पुतिन यांचा भारत दौरा: पाणबुडी करार, प्रमुख संरक्षण खरेदी प्रगतीपथावर

0
पुतिन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, 4 डिसेंबरपासून नवी दिल्लीत दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर येत आहेत.

आजपासून (4 डिसेंबर) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून, त्याच्या काही तास आधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांचे रशियन समकक्ष आंद्रेई बेलोसोव्ह यांची भेट घेऊन, भारत-रशिया मधील अनेक महत्त्वाच्या संरक्षण प्रकल्पांना गती देण्यास सज्ज झाले आहेत. अण्वस्त्र पाणबुडी भाडेतत्त्वावर घेणे, हवाई संरक्षण खरेदी आणि महत्त्वाच्या लॉजिस्टिक्स करारावर नव्याने हालचाल होत असताना, दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्याच्या एका निर्णायक क्षणी ही उच्च-स्तरीय धोरणात्मक बैठक होत आहे.

न्युकलिअर पाणबुडीच्या भाडेतत्त्व कराराला गती

बैठकीच्या अजेंड्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, रशियाकडून अणुउर्जेवर चालणारी युद्ध-सक्षम पाणबुडी (SSN) भाडेतत्त्वावर घेण्याची भारताची योजना. अकुला/चक्र श्रेणीतील ही पाणबुडी, जी भारताने विकसित केलेल्या सेन्सर्स आणि प्रणालीने सज्ज असेल, ती 2027 ते 2028 दरम्यान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे.

नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत पुष्टी केली की, भारताने वितरणाचे वेळापत्रक जलद करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीची क्षमता तातडीने पूर्ववत करण्याची गरज अधोरेखित होते. भारताने यापूर्वी 2022 पर्यंत ‘INS चक्र’ ही पाणबुडी चालवली होती, मात्र सध्या एकही SSN सेवेत नसल्यामुळे, पाण्याखालील प्रतिबंध क्षमतेमध्ये एक गंभीर उणीव निर्माण झाली आहे.

आगामी चर्चा, या कार्यक्रमाला अंतिम कराराच्या आणि तपशीलवार अंमलबजावणीच्या वेळापत्रकाच्या दिशेने नेतील, अशी अपेक्षा आहे.

S-400 ची प्रगती, S-500 मध्ये स्वारस्य आणि स्थानिक देखभाल केंद्र

सिंह आणि बेलोसोव्ह यांच्यातील बैठकीदरम्यान, उर्वरित S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालीच्या वितरणाचाही आढावा घेतला जाईल. भारताला आतापर्यंत पाचपैकी तीन युनिट्स मिळाली असून, उर्वरित दोन युनिट्स 2026 आणि 2027 मध्ये वितरित होणार आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवी दिल्ली अतिरिक्त S-400 युनिट्स खरेदी करण्याच्या पर्यायाचे मूल्यांकन करत आहे आणि पुढील पिढीच्या S-500 प्रणालीमध्ये भारताने आपले स्वारस्य व्यक्त केले आहे. मॉस्कोचा दावा आहे की, ही प्रणाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, हायपरसॉनिक धोके आणि अति-उंचीवर उडणाऱ्या विमानांना निष्प्रभ करू शकते.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक समांतर पाऊल म्हणून, संरक्षण मंत्रालयाने रशियन तांत्रिक मदतीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या हेतूने, S-400 प्रणालीची समर्पित देखभाल, दुरुस्ती आणि आधुनिकीकरण सुविधा (MRO) स्थापित करण्यासाठी एका भारतीय कंपनीची निवड केली आहे.

महत्त्वाच्या राष्ट्रीय मालमत्तांभोवती बहुस्तरीय संरक्षण कवच तयार करण्याच्या उद्देशाने, ‘मिशन सुदर्शन चक्र’ अंतर्गत S-400 ला भारताच्या संरक्षण संरचनेत औपचारिकरित्या समाविष्ट करण्यात आले आहे.

व्यापक संरक्षण सहभाग: जहाजबांधणी, विमान, संयुक्त विकास

प्रमुख खरेदीपलीकडे जाऊन, भारत आणि रशिया जहाजबांधणी, विमान जुळवणी आणि संयुक्त शस्त्रास्त्र विकासामध्ये देखील सहकार्य सुरू ठेवणार आहेत. लष्करी आणि लष्करी-तांत्रिक सहकार्यावरील आंतर-सरकारी आयोगाच्या माध्यमातून या परस्पर सहकार्याला गती मिळाली आहे, ज्यामध्ये विस्तारित प्रशिक्षण, औद्योगिक भागीदारी आणि INDRA-2025 सारखे सराव तसेच रशियाच्या Zapad-2025 कवायतींमध्ये भारताचा नियोजित सहभाग यांचा समावेश आहे.

भारताकडून धोरणात्मक स्वायत्ततेचा पुनरुच्चार

भारत-रशिया संरक्षण संबंधांबद्दल अमेरिकेच्या चिंतांसंदर्भात विचापलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, ॲडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले की, “भारताचे निर्णय धोरणात्मक स्वायत्ततेद्वारे प्रेरित आहेत.”

ते म्हणाले की, “आम्ही आमच्या सर्व भागीदारांसोबत एकजूटीने काम करतो. तसेच भारत एकाच वेळी रशिया, अमेरिका, युरोप आणि देशांतर्गत उद्योगातून मिळालेली युद्धसामग्री वापरतो आणि या प्रत्येकासोबत नियमितपणे लष्करी सरावही करतो.

पुढील टप्प्यांसाठी मार्ग तयार

राष्ट्राध्यक्ष पुतिन आज दिल्लीमध्ये असताना,  संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान, दोन्ही देश अशा काही महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करतील, ज्यामुळे द्विपक्षीय संरक्षण भागीदारीचे भविष्य नव्याने आकार घेऊ शकेल. यामध्ये दीर्घकालीन पाणबुडी बांधकाम आणि प्रगत लढाऊ तंत्रज्ञानापासून – नवीन लॉजिस्टिक्स कॉरिडॉर आणि संयुक्त उत्पादन लाईन्सपर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

बदलत्या जागतिक धोरणात्मक वास्तवांमुळे, दोन्ही देश त्यांच्या सहकार्याची पुनर्रचना करत असताना, पुतीन यांची ही भेट अलिकडच्या भारत-रशिया संरक्षण संबंधांमधील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे.

मूळ लेखिका – हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleRELOS करार: भारताचा आर्क्टिकमधील तर रशियाचा IOR मधील प्रवेश निश्चित
Next articleरशियन गॅसमुळे भारताच्या खत निर्मितीच्या प्रयत्नांना बळकटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here