी आशा व्यक्त केली आहे.’ या सततच्या हल्ल्यांमुळे अनेक पॅलेस्टिनींना वारंवार विस्थापित व्हावे लागले आहे आणि 67,000 हून अधिक निष्पाप पॅलेस्टिनी यात मारले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “दोन वर्षे झाली, पण अजूनही आम्ही दहशत, विस्थापन आणि विध्वंसात जगत आहोत.”

दोन वर्षांच्या युद्धानंतरही युद्धविराम नाही

दक्षिण गाझामधील खान यूनिस आणि उत्तरेकडील गाझा सिटी येथील रहिवाशांनी, मंगळवारी पहाटे इस्रायली रणगाडे, विमाने आणि बोटींनी नवीन हल्ले केल्याची माहिती दिली.

इस्रायली सैन्याने सांगितले की, “गाझामधील अतिरेक्यांनी इस्रायलवर रॉकेट डागले, ज्यामुळे इस्रायली किबुत्झ नेतिव हासारा येथे हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि इस्रायली सैन्याने एन्क्लेव्हमध्ये बंदुकधाऱ्यांशी लढा सुरूच ठेवला.”

इस्रायल आणि हमासने, ट्रम्प यांच्या योजनेतील प्रमुख मुद्द्यांचे समर्थन केले आहे, ज्यानुसार ही लढाई थांबेल, ओलीस ठेवलेले लोक मुक्त होतील आणि गाझामध्ये मदत पुरवली जाईल. या प्रस्तावाला अरब आणि पाश्चात्त्य देशांचाही पाठिंबा आहे.

परंतु, युद्धविराम नियोजनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने आणि एका पॅलेस्टिनी सूत्राने सांगितले की, “ओलिसांना परत आणण्यासाठी 72 तासांची ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन पाळणे शक्य होणार नाही, कारण मृत पावलेल्या ओलिसांचे अवशेष शोधून काढण्याची गरज भासू शकते.”

जरी युद्धविरामाचा करार झाला, तरी गाझावर कोण राज्य करेल आणि त्याची पुनर्रचना कोण करेल, तसेच या पुनर्रचनेच्या प्रचंड खर्चासाठी वित्तपुरवठा कोणकरेल, हे प्रश्न कायम राहतील. ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी हमासच्या कोणत्याही भूमिकेला नकार दिला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleCarrier Strike Groups Lead Historic India–UK Naval Exercise in Arabian Sea
Next articleचीनची J-10C लढाऊ विमाने ढाक्याकडे: पूर्वेकडून भारतावर नवा दबाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here