लष्करी वैद्यकीय सेवेत ११२ अधिकारी दाखल
दि. २५ एप्रिल: लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन गुरुवारी पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘कॅप्टन देवाशिष शर्मा परेड ग्राउंड’वर पार पडले. या वेळी महाविद्यालयातील ११२ छात्र लष्करी वैद्यकीय सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाले. या संचलनाला लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना या वेळी छात्रांनी मानवंदना दिली, तसेच त्यांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्णपदक आणि ‘कलिंगा ट्रॉफी’चे वितरणही करण्यात आले.
महाविद्यालयाच्या १४७ छात्रांनी यंदा महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाकडून २०२३च्या हिवाळी सत्रासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल. यात मित्रदेशांतील पाच छात्रांचाही समावेश आहे. एकूण उत्तीर्ण छात्रांपैकी ११२ छात्रांना गुरुवारी झालेल्या दीक्षांत संचलनानंतर विविध लष्करी दलांत ‘कमिशन’ देण्यात आले. यात ८७ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. ‘कमिशन’ प्राप्त झालेल्या छात्रांपैकी ८८ छात्रांना लष्कर, १० छात्रांना नौदल आणि १४ छात्रांना हवाईदलात प्रवेश देण्यात आला. या ५८ व्या दीक्षांत संचलनाचे नेतृत्व लेफ्टनंट सुशीलकुमार सिंग यांनी केले.
लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग यांनी यावेळी यशस्वी छात्रांचे अभिनंदन केले आणि त्याच्याकडून अत्यंत समर्पण भावाने देशाची आणि लष्करीदलांची सेवा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दीक्षांत संचलनाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर छात्रांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल पारितोषक देऊन गौरविण्यात आले. या वेळी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे राष्ट्रपती सुवर्णपदक फ्लाईंग ऑफिसर आयुष जैस्वाल यांना, तर ‘कलिंगा ट्रॉफी’ सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर यांना प्रदान करण्यात आली.
देशातील वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या पहिल्या पाच महाविद्यालयांत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश होतो. या महाविद्यालयाकडून देण्यात येणाऱ्या अप्रतिम वैद्यकीय सुविधा व उपचारांमुळे जगभरात याला लौकिक प्राप्त झाला आहे. आपल्या वैद्यकीय सेवेची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल नुकताच एक डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाविद्यालयाला राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आला होता. महाविद्यालयाला संरक्षणदलप्रमुखांचे प्रशस्तीपत्रही प्राप्त झाले आहे. या दीक्षांत संचलनाला लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक व कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल आणि अधिष्ठाता व उपकमांडंट मेजर जनरल गिरीराज सिंग उपस्थित होते.
विनय चाटी