रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ ॲडमिरल निकोलाई येवमेनोव्ह यांना पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त रशियन प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फोंटांका या रशियन मीडिया हाऊसच्या वृत्ताप्रमाणे ॲडमिरल अलेक्झांडर मोइसेव्ह नौदलाचे कार्यकारी कमांडर-इन-चीफ बनतील.
सेंट पीटर्सबर्ग येथील खाजगी वृत्त सेवेने या नव्या नियुक्तीचे कोणतेही कारण सांगितले नसून नौदलाच्या वृत्त विभागानेही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
निकोलाई येवमेनोव्ह यांनी मे 2019 पासून रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ हे पद भूषवले आहे. रशियाने युक्रेनवर पूर्ण ताकदीने आक्रमण सुरू केल्यानंतर, अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिटन आणि इतर देशांनी त्यांच्यावर बंदी घातली होती.
गेल्या काही महिन्यांत, काळा समुद्र आणि क्रिमियामध्ये (जे 2014 मध्ये रशियात विलीन झाले) रशियन नौदलाच्या ताफ्यात वाढ झाल्याचा युक्रेनकडून सातत्याने दावा करण्यात येत आहे.
अलीकडेच काळ्या समुद्रात रशियन युद्धनौकेवर युक्रेनियन ड्रोनने अनेक हल्ले केले. परिणामी ती युद्धनौका बुडाली आणि रशियाची नौदल शक्ती क्षीण झाली. त्यामुळे युद्धाच्या तिसऱ्या वर्षात नौदलाच्या कामावर मर्यादा येत आहे.
याआधी डिसेंबरच्या उत्तरार्धातील हल्ल्यात, युक्रेनने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी क्रिमियाच्या फिओडोसिया बंदरातील नोव्होचेर्कस्क लँडिंग जहाज नष्ट केले.
युक्रेनने केलेले बहुतेक हल्ले स्फोटकांनी भरलेल्या रिमोट-नियंत्रित ड्रोन बोटींद्वारे केले गेले. या बोटी प्रगत जीपीएस आणि कॅमेऱ्यांसह सुसज्ज असून त्यांच्याकडे कमी रडार सिग्नेचर आहे ज्यामुळे त्यांना शोधणे कठीण होते. म्हणूनच रशिया क्षेपणास्त्रांच्या बाबतीत सुसज्ज असूनही युक्रेनला त्याच्या बाजूने नौदलाच्या युद्धामध्ये सहजपणे आघाडी घेता आली आहे.
युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन बोट 18 फूट लांब असून, तिचे वजन 1,000 किलोग्रॅमपर्यंत आहे आणि तिची मारक क्षमता 800 किलोमीटरपर्यंत आहे तर बॅटरीचे आयुष्य 60 तास आहे.
क्रिमियामधील रशियन मालमत्तांवर हल्ला करण्यासाठी युक्रेन ब्रिटन आणि फ्रान्सने पुरवलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांवरही अवलंबून आहे. ही क्षेपणास्त्रे बहुतेक तरी युक्रेन युएसएसआरचा भाग असताना वापरण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांमधून सोडण्यात आली होती आणि त्यांची श्रेणी 250 किलोमीटरहून अधिक आहे.
रामानंद सेनगुप्ता