रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांची सिंगापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा
दि. ०९ मे: बदलती सागरी आणि भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारतीय नौदल वचनबद्ध असल्याची ग्वाही नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग) ‘रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांनी दिली. रिअर ॲडमिरल धनकर यांनी गुरुवारी सिंगापूरमधील प्रतिष्ठेच्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ला (आरएसआयएस) भेट देऊन सिंगापूरमधील शिक्षणक्षेत्राच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, या वेळी ते बोलत होते.
R Adm Rajesh Dhankhar, #FOCEF visited the RSIS in Singapore, engaging in discussions with the academia. The wide ranging discussions explored the fast changing #maritime & geo-strategic landscape of the #IndoPacific.
FOCEF emphasised on role of the #IndianNavy in furthering… pic.twitter.com/94foVgYQx3— SpokespersonNavy (@indiannavy) May 9, 2024
सामरिक तैनातीचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस दिल्ली,’ ‘आयएनएस शक्ती’ आणि ‘आयएनएस किल्तन’ या युद्धनौकांनी दक्षिण चीन समुद्राकडे प्रस्थान ठेवले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात रिअर ॲडमिरल धनखड यांच्या नेतृत्वाखाली या युद्धनौका सोमवारी सिंगापूर येथे पोहोचल्या होत्या. या नौकांचे सिंगापूरच्या नौदलातील अधिकारी, तसेच भारताच्या सिंगापूरमधील उच्चायुक्तांनी स्वागत केले होते. सिंगापूर येथील वास्तव्यात तेथील संरक्षणदले, नागरी समुदाय आणि शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा असा भरगच्च कार्यक्रम भारतीय शिष्टमंडळासाठी आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिअर ॲडमिरल धनखड बुधवारी सिंगापूर येथील ‘इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर’ला भेट देऊन तेथील माहितीच्या एकत्रित प्रकीयेची माहिती घेतली होती. युद्धाचे बदलते स्वरूप आणि त्यात माहितीचा घातक शस्त्रासारखा होणारा वापर, या विषयावर त्यांनी आपली मते मंडळी होती.
सिंगापूरमधील वास्तव्याच्या तिसऱ्या दिवशी रिअर ॲडमिरल धनखड यांनी भूराजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर काम करणारी सिंगापूरमधील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ला (आरएसआयएस) भेट देऊन सिंगापूरमधील शिक्षणक्षेत्राच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेत सागरी, भूराजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयक अनेक विषय चर्चेला आले. या वेळी रिअर ॲडमिरल धनखड यांनी हिंद-प्रशांत क्षेत्र, बदलती सागरी आणि भूराजकीय परिस्थिती आदी विषयांवर भाष्य केले. बदलती सागरी आणि भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे, असे त्यांनी या चर्चेत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील सर्व देशांना बरोबर घेऊन चालण्याची भारताची भूमिकाही स्पष्ट केली. या वेळी त्यांनी भारताच्या ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ (सागर) या पुढाकाराबद्दलही उपस्थितांना माहिती दिली. भारतीय नौदलाचे ‘सनराईज फ्लीट’ याच उद्देशाने दक्षिण चीन समुद्राच्या सामरिक तैनातीवर निघाले असल्याचे त्यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.
विनय चाटी