सीमा सुरक्षेची जीवनदायीनी: संरक्षण सचिवांकडून प्रशंसा
दि. ०७ मे: देशाच्या सीमांवर अतिशय प्रतिकूल आणि खडतर ठिकाणी रस्ते बांधून सीमा सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावितानाच या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोठे योगदान देणाऱ्या सीमा सडक संघटनेचा (बीआरओ) ६५ वा वर्धापनदिन मंगळवारी नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘बीआरओ’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी ‘बीआरओ’च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वेळी शुभेच्छा दिल्या.
जम्मू-काश्मीर, लडाख असो अथवा ईशान्य भारतातील कठीण भौगोलिक परिस्थिती असो, किंवा मग राजस्थानातील वाळवंटी भाग ‘बीआरओ’ने अशा सर्व ठिकाणी रस्त्याचे जाळे उभे करून सैन्याच्या हालचाली अधिक सुकर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेतील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून ‘बीआरओ’कडे पाहावे लागेल. या रस्त्यांचा वापर लष्कराव्यतिरिक्त इतर नागरिकही करतात, त्यामुळे त्या दुर्गम भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळते. त्यामुळे ‘बीआरओ’ला सीमा सुरक्षेबरोबरच सीमा भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाची जीवनवाहिनी म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी व्यक्त केले. ‘बीआरओ’ने आपले सर्व प्रकल्प वेळेपूर्वी आणि उत्तम दर्जा राखून पूर्ण केले आहेत, त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने कर्मयोगी म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘बीआरओ’ने आपल्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे कमी मनुष्यबळ वापरून तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक काम करता येईल व त्याचा दर्जाही अधिक चांगला होईल. येत्या काळात ‘बीआरओ’साठी ‘ऑटोमेशन’ आणि यांत्रिकीकरण हे दोन शब्द कळीचे ठरतील, असेही अरमाने यांनी सागितले. सिक्कीममधील पुरामुळे सिल्क्यारा बोगदा खचून झालेल्या अपघाताच्यावेळी ‘बीआरओ’ने केलेल्या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली.
‘बीआरओ’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी या वेळी ‘बीआरओ’च्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘देशभरात ‘बीआरओ’चे अस्तित्व असून, आम्ही राष्ट्राची सुरक्षा, दळणवळण आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. ‘उंच पर्वतरांगांच्या शांततेत आमचे काम बोलते,’ या ‘बीआरओ’च्या ब्रीदवाक्याचीही आठवण त्यांनी या प्रसंगी करून दिली. या वेळी सेला बोगाद्याबाबतची स्मरणिका आणि उंचे रास्ते, पथ प्रदर्शक, पथ विकास आदी पुस्तकांचे प्रकाशनही संरक्षण सचिवांच्या हस्ते करण्यात आले.
भारताच्या ईशान्य (प्रोजेक्ट टस्कर, आताचे नाव प्रोजेक्ट वर्तक) आणि उत्तरेकडील (प्रोजेक्ट बिकन) हिमालयीन सीमा भागात रस्ते बांधणीसाठी १९६०मध्ये सीमा सडक संघटनेची स्थापना करण्यात आली. आज सीमा भागातील रस्ते बांधणीतील एक महत्त्वाची संघटना म्हणून ‘बीआरओ’कडे पहिले जाते. अकरा राज्यांतील १८ प्रकल्पांचे काम या संघटनेकडून पहिले जाते. या सहा दशकांत ‘बीआरओ’ने एकूण ६२ हजार २१४ किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केले असून, एक हजार पूल बांधले आहेत. देशाच्या उत्तर व पूर्व सीमाभागांत सुमारे नऊ ते १९ हजार फुट उंचीवरील रस्त्यांच्या बांधणी, दुरुस्ती व देखभालीचे काम ‘बीआरओ’कडून केले जाते. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत ‘बीआरओ’ने तीन हजार ६११ कोटी रुपयांचे १२५ प्रकल्प पूर्ण केले आहेत.
विनय चाटी
स्रोत:पीआयबी