सिंगापूर एअरशो आजपासून (20 फेब्रुवारी 2024) सुरू झाला असून भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सारंग हेलिकॉप्टर टीमचे पहिले सराव सादरीकरण 18 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडले. या प्रदर्शनासाठी रिपब्लिक ऑफ सिंगापूर हवाई दलाच्या (आरएसएफ) चांगी एअर बेसवरून टीम कार्यरत आहे.
या एअरशोमध्ये सादरीकरण करण्यासाठी जगभरातील विविध टीम सहभागी झाले असून अग्रगण्य विमान आणि विमानाची कार्यप्रणाली निर्माण करणारे उत्पादक तसेच, प्रणाली चालक आपली उत्पादने या शोमध्ये प्रदर्शित करणार आहेत.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) निर्माण केलेले ध्रुव या प्रगत आणि वजनाने हलक्या हेलिकॉप्टरचे भारताच्या सारंग टीमकडून पहिल्यांदाच यावर्षीच्या एअरशोमध्ये सादरीकरण करण्यात येणार आहे. सारंग टीमने आपले पहिले आंतरराष्ट्रीय सादरीकरण याआधी 2004मध्ये सिंगापूरच्या चांगी प्रदर्शन केंद्रामधील आशियाई एरोस्पेस एअर शोमध्ये केले होते.
सारंग टीमकडून यंदाच्या सिंगापूर एअरशोमध्ये चार हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. ध्रुवमध्ये असलेले चापल्य तसेच या हेलिकॉप्टरची यंत्रणा हाताळणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांमध्ये असलेले उच्च दर्जाचे कौशल्य या प्रदर्शनामध्ये दिसणार आहे. स्वदेशी बनावटीचे ध्रुव आणि त्याचे अत्याधुनिक, प्रगत विविध प्रकार भारताच्या तीनही लष्करी सेवांसाठी वापरले जात आहेत.
सिंगापूर एअर शोमध्ये यशस्वी सादरीकरण झाल्यामुळे, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत जे काम करत आहे, त्याची यशोगाथा जगामध्ये पोहोचवणे शक्य होणार आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)