प्रस्तावित पाणबुडी कार्यक्रम-प्रोजेक्ट 75 (इंडिया) किंवा पी75आयचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय नौदलाचा चमू जर्मनीच्या दौऱ्यावर असताना, तिथल्या सरकारने वाटाघाटींना मंजूरी दिली आहे. भारतातील जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमन यांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडिपेंडंट प्रोपल्शनसह (एआयपी) सहा नव्या पारंपरिक पाणबुड्या तयार करण्याचे उद्दिष्ट असलेल्या पी75आय निविदेबाबत भारतीय नौदलाशी बोलणी करण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. यासाठी प्रकल्पासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये स्पॅनिश पाणबुडी उत्पादक नवंतिया आणि जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टीम्स (टीकेएमएस) यांचा समावेश आहे. त्यापैकी जर्मन कंपनी हा मोठा करार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
पी75आय कार्यक्रम सध्या परदेशी मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) आणि भारतीय उत्पादन संस्था यांच्यात धोरणात्मक भागीदारीद्वारे राबवला जात आहे. जर्मन आणि स्पॅनिश या दोनही देशांची सरकारे जी2जी करारासाठी या शर्यतीत आहेत. 2016 साली फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांसाठी जो करार करण्यात आला होता तशाच प्रकारचा हा करार आहे. टीकेएमएसने या प्रकल्पासाठी भारतातील सरकारी अखत्यारीतील माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) सोबत तर नवंतियाने खासगी क्षेत्रातील संरक्षण कंपनी लार्सन अँड टुब्रोसोबत (एलअँडटी) भागीदारी केली आहे. भारतात हा प्रकल्प उभारणे हा या भागीदारी मागील उद्देश आहे.
जर्मन राजदूतांनी भारतात प्रगत पाणबुड्यांच्या उत्पादनासाठी भारतीय गोदीशी सहकार्य करण्याची दृढ वचनबद्धता व्यक्त केली आहे. सरकार सध्या सुरू असलेल्या वाटाघाटीला पूर्ण पाठिंबा देत आहे. अंतिम निर्णय भारताकडे असला तरी, हा प्रकल्प आधीच्या संरक्षण भागीदारीला गती देणारा आहे आणि भविष्यातील सहकार्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार करत आहे.
2000 साली सुरुवातीला प्रस्तावित करण्यात आलेल्या आगामी पी75आय प्रकल्पासाठी विश्वासार्ह एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीची गरज असल्याचे भारतीय नौदलाकडून वारंवार सांगितले जात होते. भारतासाठी सहा स्कॉर्पीन श्रेणीतील पाणबुड्यांची उभारणी केली गेली असली तरी फ्रान्सकडून अद्याप त्यात एआयपी प्रणालीची सिद्धता करण्यात आलेली नाही.
योजनेनुसार, स्कॉर्पीन पाणबुडी एआयपी प्रणालीने सुसज्ज असावी, यासाठी डीआरडीओद्वारे स्वदेशी पद्धतीने ती विकसित केली जात आहे. मात्र, या स्वदेशी प्रणालीच्या विकासाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला आहे. परिणामी, शेवटच्या दोन स्कॉर्पीन-श्रेणीच्या पाणबुड्यांमध्ये जे पुनर्बांधणीच्या टप्प्यात एआयपी तंत्रज्ञान बसवावे लागणार होते त्याऐवजी ते आता बांधकाम टप्प्यातच बसवावे लागणार आहे.
भारतीय नौदल स्कॉर्पीन श्रेणीतील आयएनएस कलवरीसाठी स्वदेशी एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीवर अवलंबून राहील की नाही हे सध्या सांगणे जरा अवघड आहे. कारण ही प्रणाली अजून पूर्णपणे विकसित आणि सिद्ध झालेली नाही. स्वदेशी प्रणालींचा होणारा संथ विकास किंवा परदेशी कंपन्यांच्या अवास्तव दाव्यांमुळे पाणबुडीच्या कार्यक्रमात आणखी विलंब होऊ नये यासाठी नौदलाकडे खात्रीशीर एआयपी प्रणाली असणे महत्त्वाचे आहे. एका सूत्रानुसार, भारतीय पाणबुडी कार्यक्रमाकडे कोणत्याही देशासाठी परीक्षण करण्याचे एक ठिकाण म्हणून बघितले जाऊ नये.
पी75आय कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे भारतीय नौदलाने आता तात्पुरत्या उपाययोजनांची निवड केली आहे. त्यानुसार त्यांनी आणखी तीन स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला, ज्यांची उभारणी फ्रान्सने केली आहे. अर्थात गेल्या वर्षी या कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली असली तरी औपचारिक वाटाघाटींची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
टीम भारतशक्ती