चीनद्वारे जपानी सीफूडच्या आयातीवर बंदी; राजनैतिक तणाव कायम

0
जपानी सीफूडच्या

आशियातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील राजनैतिक तणाव वाढत असून, चीनने जपानी सीफूडच्या सर्व आयातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

या महिन्यात, जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी असे विधान केले की, ‘तैवानवर चीनचा हल्ला झाल्यास जपानच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो आणि यामुळे लष्करी कारवाई सुरू होऊ शकते.’ त्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला.

चीनने त्यांना हे विधान मागे घेण्याची मागणी केली असून, आपल्या नागरिकांना जपानला प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिकिटे रद्द झाली आहेत, ज्याचा जगातील चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

जपानसमोर हे नवे आव्हान अशावेळी उभे राहिले आहे, जिथे काही महिन्यांपूर्वीच बीजिंगने जपानच्या सीफूडवरील निर्बंध अंशतः शिथिल केले होते. टोकियोने 2023 मध्ये, फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे, हे निर्बंध लादले गेले होते.

जपानला आर्थिक फटका

चीनने जूनमध्ये सांगितले होते की, ते जपानच्या 47 प्रांतांपैकी, केवळ 10 प्रदेशांना वगळता उर्वरित सर्व प्रांतांमधून जपानी सीफूड उत्पादनांची आयात पुन्हा सुरू करेल.

त्यामुळे सीफूडच्या आयातीवर पुन्हा लादलेले हे निर्बंध, अनेक कंपन्यांसाठी एक मोठा धक्का असेल, विशेषत: ज्यांना बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्यास उत्सुकता होती. या बाजारपेठेचा वाटा पूर्वी जपानच्या एकूण सीफूड निर्यातीच्या एक पंचमांशाहून अधिक होता.

जपानचे कृषी मंत्री नोरीकाझू सुझुकी, यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, “सुमारे 700 जपानी निर्यातदारांनी चीनला माल पाठवण्यासंदर्भात पुन्हा नोंदणी करण्यासाठी अर्ज केले होते. परंतु, आत्तापर्यंत फक्त तिघांनाच मंजुरी मिळाली होती.”

2023 च्या बंदीपूर्वी, चीन जपानचा सर्वात मोठा स्कॅलोप खरेदीदार आणि सी कुकुंबरचा प्रमुख आयातदार होता.

आता, चीनने पर्यटनावर टाकलेल्या बहिष्कारामुळे, जपानच्या डळमळीत होत असलेल्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण रद्द

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांमधील विद्वानांची बीजिंगमध्ये शनिवारी आयोजित केलेली  वार्षिक बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे.

जपान–चीन मैत्रीला प्रोत्साहन देण्यासाठी, पश्चिम जपानमधील हिरोशिमा शहरात 21 नोव्हेंबर रोजी, नियोजित असलेला एक कार्यक्रमही या तणावामुळे रद्द करण्यात आला आहे.

सोबतच, चीनने आगामी जपानी चित्रपटांचे स्क्रीनिंग थांबवले आहे आणि तेथे लोकप्रिय असलेल्या जपानी सेलिब्रिटींनी चीनला आपला पाठिंबा दर्शवणारे संदेश देऊन, कोणत्याही संभाव्य टीकेपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पुनर्प्रारंभाला जपान देणार मंजुरी
Next articleHAL, Hensoldt Sign Pact to Co-Develop Next-Gen Obstacle Avoidance System for Helicopters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here