पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर अचानकपणे एकामागोमाग एक हल्ले केले. गाझा पट्टीतून जमीन, आकाश आणि समुद्रमार्गे एकाच वेळी हे हल्ले होतील, असे नियोजन करण्यात आले होते. हल्ल्यांमागे अभूतपूर्व रणनीती आणि चार भागांत होणाऱ्या कारवाईचा समावेश होता, ज्याची सुरुवात एकीकडे गाझावरून 3,000 रॉकेट्सच्या अखंड माऱ्याने झाली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सीमेवर एकाच वेळी घुसखोरी केली आणि त्यांनी इस्रायलच्या सीमेवरील सिमेंटच्या भिंती आणि तटबंदीच्या विद्युत यंत्रणेवर – ज्याला ‘लोखंडी भिंत’ किंवा ‘स्मार्ट कुंपण’ असे म्हटले जाते – हल्ला केल्याचे सांगितले जाते. या भूभागवर कब्जा केल्यानंतर, त्यांनी इस्रायली प्रदेशात घुसखोरी केली, परिणामी 1,500हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 200हून अधिक जणांना ओलीस म्हणून पकडले गेले.
हल्ला करण्यासाठी निवडलेल्या वेळेमुळे संपूर्ण जग आणि इस्रायल हादरून गेले, इस्रायलने कबूल केले की, हमासचा हा हल्ला त्यांच्यासाठी अनपेक्षित होता. या पातळीवर होणाऱ्या कोणत्याही कामगिरीसाठी काळजीपूर्वक नियोजन आणि त्यात सहभागी असणाऱ्यांमध्ये अनेक महिन्यांच्या समन्वयाची आवश्यकता असते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार या हल्ल्यांसाठी हमासला किमान दोन वर्षे नियोजन करावे लागले असावे. शिवाय या हल्ल्यांच्या नियोजनाची माहिती, त्यांच्यावर करडी नजर असलेल्या गुप्तचर संस्थांना मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागली. या हल्ल्यांसाठी हमासला नेमकी कोणी मदत केली असावी, याचा देखील अभ्यासकांनी तर्क मांडला आहे. त्यापैकी एक कयास असा आहे की, हमासच्या नेतृत्वाकडून केले संभाषण टॅप केले जाऊ नये यासाठी Huawei फोनचा वापर केला असावा. मागील काही वर्षांमध्ये चीनने हमासला कशी मदत केली आहे? युद्धाच्या अपारंपरिक पद्धतींनी इस्रायल आणि गाझा यांच्या सीमेदरम्यान असलेल्या उच्च-तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणा निष्फळ ठरवण्यात कशी मदत केली? इस्रायल किंवा यूएस विरुद्ध झालेली संभाषणे सुरक्षित राखण्यासाठी Huawei फोन उपयुक्त आहेत का?
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी अनेक दशकांपासून आपल्या अजोड कामगिरीचा फाजील विश्वास बाळगला आहे. एरो-3, एरो-2 (कधीकधी एरो -4च्या शक्यतेवरही चर्चा केली जाते), या सर्वसमावेशक मिसाईल शिल्डसह शॉर्ट-रेंज मोर्टार, प्रोजेक्टाइल, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि रॉकेटचा सामना करण्यासाठी देशाच्या सीमेवर डेव्हिड स्लिंज आणि आर्यन डोमसारखी जागतिक स्तरावर दखल घेतलेली चार-स्तरीय हवाई संरक्षण उपकरणे आहेत. हल्ल्यांच्या मागील प्रयत्नांमध्ये हमासने ही प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. 7 ऑक्टोबरला झालेल्या या हल्ल्याची कुणकुण गुप्तचर यंत्रणेला न लागणे, यात कुठे चूक झाली हे तपासण्यासाठी इस्रायलकडून विश्लेषण केले गेले आहे.
या घटनेनंतर निर्माण झालेल्या अनेक मतमतांतरांमध्ये, अल बवाबा या जॉर्डन मीडिया साइटने प्रकाशित केलेल्या अहवालाने अनेक तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले. पाश्चात्य गुप्तचर संस्थांकडून केल्या जाणाऱ्या टेहळणीला युक्तीने बगल देण्यासाठी हमास Huawei स्मार्टफोन वापरत असल्याचे अहवालात म्हटले आहे. सुरक्षा सल्लागार आणि MI6चा माजी गुप्तहेर असणाऱ्या आयमेन डीन यांनी या दाव्यात तथ्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते MI6कडे असलेल्या माहितीनुसार, हमास चिनी तंत्रज्ञान, विशेषत: Huaweiचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत आहे. डीन यांच्या म्हणण्यानुसार, “Huawei! गेल्या 30 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून, हमासचे नेते आणि अतिरेकी Huawei फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप वापरत होते,” आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात की, ही गॅझेट क्रॅक करणे कठीण आहे. युएसमधील टेक कंपन्यांच्या बंदीमुळे चिनी कंपनी Huaweiने अशी इन हाऊस सिस्टीम विकसित केली आहे, जी हॅक करणे अतिशय अवघड आहे. पर्यायी तंत्रज्ञानाने हमासच्या प्रयत्नांना मदत केली असली तरी, या हल्ल्यांमागे असणारे संदर्भ आणि या प्रदेशातील सध्याच्या तांत्रिक प्रणालींमधील त्रुटींचे मूल्यांकन करण्यासाठी या संघर्षाचे तपशील समजून घेणे महत्त्वाचे आहे.
चीनचे 1988पासून पॅलेस्टाईनशी राजनैतिक संबंध असून त्यांनी उघडपणे पॅलेस्टिनी मागणीला पाठिंबा दिला आहे. यामुळे असे मानले जाते की, चिनी लोकांनी हमासला प्रामुख्याने दूरसंचार, पायाभूत सुविधा आणि पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान असे तांत्रिक सहाय्य देऊ केले आहे. चीनने अर्थातच समर्थनाचे हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत आणि इस्रायल-गाझा संघर्षात हस्तक्षेप न करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे वरवर पाहता चिनी तंत्रज्ञानाचा वापर झालेला दिसत असला तरी, त्यामागे काहीतरी वेगळेच कारण असू शकते.
लष्करीदृष्ट्या वरचढ असण्याबरोबरच अंतराळ विषयातही तज्ज्ञ असणाऱ्या गुप्तचर संघटनेबरोबर आपला सामना आहे, हे हमासला उमगलेले होते. म्हणूनच त्यांनी हल्ल्यांसाठी अपारंपरिक मार्ग निवडला. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामध्ये अनेक त्रुटी आहेत. सुरुवातीच्या वृत्तांनुसार हे लक्षात येते की, हमासने केलेले हल्ले शेकडो अतिरेक्यांनी खबरदारीने केलेल्या अनेक महिन्यांच्या नियोजनाचा परिपाक होता. याचा अर्थ असा होतो की, गुप्तचर यंत्रणांचा मानवी बुद्धिमत्तेवर विश्वास नव्हता किंवा मानवी स्रोतांनी आवश्यक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली नव्हती. सिग्नल इंटेलिजन्स (SIGINT)च्या दृष्टीने असे मानले जाते की, हमासने denial and deception (D &D) या सैद्धांतिक वापर करून मोठ्या प्रमाणात सायबर क्लीनअप मोहीम हाती घेतली असावी. याचे कारण असे की, गेल्या दोन वर्षांपासून, इस्रायली सुरक्षा अधिकार्यांचा असा विश्वास होता की, हमास आता सक्रिय नसून ते पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचे शत्रूत्व ओढवून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही; कारण हमासने गाझामधील नागरिकांवर लक्ष केंद्रित केले असून ते मार्च 2021च्या संघर्षातून अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत.
7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यांनंतर CSISच्या प्रारंभिक अहवालानुसार हमासने हल्ल्यांचा प्लॅन लीक होऊ नये म्हणून नियोजन बरीच गुप्तता बाळगली असावी. त्यामुळे परत एकदा आपल्याला अवकाश-आधारित बुद्धिमत्ता-संकलन तंत्रज्ञानाचा विचार करावा लागतो. युद्धाच्या अपारंपरिक किंवा जुन्या पद्धतींचा विचार करत असतानाच देशासमोर असणारे धोके सतत शोधत राहण्यासाठी ISR (intelligence, surveillance, and reconnaissance) तंत्रज्ञान सक्षम असणे आवश्यक आहे. यूएस डिफेन्स वनने आपल्या अहवालात, मानवी मार्गदर्शन आणि सखोल ज्ञानासह AIमध्ये अधिक चांगल्या समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली आहे, तसेच स्पेस-आधारित सेन्सर्स वापरण्याची वेळ आता सुरक्षित नाही हे स्पष्ट केले आहे, कारण हमासने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.
हरिणी मधुसूदन
(अनुवाद : आराधना जोशी)