चीनकडून अमेरिकन संसदीय समितीच्या कर्मचाऱ्यांचे ई-मेल्स हॅक

0
ई-मेल्स

चीनमधील एका हॅकिंग गटाने, अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह्स’ मधील (प्रतिनिधी सभागृहातील) प्रभावशाली समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी वापरलेले ई-मेल्स हॅक केले आहेत, असे ‘फायनान्शिअल टाइम्स’ने बुधवारी या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत सांगितले.

सॉल्ट टायफून‘ असे टोपणनाव असलेल्या या गटाने, हाऊस चायना कमिटीच्या काही कर्मचाऱ्यांसह परराष्ट्र व्यवहार, गुप्तचर आणि सशस्त्र सेवा विषयक समित्यांच्या साहाय्यकांनी वापरलेल्या ई-मेल सिस्टीम्समध्ये प्रवेश मिळवला, असे अहवालात म्हटले आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

रॉयटर्स तात्काळ या वृत्ताची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकलेले नाहीत. चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांनी या घटनेचा निषेध केला असून, याला “निराधार तर्क आणि आरोप” म्हटले आहे, तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. व्हाईट हाऊस आणि कथितपणे टार्गेट करण्यात आलेल्या चारही समित्यांच्या कार्यालयांनीही, याला तात्काळ उत्तर दिलेले नाही.

फायनान्शिअल टाइम्सने या मोहिमेची माहिती असलेल्या एका व्यक्तीचा हवाला देत सांगतिले की, डिसेंबरमध्ये उघडकीस आलेल्या या घुसखोरीमध्ये हल्लेखोरांनी खासदारांच्या ईमेल्समध्ये प्रवेश मिळवला होता की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

अमेरिकन खासदार आणि त्यांचे साहाय्यक, विशेषतः जे अमेरिकेच्या विस्तीर्ण लष्करी आणि गुप्तचर संस्थांवर देखरेख ठेवतात, ते बऱ्याच काळापासून सायबर-हेरगिरीचे प्रमुख लक्ष्य राहिले आहेत आणि हॅकिंग किंवा हॅकिंगच्या प्रयत्नांचे अहवाल वेळोवेळी समोर येत असतात.

नोव्हेंबरमध्ये, सिनेटच्या ‘सर्जंट अ‍ॅट आर्म्स’ने अनेक संसदीय कार्यालयांना ‘सायबर प्रकरणाची’ सूचना दिली होती. यामध्ये हॅकर्सनी, खासदारांना महत्त्वाचा आर्थिक संशोधन डेटा पुरवणाऱ्या निपक्षपाती ‘काँग्रेसल बजेट ऑफिस’ आणि काही सिनेट कार्यालयांमधील संवादांमध्ये थेट घुसखोरी केल्याची शक्यता होती. 2023 मध्ये, वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले होते की व्हिएतनामशी संबंधित हॅकिंग ऑपरेशनच्या टार्गेट्समध्ये दोन वरिष्ठ अमेरिकन खासदारांचा समावेश होता.

चीनचा ‘सॉल्ट टायफून’, जो विशेषतः हॅकिंगसाठी ओळखला जाणारा गट आहे, त्याने अमेरिकन गुप्तचर समुदायाला बऱ्याच काळापासून हादरवून सोडले आहे, जसे यावेळेस ईमेल्सच्या बाबतीत घडले. चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आरोप असलेल्या या हेरांवर अमेरिकन लोकांचे टेलिफोन आणि ईमेल संवाद आणि संभाषणांचा मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये प्रमुख अमेरिकन राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील संवादांचाही समावेश आहे.

बीजिंगने या हेरगिरीमध्ये आपला हात असल्याचे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकेने कथित हॅकर यिन केचेंग आणि सिचुआन जक्सिनहे नेटवर्क टेक्नॉलॉजी या सायबर सुरक्षा कंपनीवर निर्बंध लादले होते, आणि त्यांच्यावर सॉल्ट टायफूनमध्ये सामील असल्याचा आरोप केला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत-चीनमधील गुंतागुंतीचे संबंध हाताळणे अधिक कठीण का झाले आहे?
Next articleरासायनिक चौकशीमुळे चीन-जपानमधील व्यापार तणाव अधिक वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here