संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2024 रोजी म्हैसूर संकुलातील बीईएमएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 अश्वशक्तीच्या (एचपी) इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. ही कामगिरी देशाच्या संरक्षण क्षमतेच्या नव्या युगाची सुरुवात असून यात संरक्षण तंत्रज्ञानातील तांत्रिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दिसून येते, असे प्रतिपादन संरक्षण सचिवांनी यावेळी केले.
भारताची संरक्षण क्षमता वाढविणे
1500 एचपीचे इंजिन लष्करी प्रणोदन (गाडी पुढे ढकलणारी – propulsion) प्रणालींमध्ये झालेला एक आदर्श बदल दाखवून देते. उच्च शक्ती – ते – वजन गुणोत्तर, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर, उणे शून्य तापमानात आणि वाळवंटातील वातावरणासह अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही कार्यक्षमता सिद्ध करणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत इंजिनांच्या तोडीचे आहे. या प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना संरक्षण सचिव म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताची लष्करी क्षमता वाढवण्याच्या दिशेने घेतलेली ही एक मोठी झेप आहे. इंजिनची प्रगती ही संरक्षण तंत्रज्ञानातील भारताचे कौशल्य दाखवणाऱ्या परिवर्तनशील चळवळीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि कठोर गुणवत्ता दर्जा कायम राखला जावा यासाठी पाच महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये याची रचना करण्यात आली होती. कोविड – 19 मुळे अनेक आव्हाने निर्माण झाल्यानंतरही (प्रकल्प ऑगस्ट 2020 मध्ये सुरु करण्यात आला होता) 1500 एचपी इंजिनच्या पहिल्या चाचणीने, तंत्रज्ञान स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करून, पहिल्या पिढीचे काम पूर्ण झाल्याचे सूचित केले आहे. इंजिनाचे उत्पादन आधीच सुरू झाले असून, येत्या वर्षात अशा 20 इंजिनाच्या अतिरिक्त चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही इंजिने भारतीय लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या चिलखती वाहनांमध्ये बसवली जाणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात, दुसऱ्या पिढीमध्ये लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (सीव्हीआरडीई), डीआरडीओच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्यांसाठी बीईएमएल इंजिने तयार केली जातील आणि नंतर वाहन चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या चाचणीसाठी प्रत्यक्ष वाहनांमध्ये त्यांचे एकत्रीकरण केले जाईल. हा प्रकल्प 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
बीईएमएलचे (BEML) मुख्य व्यवस्थापकीय संचालक शांतनु रॉय म्हणाले की, या कामगिरीमुळे देशातील संरक्षण उत्पादनात प्रमुख योगदान देणाऱ्या बीईएमएलचे स्थान अधिक भक्कम झाले असून या महत्त्वाच्या क्षेत्रात देशाच्या गरजा भागविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे दर्शवते.
रवि शंकर