प्रजासत्ताक दिनी नौदलाच्या चित्ररथात दिसणार सागरी वारसा, स्वदेशी युद्धनौका

0
प्रजासत्ताक
भारतीय नौदलाची प्रजासत्ताक दिन परेड तुकडी 

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील भारतीय नौदलाचा चित्ररथ भारताचा प्राचीन सागरी वारसा, समकालीन नौदल क्षमता आणि दलातील महिलांची वाढती भूमिका यांचा संगम सादर करेल, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

“परंपरेवर आधारित, स्वावलंबन आणि नवोन्मेषाच्या दिशेने प्रवास” या संकल्पनेवर आधारित या चित्ररथात पाचव्या शतकातील स्टिच्ड शिप (शिवलेले जहाज) शिडाच्या जहाजाची प्रतिकृती, ज्याला आता आयएनएसव्ही कौंडिण्य असे नाव देण्यात आले आहे, तसेच नौदलाच्या सर्वात प्रगत स्वदेशी युद्धनौकांच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या जातील.

नौदलाच्या संचलन पथकात 25 वर्षे सरासरी वय असलेले 144  युवा नौसैनिक असतील. अधिकाऱ्यांच्या मते हे पथक एका “तरुण आणि भविष्यवेधी” सागरी दलाचे प्रतिबिंब आहे. या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट करण नग्याल करतील, तर लेफ्टनंट पवन कुमार गांधी, लेफ्टनंट प्रीती कुमारी आणि लेफ्टनंट वरुण ड्रेव्हेरिया हे प्लाटून कमांडर म्हणून काम पाहतील. या कर्मचाऱ्यांची निवड देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून करण्यात आली आहे, जे देशाच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करतात.

या चित्ररथामध्ये आयएनएसव्ही कौंडिण्य, ज्याने अलीकडेच पोरबंदर ते मस्कत असा आपला पहिला परदेशी प्रवास पूर्ण केला, तसेच मराठा आरमारातील गुराब श्रेणीतील जहाजे यांच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या जातील. प्रदर्शनात समाविष्ट असलेल्या आधुनिक प्लॅटफॉर्ममध्ये स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत, प्रोजेक्ट 17A स्टिल्थ फ्रिगेट आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी, तसेच कलवरी-श्रेणीची डिझेल-इलेक्ट्रिक हल्ला करणारी पाणबुडी यांचा समावेश असेल.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय नौदलाचा सहभाग हा केवळ लष्करी क्षमतेचे प्रदर्शन नाही, तर आत्मनिर्भरता वाढवण्याच्या नौदलाच्या दृढ निश्चयांचे प्रतिबिंब आहे, असे कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस, व्हाइस ॲडमिरल प्रवीण नायर यांनी सांगितले. ते म्हणाले, “भारतीय नौदलाचा सहभाग देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याचा त्याचा निर्धार आणि आत्मनिर्भरतेप्रती असलेली त्याची वचनबद्धता दर्शवतो.”

हा चित्ररथ ‘नाविका सागर परिक्रमा-II’ च्या चालक दलातील लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांनी आयएनएसव्ही तारिणीवर केलेल्या जगप्रवासाचा मार्ग दर्शवून महिला सक्षमीकरणावरही प्रकाश टाकेल. याव्यतिरिक्त, सी कॅडेट्स कॉर्प्समधील तरुण मुली सुमारे 4 दशकांच्या विरामानंतर पुन्हा एकदा परेडमध्ये सहभागी होणार आहेत; या कॉर्प्सने शेवटचा सहभाग 1980 च्या दशकात घेतला होता.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते विजय कुमार यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची एक पूर्वझलक पत्रकारांना दाखवण्यात आली असून याची सुरूवात नौदलापासून झाली आहेत आणि येत्या काही दिवसांत तिन्ही सेनादल आणि इतर सहभागी विभागांचीही झलक दाखवली जाईल. त्यांनी या संचलनाचे वर्णन “एक राष्ट्रीय प्रयत्न” असे केले, जे संयुक्त नियोजन, आंतर-सेवा समन्वय आणि कार्यात्मक सज्जता दर्शवते.

रवी शंकर

+ posts
Previous articleIndian Navy’s Republic Day Tableau to Showcase Maritime Heritage, Indigenous Warships and Women Sailors
Next articleआर्थिक आणि धोरणात्मक काळजीमुळे इंडोनेशियाच्या रुपियात मोठी घसरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here