दोन महिन्यात दुसरी घटना: लष्करी माहिती मिळविण्याचा प्रयत्न
दि. १२ मार्च: भारतीय सागरी क्षेत्रात बेकायदा घुसून हेरगिरी करण्याचा चीनचा प्रयत्न पुन्हा उघड झाला असून, भारतीय किनारपट्टीनजीक पुन्हा चीनची हेरगिरी करणारी नौका आढळल्याची माहिती आहे. चीन भारतीय किनारपट्टीनजीक टेहेळणी नौका पाठवून भारताची लष्करी गुपिते हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कालच झालेल्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच गंभीर मानली जात आहे.
‘रॉयटर्स’ या अमेरिकी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनची शियांग यांग हॉंग-०१ ही टेहेळणी नौका गेल्या आठवड्याच्या अखेरीस भारताच्या पूर्व किनारपट्टीनजीक आढळली. भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती मिळायचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर भौगोलिक माहितीप्रणाली व जहाजाच्या मार्गक्रमणावर लक्ष ठेवण्याच्या प्रणालीच्यामाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसारही हे सिद्ध झाल्याचे ‘रॉयटर्स’ने म्हटले आहे. भारत आणि चिनी लष्करादरम्यान गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. सीमावादामुळे दोन्ही देशांत १९६२मध्ये युद्धही झाले होते. चीनकडून भारताच्या अरुणाचलप्रदेश व अक्साई चीनवर सातत्याने दावा सांगितला जातो. मात्र, या दाव्यात कसलेही तथ्य नाही, असे भारताचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात मालदीवमध्ये आढळलेल्या जहाजाप्रमाणेच हे जहाज आहे. ही दोन्ही जहाजे चीनच्या नैसर्गिक स्त्रोत मंत्रालयाच्या मालकीची आहेत, असे भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, भारतीय किनारपट्टीनजीक आपण टेहेळणी नौका पाठविली नसल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. हे जहाज महासागरच्या पृष्ठभागाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यासाठी या परिसरात आले आहे. टेहेळणी करण्याच्या उद्देशाने नाही, त्यामुळे या जहाजाच्या उपस्थितीचा कोणताही गैरअर्थ काढू नये, असे चीनने म्हटले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मात्र चीनचा हा दावा फेटाळला आहे. या भागातील भारताच्या पाणबुड्यांच्या तैनातीची, तसेच इतर लष्करी बाबींच्या टेहेळणीसाठीच चिनी नौका भारतीय किनारपट्टीनजीक फिरत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास चीनचे हे जहाज बंगालच्या उपसागरात प्रविष्ट झाले, असे ‘द इंटेल लॅब’ या भू-स्थानिक हेरगिरी विषयक काम करणाऱ्या संस्थेतील संशोधक डेमीअन सायमन यांनी सांगितले. ही चिनी टेहेळणी नौका बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेला दिसून आली आहे व तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिनी नौका गेल्या महिन्यातही भारतीय किनारपट्टीनजीक आढळली होती. त्यापूर्वीही श्रीलंकेच्या हब्बनटोटा बंदरात चीनची टेहेळणी नौका आली होती. भारताने त्याला आक्षेप घेतला होता.
विनय चाटी