दिल्लीतील कर्तव्य-पथ येथे 26 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनीच्या परेडमध्ये भारतीय नौदलाच्या 144 नाविकांचा समावेश असलेल्या तुकडीचे नेतृत्व, लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत करणार आहेत. त्या नौदलाच्या, डोर्नियर 228 या समुद्री गस्त घालणाऱ्या विमानाच्या निरीक्षक आहेत. यानिमित्ताने भारतीय नौदलाकडून दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय तीन महिला आणि पाच पुरुष अग्निवीरही या मार्चिंग परेडमध्ये सहभागी होतील. तसेच एक अन्य महिला अधिकारी, सब- लेफ्टनंट वल्ली मीना एस यांचाही तीन प्लाटून कमांडरमध्ये सहभाग असेल.
यंदाच्या परेडमध्ये नौदलाकडून होणाऱ्या संचलनाचा मुख्य गाभा ‘नारी शक्ती’ असा आहे. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत स्वदेशी आखणी आणि निर्मिती केलेली, स्कॉर्पीन किंवा कलवरी पाणबुडी तसेच लढाऊ जहाज नीलगिरी अशा बहुआयामी क्षमतांचे प्रदर्शनही संचलनात केले जाणार असल्याची माहिती भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सूरज बेरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
फ्रंट-लाइन युद्धनौकांवर साधारण ३० महिला अधिकारींची नेमणूक करण्यात आली आहे. विमान आणि हेलीकॉप्टर पायलट तसेच वायु संचलन अधिकारी म्हणून या महिला अधिकाऱ्यांची नौदलात नेमणूक झाली आहे. नौदल तुकडीचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मी एनसीसी होते, तेव्हापासून अशाप्रकारचे नेतृत्व करणे हे माझे स्वप्न होते, असे लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘’भारतीय नौदल- युद्धासाठी सज्ज, विश्वसनीय, सुसंबद्द, भविष्य घडविणारे”, ही यंदाची नौदलाच्या परेडची मध्यवर्ती कल्पना आहे. याबरोबरच गेल्या वर्षी नौदलात सहभागी झालेल्या महिला चालक डॉर्नियर विमानाच्या आकाशातील कसरतीही दाखवणार आहेत. स्त्रीशक्तीचा सन्मान हा यामागचा हेतू आहे.
शोभायात्रेच्या मुख्य भागात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत नौदलाचे विविध उपक्रम दाखविले जाणार आहेत. तर मध्यवर्ती भागात, नवनिर्मित स्वदेशी बांधणीच्या निलगिरी श्रेणीच्या जहाजाची प्रतिकृती आणि त्यावर तैनात केलेले समुद्री कमांडो असतील. तसेच ध्रुव हेलीकॉप्टरही दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्य / मध्यवर्ती भागाच्या दोन्ही बाजूंना स्वदेशी असलेल्या कलवरी श्रेणीच्या पाणबुडीची प्रतिकृती दाखविली जाणार आहे. शोभायात्रेच्या / प्रदर्शनाच्या मागच्या भागात आयडीईएक्स-स्प्रिंट चँलेंज अंतर्गत, स्वदेशी अशा विकसित केल्या जाणाऱ्या, स्वायत्त मानव रहित प्रणाली असलेल्या तीन प्रतिकृती दाखविण्यात येणार आहेत.
भारतीय नौदलाचे प्रसिद्ध ब्रास बँडचे ८० संगीतकार, एम अँटनी राज यांच्या नेतृत्वाखाली ‘जय भारती’ हे नौदलाचे गीत सादर करणार आहेत.
(अनुवाद : चित्रा दिवेकर)