उगवत्या सूर्याचा देश म्हणून जगात जपानची जशी ओळख आहे, तशी आपल्या देशात अरुणाचल प्रदेशची ओळख आहे. अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम यासह ईशान्येकडील राज्ये सुरुवातीचा काही काळ प्रशासकीयदृष्ट्या दुर्लक्षित होती. स्वातंत्र्यानंतर जवळपास 25 वर्षांनंतर म्हणजेच 1972 साली अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख मिळाली. तर, साधारणपणे 15 वर्षांनी, 20 फेब्रुवारी 1987ला अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम ही दोन स्वतंत्र राज्ये म्हणून अस्तित्वात आली.
या अरुणाचल आणि मिझोरामला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्याला यंदा 20 फेब्रुवारीला 35 वर्ष झाली आहेत. या काळात दोन्ही राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कसोशीने प्रयत्न झाले. विशेषत:, गेल्या 10 वर्षांत त्याला वेग आला आहे. तेथील वाहतूक व्यवस्था तसेच दळणवळण आता खूपच चांगले झाले आहे. एक काळ असा होता की, अरुणाचल, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये ट्रेन नव्हती. पण आता या राज्यांमध्ये ट्रेन सेवा सुरू झाल्याने प्रवास सुकर झाला आहे.
ईशान्येकडील राज्यांमधील तरुण-तरुणी शिक्षण किवा नोकरी-व्यवसायासाठी देशातील इतर भागांत स्थायिक होत आहेत. या नागरिकांमध्ये परकेपणाची भावना निर्माण न होता, त्यांना आपलेपणाचा ओलावा मिळणे गरजेचे आहे. तरीही आता त्यांच्याबद्दल बरीच जागरुकता निर्माण झाली आहे. पूर्वी ईशान्य भारताची फारशी माहिती नसल्याने देशाच्या इतर भागांत त्याबद्दल कुतुहूल होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. निसर्गाने नटलेल्या या राज्यांतील पर्यटनाला चालना दिली पाहिजे. स्वित्झर्लंड, थायलंड, बाली अशा ठिकाणांच्या ऐवजी ईशान्येकडील या राज्यांना पर्यटनासाठी आपण भारतीयांनी प्राधान्य दिले पाहिजे.
मिझोराममध्ये पूर्वी दुष्काळ पडला होता. त्याचे नेमके कारण काय? दर 60 वर्षांनी असा दुष्काळ पडतो, असे तिथे का मानले जाते? पाकिस्तानप्रमाणेच भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा केला आहे, त्याचे कारण काय? मिझोराममध्ये मिझो बंडखोरी का निर्माण झाली? भारतीय हवाई दलाने ईशान्येकडील राज्यात आपल्याच लोकांवर हवाई हल्ला का केला? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहा, रणनीतीचा या आठवड्याचा भाग.