राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू: राफेलमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती

0

भारताच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू, यांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करून नवा इतिहास रचला. बुधवारी, भारताच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी, हरियाणातील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावारून, राफेल जेटमध्ये बसून उड्डाण केले. राफेल विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत.

सकाळी 11:27 वाजता प्रारंभ झालेल्या या 30 मिनिटांच्या उड्डाणाने, सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनापतींच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. राष्ट्रपती मुर्मू यांनी विमानात बसण्यापूर्वी, हातात हेल्मेट आणि डोळ्यावर सनग्लासेस घालून छायाचित्रकारांसाठी पोझ दिली आणि हवाई दलाच्या उपस्थित कर्मचाऱ्यांचे तसेच माध्यमांचे हात हलवून अभिवादन केले.

या प्रसंगी, हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंह देखील उपस्थित होते. त्यांनीही एका स्वतंत्र विमानातून या सराव उड्डाणात भाग घेतला.

फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने तयार केलेली ही राफेल विमाने, सप्टेंबर 2020 मध्ये अंबाला वायुदल तळावर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात दाखल झाली. ही विमाने भारताच्या अग्रगण्य प्रतिबंधक तुकडीचा भाग असून, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने राबवलेल्या “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान, त्यांनी लक्षणीय कामगिरी निभावली होती.

राष्ट्रपती मुर्मूंचा लढाऊ विमानातला हा पहिलाच प्रवास नव्हता. याआधी, 8 एप्रिल 2023 रोजी त्यांनी आसाममधील तेजपूर हवाई दलावर ‘सुखोई-30 एमकेआय’ (Sukhoi-30 MKI) या लढाऊ विमानातून उड्डाण केले होते. हा प्रवास करणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रप्रमुख ठरल्या होत्या. यापूर्वी, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये आणि प्रतिभा पाटील यांनी 2009 मध्ये, या विमानातून उड्डाण केले होते.

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात, टू सिटर ‘राफेल डीएच’ (Rafale DH) आणि सिंगल सिटर ‘राफेल ईएच’ (Rafale EH) अशा दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश आहे. भारतीय नौदलही विमानवाहू नौका मोहिमांसाठी, राफेल एम (Rafale M) विमान प्रकाराचा वापर करते.

भारत आणि फ्रान्सव्यतिरिक्त इजिप्त, कतार, ग्रीस, क्रोएशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश राफेल विमाने वापरतात. तर, या दशकाच्या उत्तरार्धात, इंडोनेशिया आणि सर्बिया हे देश या यादीत सामाविष्ट होण्याची शक्यता आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleJeM Chief Masood Azhar Launches Women’s Jihad Wing ‘Jamat-ul-Mominat’
Next articleपूर्व लडाखमध्ये LAC बाबत भारत- चीनमध्ये नव्याने लष्करी चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here