महत्त्वाची कामगिरी: पूर्व विभागातील धावपट्टीवर विमान उतरले
दि. २३ मे: पूर्व विभागातील (इस्टर्न सेक्टर) सीमेलगतच्या धावपट्टीवर (ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड) हवाईदलाचे ‘सी१३०जे सुपर हर्कुलस’ हे अजस्त्र विमाना रात्रीच्या अंधारातही दृश्यमानता देणाऱ्या चष्म्यांच्या मदतीने बुधवारी रात्री उतरविण्यात आले. (‘नाइट व्हिजन गॉगल एडेड लँडिंग’) हवाईदलाच्या परिचालन क्षमतेत हा एक मैलाचा दगड मानला जात आहे, अशी माहिती हवाईदलाच्यावतीने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) देण्यात आली आहे. या मुळे हवाईदलाच्या परिचालनाचा आवाका आणि संरक्षण सज्जता वाढीस लागणर असून, देशाची सुरक्षा आणि सार्वोभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.
Achieving another significant milestone, an #IAF C-130J aircraft carried out a successful Night Vision Goggles aided landing at an Advanced Landing Ground in the Eastern sector.#IAF continues to expand capabilities, reinforcing commitment to safeguard nation’s sovereignty by… pic.twitter.com/nMAbDnWPhR
— Indian Air Force (@IAF_MCC) May 23, 2024
भारतीय हवाईदलाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे हवाईदलाला आपली क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे. सी१३०जे हे विमान बहुपयोगीता आणि त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे विमान छोट्या धावपट्टीवर उतरविण्यात आले. यातून भारतीय हवाईदलातील वैमानिकांचे कौशल्य आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी दिसून येते, असे या वेळी सांगण्यात आले. ‘आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य साधताना हवाईदलाच्या सी१३०जे या विमानाने पूर्व विभागातील एका धावपट्टीवर ‘नाइट व्हिजन गॉगल एडेड लँडिंग’ केले,’ अशी ‘पोस्ट’ हवाईदलाने या निमित्ताने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केली आहे. त्याची चित्रफितही हवाईदलाने सोबत दिली आहे.
भारतीय हवाईदलाने फेब्रुवारी २०११मध्ये सी१३०जे हर्कुलस आणि सप्टेंबर २०१३मध्ये सी-१७ ही विमाने (स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट एयरक्राफ्ट) आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. त्यामुळे हवाईदलाची सामरिक क्षमता वाढली होती. गेल्या दशकभरात या दोन्ही विमानांनी देशात आणि देशाबाहेर त्यांची ‘स्ट्रॅटेजिक एअरलिफ्ट’ क्षमता दाखवून दिली आहे. या मध्ये परिचालन विषयक संयुक्त सराव, मानवी मदत आणि आपत्ती बचावकार्य मोहिमा, कोरोनाच्या काळात जगभरातील देशांना लस पुरविण्याची मोहीम, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका, उत्तराखंडमधील सिल्कीयारा बोगदा अपघातातील मदतकार्य आदी महत्त्वाच्या मोहिमांचा समावेश आहे. सी१३०जे या अत्याधुनिक विमानाचे सारथ्य दोन वैमानिकांच्या मदतीने करण्यात येते आणि छोट्या धावपट्टीवरून उड्डाण घेण्यास आणि उतरण्यास हे विमान सक्षम आहे. पूर्णपणे डिजिटल विमानन यंत्रणा असलेले हे विमान कोणत्याही हवामानात दिवसा आणि रात्री ‘नाइट व्हिजन गॉगल’ व इन्फ्रारेड तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्य करू शकते. तसेच, इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भूभागावर काम करण्याची त्याची क्षमता वाढली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच गेल्या एप्रिलमध्ये सुदानमधून भारतीय नागरिकांची बचावमोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान कच्च्या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले होते. याच वर्षी जानेवारी महिन्यात ‘सी१३०जे’ने कारगिलच्या धावपट्टीवर ‘नाइट लँडिंग’ केले होते, या मुळे हे विमान आणि भारतीय वैमानिकांची क्षमता जगाला पुन्हा दिसली होती.
विनय चाटी
(वृत्तसंस्था ‘इनपुट्स’सह)