थायलंड कंबोडियासोबतच्या युद्धविराम कराराला स्थगिती देणार

0
थायलंड

थायलंड सरकारने मंगळवारी या गोष्टीची पुष्टी केली की, गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत कंबोडियासोबत स्वाक्षरी केलेल्या सुधारित युद्धविराम कराराच्या अंमलबजावणीला ते स्थगिती देणार आहेत. तसेच, या निर्णयाबद्दल वॉशिंग्टनला स्पष्टीकरण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्री नत्थाफोन नार्कफनिट यांनी पत्रकारांना सांगितले की, “थाई लष्कराच्या ताब्यात असलेल्या 18 कंबोडियन युद्धकैद्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया देखील बँकॉक थांबवणार आहे,” मात्र सैनिक पुन्हा तैनात केले जातील का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.

थायलंड-कंबोडिया तणाव

जुलै महिन्यात एकूण पाच दिवस संघर्ष केलेल्या, या दोन आग्नेय आशियाई शेजाऱ्यांमधील तणाव, सोमवारी झालेल्या भू-सुरुंग स्फोटामुळे पुन्हा वाढला आहे, ज्यामध्ये चार थाई सैनिक जखमी झाले होते.

दोन्ही देशांमध्ये सुधारित युद्धविराम करारावर सहमती झाल्यानंतर, कंबोडियाने नवीन भू-सुरुंग लावल्याचा आरोप, थाई लष्कराने  केला आहे. या युद्धविराम करारात सैन्य आणि अवजड शस्त्रास्त्रे मागे घेणे, तसेच बँकॉकने कंबोडियन कैद्यांना मुक्त करणे, यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने नवीन भू-सुरुंग पेरल्याचा आरोप फेटाळून लावला आणि थायलंडला जुन्या सुरुंग क्षेत्रांमध्ये गस्त घालणे टाळण्याचे आवाहन केले. ऑक्टोबरमधील सुधारित करारानुसार, बँकॉकसोबत काम करण्यास कंबोडिया कटिबद्ध असल्याचेही त्यात म्हटले आहे.

सुधारित युद्धविराम करार

मलेशियामध्ये एका प्रादेशिक शिखर परिषदेदरम्यान, थायलंड आणि कंबोडियामध्ये स्वाक्षरी झालेला हा सुधारित युद्धविराम करार, जुलैमध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेल्या करारावर आधारित होता. याआधी ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या तत्कालीन नेत्यांना फोन करून, परस्पर शत्रुत्व संपवावे नाहीतर वॉशिंग्टनसोबतच्या त्यांच्या संबंधित व्यापार चर्चा थांबवाव्यात, असे आवाहन केले होते.

दोन्ही देशांनी एकमेकांवर रॉकेट्स आणि अवजड तोफखान्यांचा वापर सुरू केल्याचा आरोप केला, ज्यामुळे अलीकडेच उफाळून आलेल्या सर्वात भीषण संघर्षादरम्यान, कमीत कमी 48 लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे 3 लाख लोकांना तात्पुरते विस्थापित व्हावे लागले, 

थायलंडचे परराष्ट्र मंत्री सिहासक फुआंगकेटकेओ म्हणाले की, “त्यांच्या देशाच्या निर्णयाबद्दल अमेरिकेला आणि प्रादेशिक गट आसिआनचे अध्यक्ष असलेल्या मलेशियाला स्पष्टीकरण दिले जाईल, ज्यांनी युद्धविराम प्रक्रियेत मदत केली होती.”

ते म्हणाले की, “कंबोडियाने जे काही म्हटले आहे ते पुरेसे नाही, यापुढे प्रत्यक्षात त्यांची भूमिका काय असेल, हे आपल्याला पाहावे लागेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजपान ‘सेनकाकू’ बेटांवरील चीनचे वादग्रस्त दावे लवकरच उघड करणार
Next article‘Won’t Be Spared’: Rajnath Singh Warns After Red Fort Blast, Calls for Self-Reliant Tech Ecosystem in Defence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here