युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे रशियाने रणगाड्यांसह निम्म्याहून अधिक चिलखती लढाऊ वाहने गमावली आहेत आणि त्यांच्या सक्रिय लढाऊ विमानांच्या यादीत लक्षणीय घसरण झाली आहे, असे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या (IISS) अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे. IISS हे एक जागतिक सुरक्षा, राजकीय जोखीम आणि जगभरातील विविध लष्करी कार्यालयांमधील संघर्ष दाखवून देणारे प्राधिकरण आहे. मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये युक्रेनमध्ये रशियाच्या ‘विशेष लष्करी ऑपरेशन्स’ला सुरुवात झाली, आता त्याला एक वर्ष झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘द मिलिटरी बॅलन्स 2023’ ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यातील अहवालानुसार चालू युद्धाचा परिणाम केवळ या दोन मुख्य देशांवरच नाही तर युरोप आणि नाटोवर देखील होत आहे. चीनच्या मोठ्या लष्करी आधुनिकीकरणाच्या मोहिमेमुळे या प्रदेशातील लष्करी खर्चात आणि नवीन विविध धोरणात्मक आखणीमध्ये कशी वाढ झाली, याबाबतचाही अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्या अहवालातील प्रमुख निष्कर्षांमध्ये असे म्हटले आहे की, रशियाच्या सैन्यामधील काही अत्याधुनिक उपकरणांसह, विशेषतः त्याच्या चिलखती लढाऊ वाहनांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. रशियाच्या “चिलखती वाहनांच्या ताफ्याची रचनाच बदलली आहे, युद्धापूर्वी तैनात ताफ्यातील सुमारे 50 टक्के T-72B3 आणि T-72B3M याप्रकारातील तसेच अनेक T-80 रणगाडे गमावल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे”. त्यामुळे या युद्धसामग्रीच्या जागी जुनी सामग्री वापरणे मॉस्कोला भाग पडले आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही बाजूंच्या हवाई दलांचे नुकसान होत असताना, “हवाई चढाईत श्रेष्ठता मिळवण्यात रशियाला आलेल्या अपयशाचा अर्थ असा आहे की, त्याच्या सैन्याला क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून युक्रेनमधील लक्ष्याला (युक्रेन सैन्याला) गुंतवून ठेवावे लागले आहे.” अहवालानुसार, “रशियाने 2022 मध्ये त्याच्या सक्रिय सामरिक युद्धात लढाऊ विमानांच्या यादीतील सुमारे 6-8 टक्के विमाने गमावली आहेत, परंतु युद्धापूर्वी असलेल्या विविध प्रकारच्या विमानांच्या ताफ्यांचा विचार करता, प्रत्येक प्रकारच्या विमान ताफ्यांचे 10 ते 15 टक्के नुकसान झाले आहे. जसे की, बहुउपयोगी आणि जमिनीवर मारा करणारी विमाने – Su-30SM Flanker H, Su-24M/M2 Fencer D, Su-25 SM/SM3 Frogfoot आणि Su-34 Fullback, यांचा उल्लेख करता येईल.”
तर दुसरीकडे, युद्धापूर्वी युक्रेनकडे लढाऊ विमानांची संख्या कमी होती, पण नुकसान त्या तुलनेत अधिक होते. अहवालाच्या अंदाजानुसार, युक्रेनकडे या युद्धाच्या आधी सक्रिय असणाऱ्या लढाऊ विमानांच्या एकूण संख्येपैकी अर्धी विमाने गमावली आहे. सशस्त्र यूएव्ही आणि थेट-हल्ला करण्यासाठी आवश्यक युद्धसामग्रीच्या पुरवठ्यासाठी, 2022च्या उत्तरार्धात रशियाने इराणची मदत मागितली. अहवालात असेही म्हटले आहे की “याच्या बदल्यात इराणचे हवाई दल, रशियाकडून आलेल्या उपकरणांचे आधुनिकीकरण सुरू करेल, अशी शक्यता दिसत आहे.”
त्याचप्रमाणे, “2022च्या आक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या मानवहानीची भरपाई करण्यात आली, परंतु त्यामुळे कमी अनुभवी सैन्य भरती करण्यात आली,” असेही त्यात म्हटले आहे.
मुख्यतः पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या मदतीबद्दल युक्रेनने आभार मानले आहेत; कारण युक्रेनच्या तोफखाना आणि चिलखती वाहनांच्या ताफ्याने – बहुतेक सोव्हिएट व्हिंटेजने परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि यामुळे सोव्हिएट-युगातील सामग्री / उपकरणांपासून दूर असलेल्या पूर्व युरोपीय भू-संकल्पांच्या संक्रमणास देखील चालना मिळत आहे. तसेच फिनलंड आणि स्वीडननेही नाटोच्या युतीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केल्यामुळे नाटोलाही आक्रमणासाठी नवीन उद्देश मिळाला आहे.
पोलंड आणि इतर राष्ट्रांनी त्यांच्या लष्करी आधुनिकीकरणाला गती दिली आहे आणि दक्षिण कोरिया हे युरोपमधील प्रमुख संरक्षण पुरवठादार म्हणून, उदयास आले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्त्वपूर्ण परिणामांमध्ये, सुमारे 20 युरोपीय देशांनी, “संरक्षण खर्चात त्वरित वाढ किंवा दीर्घकालीन खर्चाच्या उद्दिष्टांसाठी मजबूत वचनबद्धतेची घोषणा केली आहे.” तथापि, वाढत्या सुरक्षा आव्हानांना न जुमानता, 2022मध्ये वाढत्या महागाईने, जागतिक खर्चाच्या दरात 2.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. घसरणीचे हे सलग दुसरे वर्ष आहे. परंतु विकासाचा दर 2021 मध्ये 3.5 टक्क्यांवरून 2022 मध्ये 0.8 टक्क्यापर्यंत घसरला असला तरीही, सलग आठव्या वर्षी युरोपियन संरक्षण खर्चात खऱ्या अर्थाने वाढ झाली आहे, असे त्यात म्हटले आहे.
संरक्षण अर्थसंकल्पात वाढ झालेली असूनही, वाढत्या महागाईने या गुंतवणुकीत अब्जावधींचा तोटा झाला आहे आणि 2022मध्ये सलग दुसऱ्या वर्षी जागतिक संरक्षण खर्च खऱ्या अर्थाने कमी झाला आहे. “2015 हे आधार वर्ष म्हणून वापरले तर, प्रभावी जागतिक संरक्षण खर्चाची क्रयशक्ती 2017पासून एकत्रितपणे 850 अब्ज अमेरिकन डॉलरने कमी झाली आहे,” असे त्यात नमूद केले आहे.
(अनुवाद : चित्रा दिवेकर)