अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला आपल्या भूमीतून दहशतवादी कारवाया रोखण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याची गरज अधिक महत्त्वपूर्ण आहे असे मतही अमेरिकेने व्यक्त केले आहे.
परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले, “शनिवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे लष्करी चौकीवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्याचे वृत्त आम्ही पाहिले आहे.”
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानमधील हल्ल्यादरम्यान झालेली जीवितहानी आणि जखमी तसेच अफगाणिस्तानमधील हल्ल्यादरम्यान झालेल्या नागरिकांच्या जीवितहानीबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो.”
दहशतवादाला आळा घालण्यासाठी अफगाणिस्तानने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगत अमेरिकन परराष्ट्र खात्याने दोन्ही देशांना निर्माण झालेले मतभेद दूर करण्याचे आवाहन केले आहे.
“अफगाणिस्तान पुन्हा कधीही अमेरिका किंवा आमच्या भागीदारांना अथवा मित्र देशांना हानी पोहोचवण्याची इच्छा बाळगणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
अलीकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबानी अतिरेक्यांच्या संशयित ठिकाणांवर हवाई हल्ले केले ज्यात किमान आठ जण ठार झाले. आत्मघाती बॉम्बस्फोटात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाल्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला.
पाकिस्तानी सरकारने या हल्ल्यांचे वर्णन “अफगाणिस्तानच्या अंतर्गत सीमावर्ती भागात गुप्तचर खात्याने राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमा” असे केले होते.
तालिबानने या हल्ल्यांचा निषेध करून “सीमेवरील पाकिस्तानच्या लष्करी केंद्रांना अवजड शस्त्रास्त्रांनी लक्ष्य करू” असे आव्हान दिले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये 2021मध्ये सत्ता काबीज केली त्यावेळी अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकन ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) २० वर्षांच्या युद्धानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडले. तालिबानच्या परतण्यामुळे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानला (TTP) मोकळे रान मिळाले.
पाकिस्तानी तालिबानला शेजारच्या देशात हल्ले करण्यासाठी आपली भूमी आम्ही वापरू देत नाही असा दावा अफगाण तालिबानने केला आहे.
वैध कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात राहणाऱ्या अफगाण लोकांना पाकिस्तानने हाकलून दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानमध्ये सुमारे 1.7 दशलक्ष अफगाण लोक राहतात, त्यापैकी बहुतेक 1979-1989च्या दरम्यान सोव्हिएतने त्यांच्या देशावर कब्जा केल्यानंतर पळून गेले.
पिनाकी चक्रवर्ती