चायनीज कम्युनिस्ट पक्षाची (CCP) पार्टी काँग्रेस म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रीय प्रतिनिधी काँग्रेस दर पाच वर्षांनी आयोजित केली जाते. सैद्धांतिकदृष्ट्या ही CCPची सर्वोच्च परिषद असते. जिथे CCPमधील उच्चस्तरीय नेतृत्व बदलते तसेच पक्षाच्या घटनेत होणारे कोणतेही औपचारिक बदल अंतिम केले जातात, त्यावर शिक्कामोर्तब केले जाते आणि स्वाक्षरी केली जाते. हा असा कार्यक्रम आहे, जिथे धोरणात्मक निर्णयांवर चर्चा केली जाते, वादविवाद होतात आणि मग त्यांना अंतिम रूप दिले जाते. त्यानंतर चीनचे राजकीय, लष्करी, आर्थिक आणि राजनैतिक निर्णय, CCP पुढील पाच वर्षांसाठी लागू करते. 70च्या दशकाच्या मध्यापासून, पाच वर्षांतून एकदा होणारी ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते; कारण यात घेतलेल्या निर्णयांमुळे चीनची दीर्घकालीन प्रगती कशी असेल, हे तपासता येते.
संरचनात्मकदृष्ट्या, काँग्रेससाठी पक्षातील सगळ्याच पातळ्यांवरील सदस्य उपस्थित असतात. यांची निवड अत्यंत विचारपूर्वक करण्यात येते आणि त्यांची नावे निर्देशित केली जातात. काँग्रेसाठी उपस्थित असलेले सदस्य केंद्रीय समितीची निवड करतात, ज्यात सुमारे 370 सदस्य असतात. ही केंद्रीय समिती CCPचे एक प्रकारचे संचालक मंडळ म्हणून ओळखले जाते. केंद्रीय समिती यामधून पंचवीस सदस्यीय पॉलिट ब्युरोची निवड करते. पॉलिटब्युरोकडून नंतर पॉलिटब्युरो स्थायी समितीची निवड केली जाते, जी CCPच्या शक्ती आणि नेतृत्वाचा केंद्रबिंदू मानली जाते. पाच ते नऊ लोक असलेली स्थायी समिती ही खऱ्या अर्थाने पक्ष आणि देश नियंत्रित करते.
या प्रत्येक स्तरांवर उमेदवारांची निवड, त्यांच्या नावांना पसंती किंवा नामांकने ही मतदान पद्धतीने न होता वाटाघाटी किंवा उमेदवारांना कुशलतेने हाताळत केली जाते. त्यामुळे प्रत्येक स्तरावर विना प्रतिबंधित सत्तासंघर्ष सुरू होतो आणि पराभूत, अयशस्वी, इच्छुक, अयशस्वी बंडखोर, किंवा सत्तेसाठी दावा करणारे अशा सगळ्यांसाठी चाळणी लावली जाते आणि विजयी उमेदवारांकडून इतर उमेदवार निर्दयीपणे तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी बाजूला केले जातात.
20वी काँग्रेस यंदा 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये नेमके काय घडते आणि त्याचे संभाव्य परिणाम काय होतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. सुरुवातीला म्हणजे 2002मध्ये असा निर्णय झाला होता की, पॉलिटब्युरोमधील ज्या सदस्यांचे वय 69 वर्षांपेक्षा जास्त असेल ते निवृत्त होतील. मात्र यंदा शी जिनपिंग यांना वयाच्या 69व्या वर्षी तिसऱ्यांदा पदावर कायम राहण्यासाठी समर्थन दिले जाईल आणि पॉलिटब्युरोतील 68वर्षांवरील सर्व सदस्य निवृत्त केले जातील. ही या काँग्रेची पहिली फलनिष्पत्ती!
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे नवीन सदस्य आणि नवे पंतप्रधान यांची निवड करण्यात येईल. सर्वसामान्य तर्कानुसार, पॉलिटब्युरो आणि स्थायी समितीमध्ये आपले विश्वासू लोक असतील याकडे शी जिनपिंग याचे विशेष लक्ष असेल. त्याचबरोबर तयहयात जिनपिंग हे चीनचे सर्वोसर्वा राहण्यासाठी घटना दुरुस्तीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी, अत्यंत शक्तीशाली नेता म्हणून चीनच्या इतिहासात शी जिनपिंग यांच्या नावाची नोंद होणार आहे. माओ झेडॉंग चिरायू होवो!
शी जिनपिंग तिसऱ्यांदा निवडून येत असतानाच, चीनसमोरील कमीत कमी भीतीदायक आव्हाने सांगणे अत्यंत अवघड आहे. चीनचा जीडीपी हा 2 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान असल्याने अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक बनली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली अर्थव्यवस्था दबली गेली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे, बॅंका, इन्फ्रास्ट्रक्चर फर्मस्, रिअल इस्टेट सेक्टर, खासगी कॉर्पोरेट, सर्वसामान्य जनता हे सगळेच कर्जाच्या बोज्याने मेटाकुटीला आले आहेत. नजीकच्या काळात, झीरो कोविड पॅलिसीमुळे निर्माण झालेला आर्थिक अडसर किंवा अचानक उद्भवलेली महामारी आणि त्याने मोठ्या संख्येने झालेले मृत्यू ध्यानी घेऊन लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आलेली शीथिलता, कोविडवरील फारशा परिणामकारक नसलेल्या लसी यामुळे चीनसमोर हॉब्सन चॉईस स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
दीर्घकालीन विचार करता, चीनला (एक अपत्य योजनेमुळे) अपरिवर्तनीय लोकसंख्या घसरणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे वृद्धांची संख्या वाढली असून, कार्यक्षम तरुणवर्ग झपाट्याने कमी होत आहे. मोठ्या उद्योगव्यवसायांमुळे एकेकाळी भरभराटीला आलेल्या खासगी क्षेत्राच्या खच्चीकरणामुळे चीनमधील व्यावसायिक वातावरण बिघडले आहे.
चीनच्या वाढीला पोषक ठरणारे बाह्य वातावरण होते, पण तेच आता त्याच्या वाढीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. परिणामी, परदेशी गुंतवणूक आटत चालली आहे, सप्लाय चेन अन्यत्र जात आहे तर परदेशी कंपन्याही आपला व्यवसाय चीनमधून बाहेर हलवत आहेत. युक्रेन युद्धामुळे जटिल बनलेले भू-राजकीय वातावरण आणि अमेरिका, युरोपियन युनियन, भारत, तैवान, शिनजियांग, हाँगकाँग आणि दक्षिण चीन समुद्र यांच्यातील तणावामुळे समस्या आणखीनच वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून सावरत असतानाच, यावर्षीचा अभूतपूर्व दुष्काळ हा चीनमध्ये झालेल्या हवामान बदलांची नांदी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 20व्या काँग्रेसकडून येणाऱ्या संकेतांबाबत अनुमान लावणे कठीण नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या बाबतीत चीनमधून जे संकेत मिळत आहेत, त्यावरून शी जिनपिंगच्या हाती चीनचे भवितव्य असेल, हे अगदी स्पष्ट आहे.
राजकीयदृष्ट्या, शी जिनपिंग चीनवर संपूर्ण एकहाती आणि एकाधिकारशाही नियंत्रण ठेवण्यासाठी तयार आहे. “शी जिनपिंग विचार” पक्ष काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे CCPला मजबूती देणे, देशांतर्गत मोठ्या प्रमाणात पाळत ठेवणे, भ्रष्टाचारनिर्मूलन आणि निवडक परंतु व्यापक प्रमाणातील सेन्सॉरशीपवर आधारित राष्ट्रवाद अशी अतिकेंद्रीत व्यवस्थेची आपण कल्पना करू शकतो. माहिती, डेटा आणि संस्था यावर राज्यांचे नियंत्रण हे सर्वसामान्य प्रमाण असेल. विषमता निर्माण करणारे खासगी उद्योग दुय्यम राहतील आणि मोठ्या सरकारी मालकीच्या उद्योगांचे वर्चस्व राहील. डेंग, हू आणि जियांग युगातील सुधारणा बाजूला टाकल्या जातील आणि त्या विरुद्ध पद्धतीने वापरल्या जातील. चीन शक्य तितक्या ‘डाव्या’ विचारसरणीकडे झुकेल. शी जिनपिंगने मांडलेल्या मताप्रमाणे “चिनी स्वप्नाचे पुनरुज्जीवन”, “अपमानाच्या शतकाचा बदला” आणि “चिनी स्वप्न साकार करणे” हे प्रमुख राजकीय प्रेरक असतील. 2049पर्यंत चीनला एक मजबूत, लोकशाहीयुक्त, सुसंस्कृत, सामंजस्यपूर्ण आणि आधुनिक समाजवादी देश बनवणे हा “विचार” आहे.
पक्ष काँग्रेसच्या या परिषदेत, क्रांतिकारी आवेश आणि आत्मसंतुष्टता टाळणे यासाठी खूप दबाव असेल. सोव्हिएत युनियनसारखे भवितव्य टाळण्यासाठी पक्षाच्या सतत स्व-सुधारणांवर भर दिला जाईल. तथापि, स्व-सुधारणेचा आशय अजूनही संदिग्ध आहे. त्यामुळे पक्ष काँग्रेस यावर प्रकाश टाकते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तथापि, चीन युएसएसआरसारखे संभाव्य धोके टाळू इच्छित असताना, तो स्वतःच काही चुका करणार आहे का किंवा केल्या आहेत का हे पाहणेही रंजक ठरणार आहे.
पक्षाचे चिनी सैन्यावरही नियंत्रण असेल. पिपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) आता केवळ दोनच सदस्य पॉलिटब्युरोमध्ये सहभागी करून घेऊन त्यांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. त्याचवेळी सात सदस्यीय स्थायी समितीमध्ये PLAच्या एकाही सदस्याचा समावेश करण्यात आलेला नाही. शी जिनपिंग यांनी याआधीच सेंट्रल मिलिटरी कमिशनची (CMC) आकार लहान केला असून सैन्याची संपूर्ण निष्ठा पक्षाशी (म्हणजेच शी) कशी राहिल याकडे लक्ष दिले आहे. CMCमधील सहा सदस्यांपैकी चार सदस्य पार्टी काँग्रेसनंतर निवृत्त होणार आहेत. नवीन सदस्य हे आपले दास्यत्व स्वीकारणारे असतील याची खात्री करूनच शी जिनपिंग सदस्य निवड करतील. त्यामुळे लष्करी घडामोडींवर पूर्ण नियंत्रण आणि ते आपल्या अधीन कसे राहील, यासाठीच जिनपिंग यांचा अजेंडा असेल. आधुनिकीकरण आणि जगातील सर्वात मोठे सैन्य तयार करणे हे चीनच्या स्वप्नाचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. पक्षाचे हितसंबंध जपण्याचे PLA हे एक साधन असल्याचा पुनरुच्चार केला जाईल.
संपत्तीच्या समान वाटपामुळे समृद्धी प्राप्त करणे हे 20व्या कॉंग्रेसचे एक प्रमुख ‘रणनीती धोरण’ असेल. समान समृद्धीसाठी एक स्पष्ट आणि अधिक तपशीलवार रोड मॅप सर्वोच्च नेतृत्वाने पक्ष काँग्रेसच्या वेळी मांडणे अपेक्षित आहे. समान समृद्धी याचा सोपा अर्थ असा आहे की, श्रीमंतांकडून गरीबांकडे संपत्तीचा ओघ सरकारकडून वळवला जाईल – अगदी रॉबिन हूड स्टाईलने. हे कसे केले जाणार आहे हे बघणे मनोरंजक असेल. समाजातील श्रीमंत आणि संपन्न वर्गातील गरिबांच्या हातात पैसा देऊन ग्राहकवादाला किक स्टार्ट केल्याची चर्चा आहे. सामान्य समृद्धी ही व्यापक असमानता दूर करण्यासाठी चांदीची गोळी आहे. “ड्युअल सर्क्युलेशन” हे आर्थिक पुनरुज्जीवनाचा प्रमुख मापदंड असेल.
तैवानबरोबर पुन्हा एकीकरण करणे हा मुद्दा काँग्रेसच्या अजेंड्यावर सर्वात वरती असेल. हा “पुनरुज्जीवन” प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे तैवानसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी शी जिनपिंग यांच्या कृती आणि मोहिमेला मनापासून पाठिंबा मिळेल. आवश्यक असल्यास बळाचा वापर करण्यास मान्यता दिली जाईल. नॅन्सी पेलोसीच्या तैवान भेटीनंतरचा हाय ऑक्टेन लाइव्ह-फायरिंग ड्रामा आता छातीत धडकी भरवणाऱ्या कृतींची एक झलक होती. विशेष म्हणजे, शी जिनपिंग यांनी गेल्या एका वर्षात तिबेट, शिनजियांग आणि हाँगकाँगलाही भेट दिली आहे. त्यांनी “एक देश, दोन व्यवस्था” मॉडेल अंतर्गत या अशांत प्रदेशांच्या प्रशासनावर आपले विचार मांडले आहेत. “विभाजन” किंवा केवळ “देशभक्तहीन” मानल्या जाणार्या कोणत्याही गोष्टीला जागा नाही, असे त्यातून दिसले आहे.
हा राष्ट्रवादी उत्साह काँग्रेसच्या काळात परत एकदा दिसून येईल. “बाहेरील शक्तींद्वारे” चीनमध्ये एखाद्या ‘रंगा’ची क्रांती घडवून आणण्याची कोणतीही प्रवृत्ती किंवा कृती असल्यास ती शोधून काढण्यासाठी राज्य यंत्रणेला आदेश दिले जातील. चीनच्या सांस्कृतिक आणि प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे याला अजेंड्यावर अग्रक्रम असेल.
कोविडशी लढा देण्याच्या सरकारच्या मजबूत संकल्पाचे समर्थन करण्याचा पुनरुच्चार 20व्या पक्ष काँग्रेसमध्ये केला जाईल. व्यापक लॉकडाऊन आणि मास टेस्टिंगद्वारे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू कसे टाळले गेले याचा गौरव करण्यात येईल. चीनच्या उत्कृष्ट प्रशासन मॉडेलला बळकटी देण्यासाठी इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी मृत्यू दर आणि जीव वाचवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यांचा उल्लेख करण्यात येईल.
वृद्धांमध्ये झालेले कमी लसीकरण आणि कमी परिणामकारक लसींचे वर्णनही अत्यंत आकर्षक पद्धतीने केले जाईल. कोरोनावर विजय मिळवत असल्याचे सांगत, घसरलेला जीडीपी आणि आर्थिक उद्दीष्ट्य साध्य करण्यात आलेले अपयश याची माहिती देण्याची घाई न करता, पार्टी काँग्रेसमध्ये चीनमधील झीरो कोव्हिड पॉलिसी कायम ठेवण्यावर भर दिला जाईल. उर्वरित जग कोविडसोबत जगायला शिकले आहे, तर चीनला शी जिनपिंग यांच्या झीरो-कोविड पॉलिसीसोबत जगायला शिकण्यास सांगितले जाईल. लॉकडाऊन आणि मास टेस्टिंगमुळे चीनमध्ये व्हायरस नियंत्रणाबाहेर असल्याचेच आपल्याला पाहायला मिळेल.
चिनी कम्युनिस्ट पक्ष आता जागतिक समाजवादी चळवळीचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. जिथे साम्यवाद अजूनही अस्तित्वात आहे अशा जवळपास 100 देशांचे आपण नेते असल्याचे चीन स्वतःला मानतो. ही कॉंग्रेस जागतिक नेतृत्व ठरवण्याचे प्रमुख व्यासपीठ असेल. या आधारावर, BRI कर्जाअंतर्गत ग्लोबल साउथवरील आर्थिक नियंत्रणाचा लाभ घेतला जाईल. SCO आणि BRICSमध्ये चीनच्या नेतृत्वावरही भर दिला जाईल.
चीनच्या जागतिक नेतृत्वावर दावा करण्यासाठी 20व्या पार्टी काँग्रेस या व्यापक फ्रेमवर्कचा वापर करेल. भांडवलशाहीचा प्रसार तसेच मध्य आशियाचा जगभरातील वर्चस्व नाकारण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून होत असलेल्या दुष्ट डावपेचांना आळा घालण्याच्या दृष्टीने चीनची भूमिका महत्त्वाची असेल. लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने काँग्रेस आपल्या वुल्फ वॉरियर्सना चीनचा ‘मुत्सद्दी संघर्ष’ पुढे नेण्याचा परवाना देईल. ‘इतरांनी चीनची गळचेपी करण्याचा काळ आता संपला आहे आणि कोणतीही शक्ती चीनचा विकास व प्रगती रोखू शकत नाही,’ यासारखी विधाने वारंवार केली जातील.
एकंदरीत, 20वी पार्टी काँग्रेस शी जिनपिंग यांच्या अधिकारांना बळकटी देणारी असेल तर, चीनमध्ये एकछत्री राज्यकारभार राहील याची निश्चिती CCP करेल. चीनच्या समाजाला आणि लोकांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्यांना स्थान मिळणार नाही. ठरलेल्या कम्युनिस्ट भूमिकेप्रमाणे, ते क्षुल्लक म्हणून बाजूला सारले जातील. येथील सर्व कार्यवाहीवर एकाच गोष्टीचा प्रभाव असेल तो, म्हणजे सर्वात श्रेष्ठ कोण, हे दाखवण्याची चढाओढ आणि याशिवाय कम्युनिस्ट राहू शकत नाहीत. आपण वास्तवात तसे नसतानाही, आपणच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहोत, असा विश्वास स्वत:त निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
(अनुवाद – आराधना जोशी)