कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांघायमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध जारी करण्यात आले आणि त्यामुळे हजारो विवाहेच्छुक जोडप्यांचे स्वप्न वास्तवात उतरू शकले नाही. विशेषत:, अधिकृतरीत्या नसला तरी, तिथे जो दिवस प्रेमाचा समजला जातो, त्या दिवशी अनेक जोडपी मनात असूनही विवाहबंधनात अडकू शकली नाहीत. चीनमधील अनेक जोडपी त्यांच्या लग्नाच्या नोंदणीची तारीख म्हणून “520” (20 मे) निवडतात, कारण त्याचा चिनी उच्चार इंग्रजीमध्ये “आय लव्ह यू”सारखा वाटतो. मात्र जिथे विवाहाची नोंदणी केली जाते, अशी शहरातील बहुतांश नागरी व्यवहार कार्यालये बंद होती.
गेल्या वर्षी, शांघायमधील 2,232 जोडप्यांनी 20 मे रोजी विवाहाची नोंदणी केली. हा आकडा शहराच्या दैनंदिन सरासरी संख्येपेक्षा 10 पट जास्त आहे, असे तिथल्या नोंदीवरून स्पष्ट होते. परंतु शहराच्या ज्या उपनगरांतील निर्बंध तुलनेने कमी होते, तेथील काही जोडप्यांची विवाहनोंदणी होऊ शकली. अनेक जोडप्यांना त्यांच्या इच्छित तारखेला लग्न होऊ न शकल्याने निराशा आली. त्यावेळी देशात विवाह नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी होते. मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 2021मध्ये केवळ 7.6 दशलक्ष जोडप्यांनी विवाहनोंदणी केली. 1986पासून सरकारने अशी नोंद करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासूनचा हा ऐतिहासिक नीचांक म्हणावा लागेल.
स्रोत : Sixth Tone
————–
Go to bed at 11 pm
चिनी व्हिडिओ-शेअरिंग अॅप कुएशौच्या माध्यमातून जनरेशन झेडसाठी एक संदेश शेअर करण्यात आला आहे : रात्री 11 वाजेपर्यंत झोपायला जा. दर मंगळवार आणि गुरुवारी रात्री 8 वाजता ‘Go to bed at 11 pm’ या रिअॅलिटी शोचे या अॅपवर थेट प्रक्षेपण केले जाते. या कार्यक्रमात हाय-प्रोफाइल चिनी सेलिब्रिटीज तसेच आजच्या अनेक चिनी तरुणांनी अनुभवलेल्या झोपेच्या विकारांच्या दीर्घकालीन समस्येवर प्रकाश टाकला आहे. त्याच्या शीर्षकानुसार, कुएशौ रिअॅलिटी टीव्ही शोतून सहभागींना रात्री 11 वाजेपर्यंत झोपी जाण्याचे आवाहन केले जाते. “Don’t be so high, sleep early” असे याचे घोषवाक्य आहे. प्रत्येक भागामध्ये, कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींना त्यांच्या झोपेची स्थिती दर्शविणारे सेन्सर जोडलेले असतात. उशिरापर्यंत जागण्याची सवय मोडण्यासाठी काय उपाय करावे, याचेही मार्गदर्शन या शोमध्ये केले जाते. के-पॉप स्टार हुआंग झिटाओ, कॉमेडियन सॉन्ग शियाओबाओ, संगीतकार झांग क्यूई, लिआंग लाँग आणि गाई तसेच अभिनेत्री चेन शियाओयुन आणि हुआंग शेंगयी या सेलिब्रिटिंचा यात सहभाग असून दिलेल्या वेळेनुसार झोपण्यासाठी विविध टास्क त्यांना दिले जातात. उदाहरणार्थ, सॉन्ग वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरतो, कॅलिग्राफीचा सराव करतो आणि इतर क्लृप्त्या करतो, परंतु रात्री 11 वाजेपर्यंत त्याला झोप येत नाही. यादरम्यान, लिआंग झोपण्यापूर्वी त्याच्या त्वचेला मास्क लावून हायड्रेट करणे, वाचन करणे आणि पॉडकास्ट ऐकणे यासारखी कार्य करतो. तर, आपले ध्येय गाठणारा झँग पहिला ठरला. पायाच्या मसाजनंतर तो झोपी गेला. हे सर्व टास्क पार पडल्यानंतर तज्ञांची टीम सहभागींच्या झोपेचे वेळापत्रक का बिघडले आहे, याचे विश्लेषण करते.
स्रोत : Radii China
———————————————
भाषा वापरा, पण जपून…
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे चिनी भाषेत हळूहळू बदल होत आहेत का? अलीकडेच एका चिनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आणि ऑनलाइन शेअर केलेल्या लेखावरून हा प्रश्न पडतो. लेखक वांग झुओझोंगयू या लेखात असे म्हणतात की, साधीसरळ चिनी भाषा संपुष्टात येत आहे; कारण सोशल मीडिया संक्षेपांमुळे, भाषा अधिक “बालिश” आणि कमी “सर्जनशील” होत आहे. त्यांच्या या मतावरून गरमागरम चर्चा रंगली आहे. शब्दांच्या संक्षेपामुळे आम्हाला संवाद साधणे सुलभ जाते. तसेच, याद्वारे सांकेतिक भाषा तयार होते आणि तिचा वापर करणे जुन्या पिढीला शक्य होत नाही, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. चालू ट्रेण्डच्या बरोबर असल्याचे दाखविण्यासाठी मित्रांशी गप्पा मारताना मी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेले शब्द वापरते, असे फॅंग आडनावाच्या बीजिंग हायस्कूलमधील 11वीच्या विद्यार्थिनीने सांगितले. नव्या संक्षेपानुसार “yyds” म्हणजे देव आणि “xswl” म्हणजे मला हसवणारे, असे हे शब्द असून किशोरवयीन मुलांमध्ये ते लोकप्रिय आहेत. असे शब्द फक्त सोशल मीडियावर वापरले जातात, वर्गात वापरले जात नाहीत, असे फॅंगने स्पष्ट केले. मात्र तरीही, या नवीन शब्दांच्या घुसखोरीबद्दल अनेकांना काळजी वाटते.
चिनी ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून तिची एक विशिष्ट लय आणि नियम हजारो वर्षांपासून विकसित झाले आहेत. माझे लेख मला सुंदर बनवायचे असतात म्हणून मी जेव्हा लिखाण करते तेव्हा इंटरनेटवरील शब्द वापरणे टाळते; तसेच चालू ट्रेंडला आंधळेपणाने फॉलो करीत नाही, असे ऑनलाइन फिक्शनच्या लेखिका सिंडी सांगतात. इतर भाषातज्ज्ञ देखील या चर्चेत सहभागी झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने व्यक्त होताना ऑनलाइन भाषेमुळे काही धोका निर्माण झाला असला तरी, इंटरनेट शब्द आणि लिखित स्वरुपातील अभिव्यक्तीमध्ये वापरण्यात येणारे शब्द यांचे नियमन करून हा धोका टाळला जाऊ शकतो, असे या भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्रोत : Global Times
———————————————
देशी वस्तूंना प्राधान्य
चीनचे तरुण हे गुओचाओ म्हणून ओळखल्या जाणार्या ट्रेंडअंतर्गत देशी ब्रँड्सना अधिक पसंती देत आहेत. त्यातील काही चिनी शैली आणि संस्कृतीत अंतर्भूत आहेत. चिनी प्रशासन तसेच जे पारंपरिक चिनी उत्पादने विकतात ते या ट्रेण्डचा लाभ घेण्यासाठी सरसावले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, बीजिंगचे पॅलेस म्युझियम हे गुओचाओ ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे, ज्यामध्ये लिपस्टिक आणि लाली यासह कोरलेल्या पारंपरिक चिनी वस्तू या वर्षभर बेस्ट सेलर ठरलेल्या आहेत. ही उत्पादने ‘जनरेशन झेड’ ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, 1995 ते 2009 या कालावधीत जन्मलेले सुमारे 260 दशलक्ष चिनी नागरिक आहेत, ज्यांना “जनरेशन झेड” असे संबोधले जाते. आपल्या पालकांपेक्षा वेगळ्या वातावरणात वाढलेल्या या पिढीने जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून चीनचा उदय पाहिला आणि त्यांनी एक वेगळी कन्झम्प्शन कन्सेप्ट तयार केली.
स्रोत : China Daily
————————————————————
राष्ट्रीय संग्रहालयांची व्हर्च्युअल टूर
लॉकडाऊनच्या कालावधीत चीनमधील राष्ट्रीय संग्रहालयांकडून व्हर्च्युअल टूरला प्रोत्साहन दिले जात आहे. बीजिंगमधील पॅलेस म्युझियमची व्हर्च्युअल टूर केवळ संग्रहालयातील 1.86 दशलक्ष सांस्कृतिक अवशेषांच्या संग्रहाचे ऑनलाइन माध्यमातून हाय-रिझोल्यूशन प्रतिमाच दाखविले जात नाही तर नॉर्दर्न सॉन्ग राजवंशाच्या (960-1127) काळात रहदारीच्या रस्त्यावरील फेरीवाले यासारखे स्थानिक जनजीवन देखील दाखविले जाते. देशाच्या इतर भागातही याचीच पुनरावृत्ती होत आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने वास्तविक जीवनात कधीही भेट देऊ न शकणारे देखील अशा संग्रहालयाची टूर करू शकतात. डिजिटल टूर हे संग्रहालयांसाठी केवळ उत्पन्नाचे साधन बनलेले नाही तर, संग्रहालय छायाचित्रकारांनाही ते सहाय्यभूत ठरले आहे. इंटरअॅक्टिव्ह डेटाबेस 24 तास उपलब्ध असल्याने आपले कार्य अधिक सुलभ झाले आहे, असे संग्रहालय छायाचित्रकार ह्युआंग यी यांनी सांगितले. “आता मला संदर्भ देण्यासाठी बरीच माहिती मिळाली आहे. जरी त्या क्षणी माझ्याकडून काही निसटले तरी, मी घरी परत आल्यानंतर ते भरून काढण्याची संधी आहे, ह्युआंग म्हणाले. 14व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत (2021-2025) सार्वजनिक सांस्कृतिक स्थळे डि़जिटल करण्याबरोबरच ती नि:शुल्क खुली करणे तसेच इमर्सिव्ह टूर, व्हर्च्युअल प्रदर्शने आणि हाय-डेफिनिशन थेट प्रक्षेपण अशा नव्या सांस्कृतिक सेवा डिजिटलायझेशनद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा चीनचा प्रस्ताव आहे. यामुळे संग्रहालये तसेच संस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चांगली चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्रोत : People’s Daily
—————————————–
मोठ्या पडद्यांची व्यथा
संपूर्ण चीनमध्ये, विशेषत: शांघाय आणि बीजिंगमध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे अलिकडच्या काही महिन्यांत देशभरातील निम्म्याहून अधिक सिनेमागृहे बंद झाली आहेत. एप्रिल महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचा दिवसाचा एकूण गल्ला फक्त 1.17 दशलक्ष डॉलर्स होता. त्यातच नवीन ब्लॉकबस्टर आणि विषयांच्या अभावामुळे समस्या बिकट बनली आहे. सर्व काही पूर्वपदावर येईल, याची वाट अनेक स्टुडिओ पाहात आहेत. तर, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने बरेच सिनेमागृहांचे मालक निराश झाले आहेत. चीनच्या मूव्ही बॉक्स ऑफिसने मे डे या सुट्टीच्या दिवशी तुलनेत 297 दशलक्ष युआनची उलाढाल केली, परंतु गेल्या वर्षीच्या सुट्टीच्या दिवशी 1.67 अब्ज युआनच्या तुलनेत वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर ती अजूनही लक्षणीय घटच ठरली आहे. फक्त एवढेच की, यामुळे आशेचा किरण दिसू लागला आहे. तिकीटबारीची आकडेवारी पाहणारा प्लॅटफॉर्म माओयानच्या मते, सुट्टीनंतर सिनेमा क्षेत्र दिवसेंदिवस स्थिरावत आहे. या व्यवसायातील काही जण अधिक प्रगत उपायांचा अवलंब करत आहेत. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरीने ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत स्मार्ट सिनेमाचे सीईओ जॅक गाओ यांनी मांडले आहे. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्याचा आनंद मिळविण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करून एक “सुपर सिनेमा” मॉडेल तयार केले पाहिजे, असे ते सांगतात. म्हणजेच, थिएटरप्रमाणेच तिकीट खऱेदी करून एखाद्या व्यक्तीला फोनवरून प्रत्यक्ष प्रेक्षकांबरोबर सिनेमा पाहता येऊ शकेल.
स्रोत : China.org