बाल्टिमोरमध्ये पुलाला धडकलेल्या दाली नावाच्या मालवाहू जहाजावरील भारतीय कर्मचारी सध्या जहाजाच्या दुरुस्तीसाठी सुरू असणाऱ्या कामकाजावर देखरेख करत असून आवश्यक तिथे अधिकाऱ्यांसोबत कामही करत आहेत.
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार जहाजावरील सर्व 22 कर्मचारी तिथेच राहत असून खराब झालेल्या जहाजावरील ढिगारा साफ होईपर्यंत ते जहाजावरूनच आपले काम सुरू ठेवतील. हे जहाज 4,700 कंटेनर घेऊन श्रीलंकेच्या दिशेने जात असताना त्याचा वीजपुरवठा खंडित झाला आणि ते फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला धडकले.
भारतीय ताफ्यातील एका सदस्याला किरकोळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता तो सुद्धा अपघातग्रस्त जहाजावर परतल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. ढिगारा हटवण्याची प्रक्रिया पुढील काही आठवडे सुरू राहण्याची शक्यता आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार भारतीय क्रूकडे जहाजावरील काम चालू ठेवण्यासाठी पुरेसे अन्न, पाणी आणि इंधन आहे. मात्र जहाज तिथून कधी हलवता येईल यासंदर्भात अद्याप कोणतीही निश्चित माहिती मिळालेली नाही. जहाजाच्या अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण केल्यावरच त्यावरील कर्मचारी जहाजावरून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन असा प्रवास करणाऱ्यांसाठी हा पूल एक मुख्य मार्ग होता आणि दररोज अंदाजे 31,000 गाड्या यावरून प्रवास करत होत्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे की, क्रूच्या तत्काळ प्रतिसादामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. “जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मेरीलँड वाहतूक विभागाला त्यांचे जहाजावरील नियंत्रण सुटल्याचे लगेचच कळवल्याने जहाज पुलाला धडकण्यापूर्वी स्थानिक अधिकारी रहदारीसाठी पूल बंद करू शकले, ज्यामुळे निःसंशयपणे अनेक जीव वाचले.”
दरम्यान, अमेरिकन सरकारने बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून मेरीलँड राज्याला 60 दशलक्ष डॉलर्सची तात्काळ आर्थिक मदत केली.
पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या दोन कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. इतर सहापैकी चारजणांच्या मृतदेहांचा अद्याप शोध सुरू आहे. मदतकार्य करणाऱ्यांना 35 वर्षीय अलेजांड्रो हर्नांडेझ फ्युएन्टेस आणि 26 वर्षीय डॉर्लियन रोनियल कॅस्टिलो कॅब्रेरा यांचे मृतदेह सापडले आहेत.
पिनाकी चक्रवर्ती