काठमांडूस्थित एका थिंक टँकच्या अहवालानुसार, नेपाळमधील काही प्रमुख वृत्तपत्रे, चीनच्या तुलनेत भारताची प्रतिमा अधिक नकारात्मक पद्धतीने रंगवत आहेत. सेंटर फॉर सोशल इन्क्लुजन अँड फेडरलिझमच्या मते, पत्रकारितेतला पूर्वग्रह हा राष्ट्रवादाशी जोडला जात असून माहितीचा अभाव भारताच्या या नकारात्मक चित्रणात मोठी भूमिका बजावत आहे.
अलीकडेच ‘जिओपॉलिटीक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन डिसऑर्डर’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे आढळले आहे की, चीन आणि अमेरिका या देशांबद्दलही नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी भारतविषयक नकारात्मक बातम्या यात आघाडीवर आहेत.
फेब्रुवारी ते जून 2023 या कालावधीत 15 नेपाळी राष्ट्रीय दैनिके तसेच प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेल्या किंवा पोस्ट केलेल्या जवळपास 10,000 बातम्या आणि लेखांच्या विश्लेषणावर आधारित हा अहवाल आहे. हा तयार करण्यासाठी दा-विंची मॉडेल आणि कस्टमाइज्झ कोडिंगसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आल्याचे, थिंक टँकने म्हटले आहे.
पक्षपातीपणा, चुकीचे कनेक्शन, खोटे संदर्भ, वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडणे, तोतयेगिरी, हाताळलेले संदर्भ, बनावट सामग्री आणि संवेदनशील माहितीचा राजकीय कारणांसाठी वापर या मुद्दयांच्या अभ्यासासाठी अशा लेखांचे परीक्षण करण्यात आले. या माहितीच्या आधारे, प्रत्येक देशाबाबत नेपाळी माध्यमांचा सकारात्मक किंवा नकारात्मक स्कोअर प्रसिद्ध केला गेला आणि भारत सातत्याने यात अग्रणी राहिला.
भारताबद्दलच्या नकारात्मक अहवालात या देशाविरुद्ध असणाऱ्या पक्षपाती स्रोतांचा हवाला देण्यात आला आहे. यासाठी जे लेख किंवा अहवाल तपासले किंवा पोस्ट केले गेले त्यात पुरेसे पुरावे नव्हते तसेच महत्त्वाचे तपशील गायब होते. उपलब्ध माहितीचा चुकीचा वापर करून भारताचे चित्रण केले गेले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. “दिशाभूल करणाऱ्या आणखी काही मथळ्यांमुळे भारताबद्दल अधिकच नकारात्मकता दिसून येते.”
अमेरिकेच्या संदर्भातही नेपाळी माध्यमांनी केलेले वार्तांकन पक्षपाती आणि सदोष होते. अमेरिकेचे अधिक नकारात्मक चित्रण करण्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या किंवा खळबळजनक मथळ्यांचा मोठा सहभाग असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
नेपाळमध्ये अतिशय वादग्रस्त ठरलेल्या मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन कॉम्पॅक्टचे (एमसीसी) गेल्या वर्षीचे वार्तांकन हा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. अहवालानुसार, याबद्दल माध्यमांनी केलेले वार्तांकन संदिग्धता निर्माण करणारे, अर्धसत्य आणि अमेरिकेबद्दलचा तिरस्कार स्पष्टपणे दिसून येईल अशाप्रकारेचे होते. 500 दशलक्ष डॉलर्सचा हा करार उच्च क्षमतेचे ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आणि रस्ते सुधारण्यासाठी असले तरीही एमसीसीला बदनाम करण्यासाठी चिनकडून चुकीची माहिती पुरवण्याची मोहीम चालवली गेली, असा आरोप अमेरिकेने केला होता.
गंमतीचा भाग म्हणजे, चीनबद्दलचे नकारात्मक वार्तांकन वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असले तरी एकूण बातम्या अधिक अनुकूल होत्या, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. थिंक टँकचे संशोधन सल्लागार अजय भद्र खनाल म्हणतात, “चीनबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमध्ये सनसनाटी मथळे (headlines) कमी आढळतात.” याशिवाय माहितीमध्ये भरपूर प्रमाणात तफावतही आढळल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पुरेशी माहिती नसतानाही भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत चीनबद्दल नेपाळी माध्यमांमध्ये सकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. याउलट भारत आणि अमेरिकेच्या घडामोडींबद्दल माहितीतील तफावतींमुळे नकारात्मक चित्रण झाले.
पत्रकारांसोबत संशोधन गटाच्या झालेल्या चर्चेदरम्यान असे आढळले की प्रत्येक पत्रकाराची वैयक्तिक राजकीय आणि वैचारिक भूमिका आहे; त्यामुळे मतप्रदर्शन आणि विश्लेषणासाठी तटस्थ तज्ञ शोधण्याचे आव्हान होते; राष्ट्रीय भावनांचा वार्तांकनावर परिणाम झाला; संपादक, मीडिया मालक आणि वित्तपुरवठादार आपली भूमिका सोडायला तयार नाहीत आणि चीनचा सूक्ष्म प्रभाव नकळतपणे त्यांच्यावर झाला आहे.
हिमालयन टाइम्ससह अनेक नेपाळी माध्यमांचे संपादकपद भूषवलेल्या खनाल यांच्या मते, अहवालात राजकीय आणि सामाजिक वातावरण तसेच मानसिकतेचा व्यापक प्रभाव सूचित केला आहे.
“उदाहरणार्थ, नेपाळमध्ये भारतविरोधी राजकारण फोफावत आहे, ज्याचे प्रतिबिंब माध्यमांच्या कव्हरेजमध्ये दिसून येते,” असेही खनाल म्हणाले. “माध्यमे स्वतः कोणताही कंटेंट तयार करत नाहीत. ते फक्त राजकारणी आणि त्यांच्या भारताबद्दल असणाऱ्या नकारात्मक टिप्पण्यांचे वार्तांकन करतात. त्यामुळे भारताचे नकारात्मक चित्रण होते.”
कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा येथील सीमावादाचा नेपाळ भारत द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे. खनाल म्हणाले, “नेपाळी भूमीवर भारताचे कथित अतिक्रमण आणि नेपाळमधील सरकार बदलांमध्ये भारताच्या हस्तक्षेपांविषयीचे वार्तांकन नेपाळमध्ये मुख्य बातम्या बनत आहेत आणि त्या भारताबाबत अधिक नकारात्मक भूमिका बनवायला मदत करत आहेत,”
“नेपाळच्या डाव्या पक्षांनी जनसमर्थन मिळवण्यासाठी दीर्घकाळापासून भारतविरोधाचे भांडवल केले आहे,” असे भारतातील माजी राजदूत लोक राज बराल यांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले की, “भारत याआधी जेव्हा नेपाळविरोधी नेत्यांना राजकीय आश्रय देत होता (राजाच्या कारभार काळात) तेव्हा तत्कालीन निरंकुश पंचायती राजवटीने भारतविरोधी भूमिकेलाच चालना दिली होती. या घटकांमुळे नेपाळी जनतेच्या मनात़ भारतविरोधी भावना खोलवर रुजल्या आणि अशा भावना पुसून टाकणे कठीण आहे.”
भारत आणि नेपाळ यांच्यात जेव्हा जेव्हा वादाचे प्रसंग उद्भवतात तेव्हा तेव्हा राजकारणी आणि माध्यमांच्या कृतीतून भारतविरोधी खोलवर रुजलेला पक्षपात दिसून येतो. “जवळचा शेजारी म्हणून, भारतासोबत अनेक समस्या आहेत आणि त्यांची नोंद माध्यमे घेत असतात, त्यामुळे भारताचे नकारात्मक चित्रण होण्यास हातभार लागतो,” बराल पुढे म्हणाले.
चीनचे नेपाळसोबतचे संबंध अगदी अलीकडचे असल्याने माध्यमांमधून होणारे नकारात्मक चित्रण तो टाळू शकला. द्विपक्षीय संबंध मर्यादित ठेवतानाच काठमांडूशी अतिशय जवळीक टाळण्याबरोबरच पूर्णपणे उदासीन भूमिकाही नसल्याचा बराच फायदा चीनला झाला. “आता चिनी लोक नेपाळच्या राजकारणाला आकार देण्यासाठी सक्रिय तर आहेतच, शिवाय चिनी नागरिक देखील नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे त्यांना अलीकडच्या वर्षांत खूप नकारात्मक मीडिया कव्हरेज मिळू लागले आहे,” असे निरीक्षण बराल नोंदवतात.
नेपाळ कम्युनिस्ट पार्टीची (NCP) स्थापना करण्यासाठी 2018 मध्ये पूर्वीचे CPN (UML) आणि CPN (Maoist Centre) यांचे विलिनीकरण झाले, तेव्हा चीनने डाव्या शक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मार्च 2021मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा नवीन पक्ष विसर्जित करण्यात आला. या दोन्ही गटांना एकत्र आणून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चीनने पुढाकार घेतल्याचा आरोप आहे. अर्थात, ही युती दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकली नाही.
भारताच्या होणाऱ्या नकारात्मक वार्तांकनावर मात करण्यासाठी खनाल यांचा उपाय : “द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक यावर अधिक चर्चा झाल्यास नेपाळी माध्यमांमधून भारताचे नकारात्मक चित्रण हळूहळू कमी होऊ शकते.”
पृथ्वी श्रेष्ठ
(अनुवाद : आराधना जोशी)