संयुक्त कारवाईत श्रीलंकेच्या मच्छीमार नौकेची सुटका
नवी दिल्ली, दि. ३१: समुद्री चाचांच्याविरोधात सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई करीत भारतीय नौदलाने सोमाली चाचांच्या तावडीतून श्रीलंकेच्या मच्छीमार नौकेची सुटका केली. भारतीय नौदलाने श्रीलंका आणि सेशेल्सच्या नौदलाबरोबर संयुक्तपणे ही कारवाई केली. नौकेवरील सहा कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून, तीन चाचांनी नौदलासमोर शरणागती पत्करल्याचे नौदलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या नौकेला सुरक्षितपणे सेशेल्समधील माहे येथे नेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सोमालियाची राजधानी मोगादिशुच्या पूर्वेला ९५५ सागरी मैलावर असताना लोरेंझो पुथा -४ या श्रीलंकेच्या मासेमारी नौकेचे दि. २७ जानेवारी रोजी तिच्यावरील चालकदलाच्या सहा सदस्यांसह अपहरण करण्यात आले. या नौकेवरून आलेल्या संदेशानंतर नौदलाच्या आयएनएस शारदा या नौकेवरून अपहृत नौकेच्या शोधासाठी टेहेळणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. त्याचबरोबर श्रीलंका आणि सेशेल्सच्या नौदलाबरोबर संपर्क साधून त्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. हिंदी महासागर क्षेत्राशी संबंधित माहिती केंद्रालाही दिल्लीत हे कळवण्यात आले आणि त्यानंतर सेशेल्सच्या टोपाझ नावाच्या नौकेने २९ जानेवारी रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अपहृत नौकेचा पाठलाग करून ती अडवली व नौका व कर्मचाऱ्यांची चाचांच्या तावडीतून सुटका केली, असे भारतीय नौदलच्यावतीने सांगण्यात आले.
भारतीय नौदलाने सोमाली चाचांच्याविरोधात गेल्या तीन दिवसांत केलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यापूर्वी मंगळवारी अल-नईम या मासेमारी नौका व त्यावरील १९ पाकिस्तानी नागरिकांची नौदलाच्या कारवाईत सुटका करण्यात आली होती. भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या नौकेनेही सोमवारी चाचांच्याविरोधात कारवाई करून एफव्ही इमान या नौकेसह तिच्यावरील १७ कर्मचाऱ्यांची सुटका केली होती. समुद्रीचाचांचा उपद्रव वाढल्यामुळे भारताने या भागात आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेसह आयएनएस कोची, आयएनएस मरगाव, आयएनएस कोलकाता, आयएनएस चेन्नई, आयएनएस सुमात्रा, आयएनएस शारदा या युद्धनौका तैनात केल्या आहेत.
Team Bharatshakti