संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार
दि. २३ एप्रिल: लष्कराच्या विविध ठिकाणी तैनात असलेल्या जवान व अधिकाऱ्यांना वैद्यकीय उपचार व सुविधा देण्यासाठी नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षण देण्याबाबत लष्करी वैद्यकीय सेवा (एएफएमएस) व दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी-दिल्ली) यांच्यात सोमवारी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. ‘एएफएमएस’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग व ‘आयआयटी-दिल्ली’चे संचालक प्रा. रंगन बॅनर्जी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
लष्कराचे जवान व अधिकारी विविध ठिकाणी व खडतर वातावरणात देशरक्षणासाठी तैनात असतात. त्यांना विषम हवामानाचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीतील जवान व अधिकाऱ्यांच्या उपचारासाठी आवश्यक सोयी उभारण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान व जैववैद्यकीय संशोधनासाठीची यंत्रणा ‘आयआयटी-दिल्ली’कडे उपलब्ध आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या वैद्यकीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ते लष्कराला मदत करू शकतात. अगदी वैद्यकीय परिस्थिमुळे अवयव गमवावा लागलेल्या जवान अथवा अधिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठीही ‘आयआयटी-दिल्ली’कडून मदत होऊ शकते. त्यामुळे या करारांतर्गत उभय संस्थांतील प्राध्यापक परस्पर संस्थांत अध्यापनासाठी जाणे, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त संशोधन कार्यक्रम (पीएचडी प्रोग्रॅम) राबविण्याचीही योजना आखण्यात आली आहे.
देशभरातील उत्कृष्ट व महत्त्वाच्या संस्थामधील ज्ञानाचा उपयोग लष्करी जवानांसाठी व त्यांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हावा, या उद्देशाने अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांशी परस्पर सामंजस्य करार करण्याचा निर्णय लष्करी वैद्यकीय सेवेने घेतला आहे. त्याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल, असे मत ‘एएफएमएस’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग यांनी व्यक्त केले. तर, या करारामुळे संशोधन व प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे. त्याचा लाभ देशाला आणि लष्करी जवानांना होणार आहे, असे मत ‘आयआयटी-दिल्ली’चे संचालक प्रा. रंगन बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी