दाट लोकवस्ती असलेल्या गाझा शहरातील रफाह येथे मोठ्या लष्करी हल्ल्याची योजना रद्द करण्यासाठी इस्रायला मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव सामोरे जावे लागत आहे. या हल्ल्याचे विनाशकारी दूरगामी परिणाम होऊ शकतात असा इशारा देऊनही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मात्र हल्ला करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
इजिप्तच्या सीमेवरील गाझाचे दक्षिणेकडील शहर रफाहने सध्या इस्रायलशी सुरू असलेल्या संघर्षामुळे विस्थापित झालेल्या अंदाजे 15 लाख पॅलेस्टिनींना आश्रय दिला आहे. गाझावर राज्य करणारा दहशतवादी गट हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असणाऱ्या या युद्धात आधीच अनेकांवर अनेकदा विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
नेतन्याहू यांच्या प्रतिवादानुसार जोवर इस्रायली सैन्य रफाहवर हल्ला करून तिथे असलेल्या हमासच्या सैन्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करत नाही तोवर तिथे कोणत्याही प्रकारे शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. अनेक आठवडे सुरू राहणाऱ्या अशा हल्ल्यांपूर्वी पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर काढण्याच्या योजनेला आपण मंजूरी दिल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
दाट लोकवस्ती असलेल्या रफाह शहरावरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि रहिवाशांचे होणारे विस्थापन या शक्यतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मदत संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख याबरोबरच अनेक बड्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टीकाकारांच्या इशाऱ्यानुसार, मोठ्या प्रमाणात होऊ शकणाऱ्या मानवी संहारामुळे इस्रायल – पॅलेस्टिन संघर्षावर कोणताही शांततापूर्ण तोडगा निघणे अशक्य होईल.
जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी आठवड्याच्या शेवटी या प्रदेशाचा दौरा केला. त्यावेळी स्कोल्झ यांनी या हल्ल्यामागे असणारी जी उद्दिष्टे नेतान्याहू यांनी जाहीर केली आहेत ती रफाहमध्ये होणाऱ्या ” भयंकर मानवी हानीचे” समर्थन करणारी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. संहारक ठरू शकणाऱ्या मोठ्या शहरी हल्ल्याव्यतिरिक्त हमासचा धोका निष्प्रभ करण्यासाठी इस्रायलसमोर अन्य पर्यायी मार्ग नाहीत का? असेही स्कोल्झ यांनी विचारले आहे.
रफाहवरील हल्ल्ल्याला जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्याबरोबरच अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्रांसारख्या मित्र राष्ट्रांकडूनही मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विरोध होत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रफाहमधील मोठ्या प्रमाणावर होऊ शकणाऱ्या हल्ल्याला वॉशिंग्टनसाठी ‘धोक्याचा इशारा’ (रेड लाइन) म्हटले आहे.
तणाव वाढवू नका असे आवाहन केल्यानंतर नेतान्याहू जरी शांत असले तरी हमासने इस्रायली लोकांवर केलेल्या हिंसाचाराबद्दल टीकाकारांची “स्मरणशक्ती कमकुवत” असल्याचा आरोप केला आहे. ओलिसांची सुटका करून हमासशी संबंधित लष्करी कारवाई करण्यापासून इस्रायलला “कोणताही आंतरराष्ट्रीय दबाव रोखू शकणार नाही” असे त्यांनी जाहीर केले.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या इस्रायली – पॅलेस्टिनी संघर्षाच्या ताज्या उद्रेकामुळे पंतप्रधानांची ही कठोर भूमिका बघायला मिळाली आहे. ऑक्टोबर 2023मध्ये हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली नागरिक ठार झाले तर 250 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवले गेले. इस्रायली नागरिकांवर आजवर झालेल्या हल्ल्यांपैकी या दशकातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता . हमासच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, सध्या जे युद्ध सुरू झाले आहे, त्यात गाझामध्ये 31हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले.
दोनही पक्षांनी वाटाघाटी करायचे नाकारल्याने आणि जीवितहानी वाढत असताना, नेतान्याहू यांनी रफाहवर जर खरोखरच हल्ला केला तर गाझा परत एकदा मानवतावादी आपत्तीच्या दिशेने ढकलला जाण्याची चिंता वाढत आहे. इस्रायली सैन्याचा दावा आहे की ते विस्थापित पॅलेस्टिनींना गाझामधील तात्पुरत्या “मानवतावादी दृष्टीने तयार केलेल्या बेटांवर ” हलविण्याची योजना आखत आहेत, मात्र याबाबत अतिशय कमी तपशील उपलब्ध झाला आहे.
या अशा अति महत्त्वाकांक्षेमुळे इस्रायलमध्ये नेतृत्व बदलाची मागणी केली गेली आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ डेमोक्रॅटने नव्याने निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे. रफाहवरील हल्ल्याच्या विनाशकारी परिणामाबद्दल आंतराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात असली तरी, हमासचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट करून भविष्यातील हल्ले रोखण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा नेतान्याहू यांचा अंतिम निर्धार आहे.
रामानंद सेनगुप्ता