उभयपक्षी संरक्षण सहकार्याबाबत चर्चा
दि. २३ एप्रिल: भारत आणि फ्रान्सदरम्यान संरक्षण संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले संरक्षणदलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी फ्रान्सचे संरक्षणदलप्रमुख जनरल थिएरी बर्कहार्ड यांची भेट घेतली. उभय देशांतील संरक्षण सहकार्य बळकट करण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती संरक्षणदलाच्या संयुक्त मुख्यालयाकडून ‘एक्स’ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. भारत आणि फ्रान्समधील लष्करी संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याला गती देणे व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत संबंधांना मजबूत करण्याच्या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
जनरल अनिल चौहान यांना यावेळी फ्रान्सच्या तिन्ही सेनादलांच्या संयुक्त तुकडीकडून मानवंदना देण्यात आली. आपल्या या दौऱ्यात ते फ्रान्सच्या संरक्षणदलप्रमुखांसह वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी संवाद साधणार आहेत. यामध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हायर डिफेन्स स्टडीज’चे संचालक आणि आयुध विभागाचे महासंचालक यांचा समावेश आहे. जनरल चौहान फ्रेंच स्पेस कमांड, लँड फोर्सेस कमांडला भेट देणार आहेत व इकोल मिलिटेअर (स्कूल ऑफ मिलिटरी) येथे लष्कर आणि जॉइंट स्टाफ कोर्सच्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. ते सॅफ्रान ग्रुप, नेव्हल ग्रुप आणि दसॉ एव्हिएशनसह फ्रान्समधील काही प्रतिष्ठित संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत.
सीडीएस जनरल अनिल चौहान न्यू वे -चॅपेल मेमोरियल आणि विलर्स-गुइस्लेन येथील भारतीय स्मारकाला भेट देऊन पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करणार आहेत.
विनय चाटी