संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रशियाने बाह्य अंतराळ कराराच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला. यामुळे अमेरिकेची नाराजी वाढली आहे. अमेरिकेने रशियाने उपग्रह वाहून नेणारे अण्वस्त्र विकसित केल्याचा आरोप अमेरिकेने केला असून याच कारणामुळे रशियाने ठरावाला नकाराधिकार दिला असल्याचा आरोप केला आहे. बाह्य अंतराळ करारांतर्गत, अण्वस्त्रांसोबतच अंतराळात इतर धोकादायक शस्त्रे तैनात करण्यावर बंदी घालता येणे शक्य झाले असते. मात्र, रशियाच्या नकाराधिकारामुळे अमेरिकेचा हा हेतू पूर्णपणे फसला आहे.
बुधवारी, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आधी नमूद केल्याप्रमाणे, रशिया उपग्रह वाहून नेणारी अण्वस्त्रे विकसित करत आहे”. अर्थात रशियाची अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याची कोणतीही योजना नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जाहीरपणे सांगल्याचे आम्ही ऐकले आहे. जर त्यात तथ्य असेल तर रशियाने ठरावासाठी नकाराधिकार का वापरला? सुलिव्हन म्हणाले की, अमेरिका आणि जपानने संयुक्तपणे मांडलेल्या या ठरावामुळे हे सिद्ध झाले असते की अंतराळात अण्वस्त्रे तैनात करणे हे कोणत्याही देशाच्या मूलभूत जबाबदारीविरुद्ध आहे. पृथ्वीच्या कक्षेत तैनात करता येतील अशी अण्वस्त्रे तयार न करण्याचे आवाहनही या ठरावात सदस्य देशांना करण्यात आले होते.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन पुढे म्हणाले की, पृथ्वीच्या कक्षेत अण्वस्त्रे तैनात केल्याने दळणवळण, वैज्ञानिक, हवामान, कृषी, व्यावसायिक तसेच राष्ट्रीय सुरक्षा सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनीही रशियाच्या या निर्णयावर टीका करत रशियाने आपली जबाबदारी झटकल्याचे सांगितले. “अर्थात, रशियाने जागतिक शस्त्रास्त्र अप्रसार करण्याचा रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हाणून पाडण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून धोकादायक शस्त्रांच्या वापराबद्दल रशिया बेजबाबदारपणे वागत आहे. ते शस्त्र नियंत्रणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेपासून पळ काढत आहे.”
रशियाचे संयुक्त राष्ट्रांचे राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनी अमेरिका जाणीवपूर्वक रशियाला अपमानित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. रशिया अंतराळात शांतता राखण्याच्या उद्देशाने स्वतःच्या मसुद्यावरील ठरावावर परिषदेच्या सदस्यांशी लवकरच वाटाघाटी सुरू करेल असेही त्यांनी सांगितले.
“आम्हाला केवळ सामूहिक विध्वंसक शस्त्रेच नव्हे, तर अंतराळात कोणत्याही प्रकारची शस्त्रे तैनात करण्यावर बंदी घालायची आहे. पण तुम्हाला ते नको आहे. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोः का? ” असे नेबेन्झिया यांनी थॉमस-ग्रीनफील्ड यांना परिषदेमध्ये विचारले.
सुमारे सहा आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर अमेरिका आणि जपानने मसुदा ठराव संयुक्त सुरक्षा परिषदेत मतदानासाठी मांडला. या ठरावाच्या बाजूने 13 मते पडली, रशियाने नकाराधिकार वापरला तर चीन अनुपस्थित राहिला.
आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)