भारताने परराष्ट्र धोरणाची नव्याने मांडणी करण्याची गरज: श्याम सरन

0

परराष्ट्र धोरणात स्वारस्य असणाऱ्यांना तसेच परराष्ट्र धोरणातील चढ-उतार कव्हर करणाऱ्या प्रसारमाध्यमांना ‘श्याम सरन’ हे नाव परिचीत आहे. त्यांनी 2004 ते 2006 दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले आहे, त्याशिवाय त्यांनी नेपाळ आणि म्यानमारमध्ये राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली आहे आणि निवृत्तीनंतर ते हवामान बदलावर पंतप्रधानांचे विशेष दूत होते.

‘द जिस्ट’ (The Gist) या कार्यक्रमादरम्यान, राजदूत सरन यांनी भारताने परराष्ट्र धोरणाची नव्याने मांडणी करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला आहे, “कारण ज्या गृहितकांवर भारताची गेल्या अनेक वर्षांची परराष्ट्र धोरणे आधारित होती, ती गृहितके जरआता वैध राहिली नसतील किंवा त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसत असेल, तर भारताच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी उर्वरित जगाशी असलेले संबंध कसे टिकवून ठेवायचे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

त्यांच्या मते, याला ‘रिसेट’ (पुन्हा शून्यापासून सुरुवात) म्हणता येणार नाही; कारण ‘रिसेट’ करणे म्हणजे जुन्या गोष्टींकडे किंवा सुरुवातीच्या गोष्टींकडे परत जाणे, ज्या गोष्टी आताच्या काळात लागू होत नाहीत किंवा कालबाह्य झाल्या आहेत.

“आपल्याला भविष्यात उलगडत असलेल्या पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीकडे पाहण्याची गरज आहे. मग हा खरोखरच मूलभूत बदल आहे का? की केवळ तात्पुरता टप्पा आहे? हे काळच ठरवेल.

“मात्र माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की, काही बदल हे खूपच मूलभूत आणि मर्यादित आहेत, जसे की अलिप्ततावाद (नॉन-अलाइनमेंट) वगैरे संकल्पना,” असे त्यांनी पुढे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, जर धोरणात्मक स्वायत्तता ही भारतीय परराष्ट्र धोरणाची दीर्घकालीन संकल्पना राहणार असेल, तर ती कशी सुनिश्चित केली जाईल याची पद्धत बदलावी लागेल.”

धोरणात्मक स्वायत्ततेमुळे भारत एकाकी झाला आहे, हा दृष्टिकोन त्यांनी फेटाळून लावला.

“मुत्सद्देगिरीमध्ये मित्र किंवा शत्रू यांसारख्था संज्ञा मला फारशा अर्थपूर्ण वाटत नाहीत. देश आपल्या हितसंबंधांच्या आधारे काम करतात. जोपर्यंत आपले हितसंबंध जुळतात, तोपर्यंत तुम्ही आमचे मित्र असता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात आणि नजीकच्या भविष्यात हे भू-राजकारण कसे विकसित होईल, याबद्दलच्या आपल्या निर्णयाकडे आपल्याला सखोल लक्ष द्यावे लागेल. भारताने स्वतःला कुठे स्थान दिले पाहिजे? कोणत्या भागीदारी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत, कोणत्या भागीदारी कमी महत्त्वाच्या असू शकतात, कोणत्या देशांसोबत आपले हितसंबंध अधिक जवळून जोडलेले असतील? याचा विचार केला पाहिजे.” असे ते म्हणाले.

श्याम सरन यांचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी, संपूर्ण मुलाखत पाहा.

– सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleजयशंकर यांनी पोलंडला पाकिस्तानबाबत दिला सावधगिरीचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here