ISRO ची नवी भरारी; लष्करी उपग्रह GSAT-7R च्या लाँचिंगसाठी भारत सज्ज

0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येत्या 2 नोव्हेंबर रोजी, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून CMS-03 लष्करी संप्रेषण उपग्रह, ज्याला GSAT-7R असेही नाव देण्यात आले आहे, तो प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. हे अभियान भारताच्या सागरी सुरक्षा पायाभूत सुविधांमधील एक महत्वाचा टप्पा असून, झपाट्याने विकसित होत असलेल्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतीक आहे.

उपग्रहाबद्दल सविस्तर माहिती

CMS-03 हा 2,650 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह, इस्रोच्या हेवी-लिफ्ट रॉकेट LVM-3 (लाँच व्हेईकल मार्क-3) द्वारे, मोहिमेअंतर्गत भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी, भारतीय संरक्षण मंत्रालयाने सुमारे ₹1,589 कोटी (सुमारे $225.5 दशलक्ष) निधीचा पुरवठा केला आहे आणि खास भारतीय नौदलासाठी हा उपग्रह करण्यात आला आहे. CMS-03 हा जीसॅट-7 (रुक्मिणी) या 2013 पासून कार्यरत असलेल्या उपग्रहाचा उत्तराधिकारी आहे.

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हे प्रक्षेपण नोव्हेंबरच्या सुरुवातीस होईल”, तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक ए. राजराजन यांनी, 2 नोव्हेंबर या प्रक्षेपणासाठीच्या संभाव्य तारखेची घोषणा केली.

हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सेकंड लॉन्च पॅड वरून प्रक्षेपित केला जाणार आहे. ही सुविधा खास GSLV आणि LVM-3 रॉकेट्ससाठी खास तयार केलेली असून, भारताच्या आगामी ‘गगनयान’ मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासह, सर्व महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना समर्थन देण्यास सक्षम आहे.

CMS-03 या उपग्रहाचा नियोजित कार्यकाळ सात वर्षांपर्यंतचा असून, भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तो अत्याधुनिक संप्रेषण क्षमता प्रदान करेल. हा उपग्रह भारतीय महासागर प्रदेशातील निरीक्षण, गुप्त माहिती संकलन, नेव्हिगेशन आणि हवामान निरीक्षण यांसारख्या कार्यांना समर्थन देईल. याच्या मदतीने भारतीय किनाऱ्यापासून सुमारे 2,000 किलोमीटर अंतरावर कार्यरत नौदल जहाजे, पाणबुड्या आणि विमानांदरम्यान आवाज, व्हिडिओ आणि डेटा संप्रेषण सुलभ होईल.

उपग्रहामध्ये UHF, S, C आणि Ku या फ्रिक्वेन्सी बँड्सचा वापर केला जाणार असून, त्यामुळे सर्व प्रकारच्या कार्यस्थितींमध्ये मजबूत आणि सुरक्षित संपर्क व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.

LVM-3 रॉकेट प्रणाली, ज्याला पूर्वी GSLV मार्क-3 म्हणून ओळखले जात होते, ती भारताची सर्वात शक्तिशाली स्वदेशी प्रक्षेपण वाहक आहे. या रॉकेटची उंची 43.5 मीटर असून, त्याचे उड्डाणाच्या वेळेचे एकूण वजन 640 टन आहे. हे रॉकेट थ्री-स्टेज कॉन्फिगरेशनसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये दोन भव्य S200 सॉलिड स्ट्रॅप-ऑन बूस्टर्स, दोन विकास इंजिनांसह एक लिक्विड L110 कोर स्टेज आणि CE20 इंजिनद्वारे समर्थित क्रायोजेनिक C25 अप्पर स्टेजचा समावेश आहे.

आजवर, सात मोहिमांमध्ये परिपूर्ण यश मिळवून देणारे LVM-3 रॉकेट, भूस्थिर स्थानांतरण कक्षात 4,000 किलोग्रॅम आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 10,000 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते. चंद्रयान-2 आणि चंद्रयान-2 सारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्याने आधीच आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे आणि आगामी गगनयान कार्यक्रमासाठी ते नियुक्त झाले आहे.

CMS-03 प्रक्षेपणानंतर, इस्रो डिसेंबरच्या सुरुवातीला आणखी एका LVM-3 ची लाँचिंग मोहीम आखत आहे, ज्यामध्ये ब्लूबर्ड-6, अमेरिकेच्या 6.5 टन वजनाचा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह तैनात केला जाईल, जो भारतातून प्रक्षेपित केलेल्या सर्वात जड व्यावसायिक पेलोडपैकी एक आहे. हा उपग्रह 19 ऑक्टोबर रोजी भारतात आला, ज्याची तैनाती ISRO च्या वाढत्या व्यावसायिक क्षमतांचे आणखी प्रदर्शन करेल.

CMS-03 भारताच्या नौदल संप्रेषण वास्तुकला वाढविण्यात आणि नेटवर्क-केंद्रित युद्ध क्षमता सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच ते नौदलाच्या ब्लू-वॉटर ऑपरेशन्ससाठी सुरक्षित मल्टी-बँड संप्रेषणांचा लक्षणीय विस्तार करेल, ज्यामुळे युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांमध्ये अखंड रिअल-टाइम समन्वय सुनिश्चित होईल. सुधारित पेलोड्स आणि वाढीव कव्हरेजसह, GSAT-7R भारताच्या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रांमध्ये ऑपरेशनल पोहोच मजबूत करेल.पाळत ठेवण्याच्या मोहिमांना, रणनीतिक समन्वयाला आणि वादग्रस्त किंवा दुर्गम भागातही सतत संप्रेषणाला समर्थन देईल. अंतराळ आणि संरक्षण तज्ञांच्या मते, ‘हा उपग्रह परदेशी संप्रेषण सेवांवरील अवलंबित्व कमी करेल आणि त्याच्या विशाल सागरी हितांचे रक्षण करण्यात भारताची स्वायत्तता वाढवेल.’

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी जाहीर केले आहे की, “किमान दहा उपग्रह सातत्याने धोरणात्मक संरक्षण उद्देशांसाठी कार्यरत असतात, ज्यामुळे प्रगत देखरेख, नेव्हिगेशन आणि संप्रेषण क्षमतांद्वारे भारतीय नागरिकांची सुरक्षितता वाढते. एकत्रितपणे, हे उपग्रह लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी महत्त्वपूर्ण शक्ती गुणक म्हणून काम करतात, तसेच आधुनिक संरक्षण ऑपरेशन्सना अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानासह एकत्रित करतात.

जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असताना, CMS-03 चे प्रक्षेपण अशावेळी होत आहे, जेव्हा जागतिक लष्करी संप्रेषण बाजारपेठ 2025 मध्ये, $34.28 अब्जांवरून – 2032 पर्यंत $55.77 अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर, लष्करी उपग्रह बाजारपेठ 2032 पर्यंत $30.02 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही वाढ सुरक्षित संप्रेषण आणि गुप्तचर प्रणालींसाठी जगभरातील मागणी दर्शवते, ज्यामध्ये लॉकहीड मार्टिन, नॉर्थ्रोप ग्रुमन, रेथियन टेक्नॉलॉजीज आणि BAE सिस्टम्स सारखे प्रमुख खेळाडू नवोपक्रम चालवत आहेत. दरम्यान, भारत, चीन आणि जपान सारखे देश संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आणि उदयोन्मुख बाजारपेठेच्या संधी मिळवण्यासाठी स्वदेशी उपग्रह कार्यक्रमांना गती देत ​​आहेत.

सध्या जागतिक अंतराळ व्यावसायिक बाजारपेठेत, भारताचा वाटा 2% पेक्षा कमी आहे, परंतु पुढील दहा वर्षात तो 10% पर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. इस्रोने 34 देशांसाठी 430 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, ज्यामुळे 3,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल निर्माण झाला आहे. उपग्रह-आधारित सेवांसाठी जागतिक मागणी वाढल्याने, 2025 मध्ये केवळ व्यावसायिक प्रक्षेपण बाजारपेठ 9.4 अब्ज डॉलर्सवरून 2035 पर्यंत, 36.7 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. भारताची महत्त्वाची भूमिका असलेला आशिया-पॅसिफिक प्रदेश, ही सर्वात वेगाने वृद्धिंगत होणारी बाजारपेठ आहे, जी 2030 पर्यंत 169 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

अंतराळ क्षेत्रातील तांत्रिक नवोपक्रम, जागतिक अवकाश परिदृश्याला आकार देत आहे. स्टारलिंक, प्रोजेक्ट कुइपर आणि चीनचे गुवांग सारखे ‘लो अर्थ ऑर्बिट (LEO)’ उपग्रह, नक्षत्र जागतिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवत आहेत. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग उपग्रहांना स्वायत्त निर्णय घेण्यास आणि रिअल-टाइम डेटा विश्लेषण करण्यास सक्षम करत आहेत, तसेच क्वांटम कम्युनिकेशन तंत्रज्ञान संरक्षण आणि धोरणात्मक ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेल्या अतूट सुरक्षित संप्रेषण चॅनेलचे आश्वासन देत आहे.

याशिवाय, ते पुनर्वापर करण्यायोग्य प्रक्षेपण प्रणाली आणि बहु-कक्षीय उपग्रह नेटवर्क प्रक्षेपण खर्च कमी करत आहेत आणि सागरी, विमान वाहतूक आणि सरकारी क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवत आहेत. दरम्यान, नियंत्रित डी-ऑर्बिटिंग आणि अवशेष हटविण्याच्या मोहिमांद्वारे, शाश्वत अवकाश ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी अंतराळ कचरा कमी करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

भारताने, आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत दाखवलेली दृढ बांधिलकी त्याला एक ‘अग्रगण्य अंतराळ राष्ट्र’ म्हणून मजबूत स्थान मिळवून देते. भारताने 60 पेक्षा अधिक देशांशी अंतराळ क्षेत्रातील करार केले आहेत आणि 2023 मध्ये, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आर्टेमिस अ‍ॅकॉर्ड्समध्ये सहभागी होऊन आपल्या अंतराळ राजनैतिक दृष्टिकोनात मोठा बदल घडवून आणला आहे.

अमेरिका-भारत TRUST उपक्रम, तसेच 2025 मध्ये यशस्वीरीत्या प्रक्षेपित झालेला NASA-ISRO सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार (NISAR) उपग्रह, हे दोन्ही भारताच्या जागतिक वैज्ञानिक आणि सामरिक सहकार्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेचे उदाहरण आहेत.

CMS-03 मोहिम ही इस्रोच्या दीर्घकालीन अंतराळ आराखड्याचा एक भाग आहे, ज्यामध्ये 2027 मध्ये गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिम, 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचा संकल्प, तसेच चांद्रयान-4 आणि शुक्रयान सारख्या आंतरग्रहीय मोहिमांचा समावेश आहे.

पुढील चार वर्षांत, विद्यमान उपग्रहसंख्या तिप्पट करण्याचे आणि राष्ट्रीय तसेच जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रक्षेपणांचा वेग वाढविण्याचे इस्रोचे उद्दिष्ट ठेवत आहे.

भारताच्या सामरिक आणि व्यावसायिक अंतराळ उद्दिष्टांच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, CMS-03 चे प्रक्षेपण, हे त्याच्या संपूर्ण अंतराळ महासत्ता बनण्याच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. ही मोहिम केवळ तांत्रिक प्रगतीचे प्रतीक नाही, तर सामरिक दूरदृष्टीचे द्योतक आहे, ज्यामुळे भारत जागतिक अंतराळ संशोधन, संरक्षण आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात, एक बलाढ्य खेळाडू म्हणून उदयास येत आहे.

ही मोहिम लष्करी सामर्थ्य, व्यावसायिक संधी आणि वैज्ञानिक उत्कृष्टता यांचे यशस्वी एकत्रीकरण दर्शवते, तसेच भविष्यातील सुरक्षित, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावरील, भारताच्या प्रभावी अंतराळ दृष्टीकोनाला पुन:अधोरेखित करते.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेत रशिया-युक्रेन शांतता प्रयत्नांशी ट्रम्प यांची तुलना
Next articleहरित ऊर्जा प्रकल्प, तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी सिंगापूरमध्ये जमीन राखीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here