दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये ज्या पद्धतीने नाझी पक्षाला नाकारण्यात आले होते त्याच पद्धतीने गाझाचे नि:शस्त्रीकरण आणि कट्टरतावादाचे निर्मूलन झाले पाहिजे, असे परखड मत इस्रायलच्या पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार मार्क रेगेव्ह यांनी मांडले आहे. इस्रायल-आशिया संस्थेने गाझा युद्धाबाबत मंगळवारी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
रेगेव्ह म्हणाले, “युद्ध समाप्तीनंतर लगेचच कट्टरतावाद संपुष्टात आला पाहिजे. इस्रायलला गाझावर ताबा मिळवण्याची किंवा तिथे राज्य करण्याची अजिबात इच्छा नाही. पण गाझाने देखील आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध राखले पाहिजेत आणि पॅलेस्टिनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे; जे गाझामधील सर्व लोकांच्या कल्याणासाठी काम करेल.”
गेली 16 वर्षे हमास तिथे राज्य करत आहे. या संपूर्ण काळात तिथल्या जनतेला नेमके काय मिळाले, हे लक्षात घेतले पाहिजे. तिथल्या नागरिकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये उग्रवाद आणि कटुता कशी निर्माण झाली आहे, याचा त्यांनी विचार करावा. उज्ज्वल भविष्यासाठी व्यावहारिकता आणि सहकार्य हाच एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले.
त्यांच्या मते, हमास युद्धविरामासाठी उत्सुक आहे. इस्रायली सैन्याने लपून बसलेल्या अनेक वरिष्ठ कमांडरांना बाहेर काढल्यामुळे हमास आता प्रचंड दबावाखाली आहे. मात्र ओलिसांची सुटका झाली तरच तात्पुरती युद्धविरामाची शक्यता आहे, असे इस्रायलचे स्पष्ट मत आहे.
ओलिसांच्या मुद्द्यावर हमासकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा दावा रेगेव्ह यांनी यावेळी केला. एकंदर 237 ओलिसांमध्ये काही 75 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक तसेच 18 वर्षाखालील अल्पवयीन, लहान मुले आणि अर्भके देखील होते. “बाळांना कोण ओलिस ठेवते? लहान मुले आणि बाळांना चालण्याआधीच पळवून नेण्याचा रानटीपणा कशासाठी?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, रेड क्रॉसने ओलिसांना भेटण्याची परवानगी मागितली, परंतु हमासने त्याला नकार दिला आहे. ओलिस जिवंत आहेत की नाहीत, हेही आम्हाला समजू शकलेले नाही, असे सांगत रेगेव्ह यांनी ओलिसांच्या मुद्द्यावर बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अधिक तपशील देऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्रायलच्या उत्तरेकडे लेबनॉनला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागात हिजबुल्लाहने काही हल्ले केल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले आहेत. त्यांना तिथून बाहेर काढण्यात आले असून इस्रायली सैन्य या दुहेरी आघाडींच्या युद्धासाठी सज्ज आहे.
“आम्हाला कोणीही आता आश्चर्याचा धक्का देऊ शकणार नाही,” असा इशारा देत रेगेव्ह पुढे म्हणाले, “इस्रायली सैन्य प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे, त्यांची नजर लहानात लहान गोष्ट टिपत आहे आणि शत्रू सक्रिय झाल्यास, सैन्य वेगाने पुढे जाईल. खरे सांगायचे तर 1967 (सहा दिवसांचे युद्ध) आणि १९७३ (योम किप्पूर युद्ध) प्रमाणेच आम्ही यावेळीही निर्णायकपणे जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेगेव्ह म्हणाले की, गाझा युद्धाबाबत अरब राष्ट्रांकडून जारी झालेली सार्वजनिक विधाने आणि इस्रायली प्रतिनिधींसमोर खासगीत व्यक्त झालेली विधाने यामध्ये फरक आहे. आखाती अरब देश किंवा उत्तर आफ्रिका यांना हमासने जे केले ते आवडलेले नाही. अपवाद फक्त कतारचा, जो हमासचा मजबूत पाठीराखा आहे.
गाझा युद्ध हा एक भू-राजकीय संघर्ष आहे. या प्रदेशाला अंधकारमय युगात परत घेऊन जाण्याचा हमास प्रयत्न करत असल्याने इस्रायल हमासशी लढत आहे. इस्रायलचा विजय हा गाझा आणि संपूर्ण मध्य-पूर्वेतील लोकांचा विजय असेल, तो संयम आणि सभ्यतेचा विजय असेल, असे ते म्हणाले.
(अनुवाद – आराधना जोशी)