युद्धाचा देव असतो तोफखाना
जोसेफ स्टालिन
द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक हे अलौकिक सौंदर्य आणि सन्मानाचे स्मारक आहे, जे बांधताना खूप विचारपूर्वक त्याचे डिझाइन केले गेले आहे आणि याची उभारणीही आदराने केली गेली आहे. प्रत्येक कबरींच्या दगडाची स्वतःची अनोखी कहाणी आहे. मुख्य समाधीवर ‘काही तरुण योद्धे येथे झोपले आहेत’ असे कोरलेले आहे. स्मारकाच्या मध्यभागी तोलोलिंगच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकत आहे, हे भव्य दृश्य नेत्रदीपक आहे. आज सगळीकडे शांतता आहे, लोक शांत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी इथे रक्ताची होळी खेळत शौर्य आणि बलिदानाच्या जोरावर, वर बसलेल्या शत्रूचा पूर्ण पराभव करून विजयाचा मार्ग मोकळा झाला तेव्हा, तोफांच्या गर्जनेने हा संपूर्ण परिसर गुंजत होता.
30 जुलै 2022 रोजी सकाळी मी या उंचीवर असलेल्या द्रास वॉर मेमोरियलमध्ये सूर्य प्रकाशाचा आनंद घेत होतो. महासंचालक, तोफखाना आणि वरिष्ठ कर्नल कमांडंट, वरिष्ठ लेफ्टनंट जनरल टी. के. चावला यांनी येथे उपस्थित असलेल्या छोट्याशा मेळाव्याला संबोधित केले. तेथे असलेल्या लोकांमध्ये काही वरिष्ठ कारगिल कॉन्स्टेबल, सध्याचे कमांडिंग अधिकारी (लष्कराच्या भाषेत टायगर), तोफखाना कमांडर (बुल्स) आणि वरिष्ठ कमांडर यांचा समावेश होता. 1999 च्या कारगिल युद्धात ‘ऑपरेशन विजय’मध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या गनर्सना श्रद्धांजली वाहण्यासाठी पॉइंट 5140च्या ‘गन हिल’ असे नामकरण करण्याच्या समारंभात हे सर्वजण उपस्थित होते.
तोफखान्याचे महासंचालक यांनी, त्यांच्या नेमक्या शैलीत, अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने, आम्हाला पॉइंट 5140चे गन हिल असे नामकरण करण्याची परवानगी मिळविण्यासाठी संचालनालयाला ज्या गुंतागुंतीच्या नोकरशाही मानसिकतेला आणि आव्हानांना सामोरे जावे लागले, त्याबद्दल माहिती दिली. त्यांच्या भाषणात तोफखानाच्या दृष्टिकोनातून कारगिल युद्धाचा संपूर्ण तपशीलही मांडण्यात आला.
या प्रसंगी तेव्हाचे ब्रिगेडियर आणि आताचे मेजर जनरल लखविंदर सिंग वायएसएम (आमच्यासाठी कोड साइनमध्ये लकी) ज्यांना अँग्री बुल म्हटले जात होते आणि 1999मध्ये येथे तैनात आर्टिलरी युनिटचे पराक्रमी टायगर्स जसे मेजर जनरल (तत्कालीन कर्नल) आलोक देब, कर्नल मेंदिरट्टा, लेफ्टनंट जनरल रंजन (तत्कालीन कर्नल), लेफ्टनंट जनरल जॉर्ज (तेव्हाचे कर्नल), कर्नल पासी, ब्रिगेडियर मिश्रा (तेव्हाचे कर्नल) इत्यादींनी आपल्या आठवणींना उजाळा देत सर्वांसमोर विलक्षण अनुभव मांडले.
मी तुम्हाला या युद्धाची काही तथ्ये सांगतो, मला समजले त्यानुसार, शत्रू नियंत्रण रेषा पार करून आमच्या बाजूला आला होता आणि त्याने अनेक लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थानांवर कब्जा केला होता, ज्यामुळे लडाखला जाणारा सुमारे 45 ते 50 किलोमीटरचा महामार्ग त्यांच्या निशाण्यावर आला होता. त्यांनी सिमला करारातील तरतुदींचे उल्लंघन केले होते. या करारात दोन्ही देशांना उंच डोंगराळ प्रदेशात हवामानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्या टाळण्यासाठी हिवाळ्यात चौक्या रिकाम्या ठेवण्याची सवलत देण्यात आली होती.
1999च्या उन्हाळ्यात आमच्या चौक्या ताब्यात घेण्यामागचा शत्रूचा विचार स्पष्ट होता. त्यांना द्रास भागात राष्ट्रीय महामार्ग अडवून हिवाळ्यात लडाखला आवश्यक वस्तूंचा पुरवठा रोखायचा होता. या भागात आणि ग्लेशिअरपर्यंत असणाऱ्या भारतीय लष्कराच्या प्रस्थापित लष्करी श्रेष्ठत्वाला धक्का देण्याचा त्यांचा हेतू होता. या भागात भारताचा पराभव झाल्यास काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया तीव्र होतील, असेही आक्रमकांना वाटत होते. अशा अशांत, अस्थिर परिस्थितीत जगाला जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्यास भाग पाडले जाईल आणि त्यावरील भारताची पकड कमकुवत होईल.
भारताच्या दृष्टीने हा भूभागाचा प्रश्न असल्याने हे पूर्णपणे अस्वीकार्य होते.
भारतीय लष्करासाठी हा लढाईचा आणि विजयाचा क्षण होता. कारगिलमध्ये घुसखोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष सशस्त्र दल याला कसे प्रत्युत्तर देते आणि जिंकते याकडे लागले होते. इन्फेन्ट्रीसाठी सर्वात कठीण काम होते. उंच शिखरांवरील चौक्या परत मिळवण्यासाठी भीषण, जोखीम असलेली, आत्मघातकी लढायांची गरज भासली, तरी त्यांना त्या करायच्या होत्या. पराजय-मृत्यूसारख्या वाईटाची भीती वातावरणात दिसू लागली. विजय हे दूरचे स्वप्न वाटत होते. काही अयशस्वी हल्ल्यांनंतर निराशेची ही भावना अधिकच गडद झाली. शत्रूने मोर्चेबांधणी केली होती. कंबर कसली होती, दीर्घकालीन युद्धासाठी तो तयार झाला.
1999च्या जूनच्या पहिल्या आठवड्यातील हा तोच क्षण होता, जेव्हा गनर्सनी (तोफखाना सांभाळणाऱ्यांनी) त्यांचे खरे कौशल्य दाखवले.
अलिकडच्या वर्षांत भारतीय सैन्यातील सर्वात कठीण प्रसंगांमध्ये तोफखाना माऱ्याचे सर्वात धाडसी आणि सर्वात अनोखे तंत्र पाहिले गेले आहे. ‘युद्धाच्या या देवां’नी एवढा जबरदस्त हल्ला केला की, शत्रूने गुडघे टेकले आहेत. आमच्या पायदळांनी तटबंदीमागच्या सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये घुसून शत्रूला चारी मुंड्या चीत केले आहे.
अडचणी अमर्याद होत्या. मॅपिंग अपूर्ण होते किंवा नव्हतेच. हवाई निरीक्षण पोस्ट कव्हर देखील तेथे अस्तित्वात नव्हते.
ज्यांना या परिसराची ओळख होती अशा चांगल्या मुख्य टेहळणी अधिकाऱ्यांचीही कमतरता होती. कुशल वाहनचालक नव्हते… यादी न संपणारी होती.
तुकड्या शक्य तितक्या उंच आणि मोकळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. घामाचा वास, उंचावर आग ओकणारा सूर्य, पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढेच अन्न… आणि या सगळ्यामध्ये शस्त्रे सांभाळा, दारूगोळा तयार ठेवा… बंदुकधाऱ्यांना रोखू शकेल, असा कोणताही अडथळा तिथे नव्हता.
या कठीण, आव्हानात्मक परिस्थितीत, बुल, 8व्या माऊंटन आर्टिलरीने आपले काम सुरू केले. त्यांनी लगेचच आपल्या काही चांगल्या लोकांना बोलावून नियोजन सुरू केले. तात्पुरत्या बंकर्समध्ये काळा चहा घेत होणाऱ्या भेटींदरम्यान पुढील काही दिवसांतच मेहनती, सक्षम आणि जिगरबाज तोफखाना टायगर्सने तोलोलिंग काबीज करण्यासाठी एक उत्कृष्ट योजना आखली.
अनुभवी टेहळणी निरीक्षण अधिकारी (ज्यांपैकी एक मी होतो) स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून शत्रूने ताबा घेतलेल्या ठाण्यांपर्यंत पोहोचले. शत्रूच्या स्थितीचा नेमका अंदाज घेणे आणि आवश्यक डेटा आणि माहिती गोळा करणे हे उद्दिष्ट होते. जेणेकरुन तोलोलिंग आणि इतर महत्त्वाच्या पोस्ट मुक्त करण्यासाठी एक फुलप्रूफ योजना बनवता येईल.
हा नावीन्यपूर्ण प्रयोग एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला होता – अप्रत्यक्ष प्रत्यक्ष गोळीबार, अनेक सतत बदलणाऱ्या पोझिशन्स तसेच दारुगोळ्यातील बदल, एकल तोफेने बंकर उडवणे, अपरिचित भूभागासाठी विटनेस पॉइंट प्रोसिजर, लक्ष्य सोडून इतर स्थानासाठी अगदी शेवटच्या क्षणी बदल करणे, कमीत कमी जागा व्यापण्यासाठी एकमेकांच्या अगदी जवळ चालणारी वाहने.
एकदाची नोंदणी पार पडल्यानंतर लगेचच 16 आर्टिलरी बॅटरीजने 100हून अधिक तोफांमधून मारा सुरू केला. शेकडो कुशल गनर्स जसे काही चोवीस तास मारा करण्यासाठीच रणांगणात उतरले होते. दारुगोळा, धूळ आणि धूर यांच्यातून विनाशाचा असा वास पसरला होता की, जणू त्याने धरतीही हादरत होती.
जेव्हा बेलजब, अमन, रेशेफ, मेहफस्टोफेल्स, नरकासुर आणि महिषासुर यांसारख्या राक्षस वेढले जातात, तेव्हा ते भीतीने थरथर कापायचे आणि जीव मुठीत घेऊन पळ काढायचे, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. बंदुकांचा हा ऑपेरा जणू प्राचीन निकोमेडियाच्या डायओस्कोरस दहनाची पुनरावृत्ती होती, हा तोच भयंकर राक्षस होता ज्याने तोफखान्याचा संरक्षक संत, संत बार्बरा यांचा शिरच्छेद केला होता. तोफांच्या फ्लॅश हायडर्समधून निघणाऱ्या ज्वाला अशा भासत होत्या जणू काही नरकातल्या सर्व राक्षसांच्या शेपट्यांना खुद्द हनुमानानेच आग लावली होती. ज्यांनी कारगिलमधील तोफखान्यांचा हल्ला पाहिला आहे, ते बंदुकीच्या गोळ्यांचा त्यासोबत असणारा अद्भूत समन्वय आयुष्यभर विसरू शकत नाहीत.
डोंगराच्या माथ्यावर जणू मृत्यू नाचत होता, तेथे बसलेले शत्रूचे सैन्य जसे काही नरकाच्या आगीत जळत असल्याचे त्यांच्या आक्रोशातून स्पष्ट होत होते. त्यांचे रेडिओ संदेश देखील त्यांच्यात पसरत चाललेल्या दहशत, भीती आणि घाबरगुंडीची साक्ष देत होते. इथे आमचे सैनिक एक वेगळीच धून वाजवत होते – ‘ये दिल मांगे मोर’.
आमचे पायदळ जसजसे पुढे जात होते, तसतसे एकामागून एक शत्रूची मोर्चेबांधणी आमच्या तोफांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त होत होती. आमचे सैनिक त्या दुर्गम तळांवर पोहोचले आणि उरलेल्या शत्रूंवर छापा टाकून त्यांना पकडत राहिले. लढाईच्या या तीव्र लढ्याच्या काळात, शांतीदूत विभाग म्हणून काम करणार्या लढाऊ सशस्त्र दल आणि लढाऊ सपोर्ट दलाची रेषा पुसट झाली होती. हा संपूर्ण सांघिक प्रयत्न होता. हल्ल्याचे नेतृत्व करणारा इन्फंट्री कंपनी कमांडर गंभीर जखमी झाला होता आणि तोफखाना निरीक्षण पोस्ट ऑफिसरने कमांड हातात घेऊन हल्ला यशस्वीपणे पार पाडल्याचे अनेक प्रसंग आले.
दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, भारतीय तोफखान्याकडून कारगिल, द्रास, बटालिक मशकोह सेक्टरमध्ये 2.5 लाखांहून अधिक दारुगोळ्यांचा मारा केला.
तेव्हापासून गेली 22 वर्षे शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि वाचले गेले. खरेच, लीडलरशिपने पॉइंट 5140चे ‘गन हिल’ असे नामकरण करण्याचे मोठे औदार्य दाखवले आहे. भारतीय तोफखान्याने केलेल्या विद्ध्वंसामुळेच गन हिल ताब्यात घेणे शक्य झाले. कारगिलमध्ये 30 जुलै 2022 रोजी झालेला नामकरण सोहळा भव्यदिव्य असाच होता.
येथे जमिनीखाली झोपलेल्या त्या वीर, शूर हुतात्म्यांना आपण कधीही विसरू शकत नाही, ज्यांनी आपले डोके अभिमानाने उंच ठेवता यावे यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
तोफखाना चालवणारे आम्ही आमच्या बंदुकांच्यासाठीच जगतो आणि मरतो.
सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल!
कर्नल सादा पीटर (निवृत्त), कारगिल योद्धा
(अनुवाद : आराधना जोशी)