आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट अशी S – 400 या हवाई क्षेपणास्रांची अंतिम तुकडी भारतात दाखल व्हायला आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2018 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात S – 400 ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्यासाठी साधारणपणे 35 हजार कोटींच्या व्यवहारानुसार एकंदर पाच स्क्वॉड्रन भारतात दाखल होणार होते. त्यापैकी 3 स्क्वॉड्रन भारतात दाखल झाले आहेत. उर्वरित दोन स्क्वॉड्रनची तुकडी 2024 मध्ये वितरित केली जाणार होती. मात्र आता यासाठी 2026 सालापर्यंत वाट बघावी लागणार आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, स्वतःच्या लष्करी गरजा पूर्ण करण्यामध्ये रशियन संरक्षण उत्पादक व्यस्त आहेत. याचा गंभीर परिणाम रशियाकडून होणाऱ्या जागतिक शस्त्रास्त्र पुरवठ्यावर झाला आहे.
भारतीय हवाई दलाने तीनही S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र स्क्वॉड्रन सक्रिय केले असून एक स्क्वॉड्रन पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत तर इतर दोन चीन आणि पाकिस्तानच्या उत्तर आणि पूर्वेकडील सीमांवर तैनात केली आहे. S-400 क्षेपणास्त्र स्क्वॉड्रन्स भारताच्या सध्याच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करणारी ठरली आहेत.
S – 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियाच्या अल्माझ सेंट्रल डिझाइन ब्युरोने विकसित केली असून जमिनीवरून हवेत मारा करणारी ही प्रणाली आहे. याचे संशोधन आणि विकास 1980 च्या दशकात सुरू झाला आणि 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याची चाचणी घेण्यात आली . तांत्रिक समस्यांमुळे , त्याची तैनाती 2007 पर्यंत लांबणीवर पडली, त्यानंतर त्याला मान्यता मिळाली.
S -400 सिस्टीम 380km च्या रेंजमध्ये शत्रूचे बॉम्बर, जेट, गुप्तचर विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन ट्रॅक करून ते नष्ट करू शकतात. प्रत्येक S-400 स्क्वॉड्रनमध्ये प्रत्येकी 128 क्षेपणास्त्रांसह दोन क्षेपणास्त्र बॅटरी असतात, ज्यामध्ये 120, 200, 250 आणि 380km च्या इंटरसेप्शन रेंज मिसाईल असतात, तसेच रडार आणि ट्रान्सपोर्टर-इरेक्टर वाहने असतात.
ही जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक मानली जाते आणि इस्रायली अमेरिकन प्रणालींशी त्याची तुलना केली जाते . एस – 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्राने सीरिया आणि युक्रेन – रशिया युद्धात आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे . ते शत्रूची विमाने , क्षेपणास्त्रे , ड्रोन आणि ग्लाइड प्रणालींचा समावेश असलेल्या अनेक प्रणालींशी स्पर्धा करू शकते. ही प्रणाली मॉस्कोच्या हवाई संरक्षणासाठी देखील वापरली जाते.
भारतात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडीओ) प्रोजेक्ट कुश ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सध्या विकसित करण्यात येत आहे.
टीम भारतशक्ती